…हा तर राष्ट्रद्रोह-नारायण राणे यांचा ठाकरे सरकारवर प्रहार

चिपळूण : देशाचा अमृतमहोत्सव माहिती नसणं हा देशाचा अपमान, राष्ट्रद्रोह आहे, अशी टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मी असतो तर… ऐवजी आता कानफाड फोडेन, असं म्हणालो असतो तर तो गुन्हा ठरला असता अशा शब्दात पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी युक्तीवाद केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सोमवारी रात्री उशिरा चिपळुणात आगमन झाले. तत्पूर्वी महाड येथे पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलतांना “माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पहा. मी काय साधा माणूस वाटलो का?,” अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. तर ते पुढे म्हणाले की,“आम्ही समर्थ आहोत. दोन दगड मारुन गेले असतील तर त्यात पुरुषार्थ नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी नाशिकमधील तोडफोडीच्या घटनेवर दिली. “ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोबाड फोडण्याचं वक्तव्य केलं होतं, तेव्हा तो गुन्हा नव्हता का? मग त्यावेळी गुन्हा दाखल का झाला नाही?,” अशी विचारणा नारायण राणेंनी यावेळी केली.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे प्रमोद जठार, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार शाम सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ. विनय नातू, नगरसेवक परिमल भोसले, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, राजेश हाटले, भाजपा युवा कार्यकर्ते प्रफुल्ल पिसे, शुभम पिसे, संदेश भालेकर, सचिन ओक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उत्तरच द्यायचे असेल तर ठाकरी भाषेत द्या : प्रमोद जठार

मुख्यमंत्र्यानी देशाच्या केलेल्या अपमानाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ठाकरी भाषेत उत्तर दिले. उत्तरच द्यायचं असेल तर ठाकरी भाषेत द्या. हे सरकार नारायण राणेंच्या जनआशिर्वाद यात्रेसोबत सुडबुध्दीने वागत आहे, असे प्रतिपादन नारायण राणेंच्या जनआशिर्वाद यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा कोणीही रोखू शकत नाही. सत्तरीत असूनही नारायण राणे यात्रेदरम्यान जनतेशी संवाद साधत आहेत. त्यामुळे सरकार घाबरले आहे. यात्रा रोखू पहात आहे, असा आरोप त्यांनी केला.

आता सेनेचे बॅनर लागू देणार नाही : प्रणय वाडकर

चिपळूणमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे बॅनर फाडून मोठी चूक केली आहे. आमच्या समोर बॅनर फाडण्याची शिवसेना कार्यकर्त्यांची हिम्मत नाही. त्यामुळेच पाठीमागून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले. शहरात यापुढे शिवसेनेचे बॅनर लागू देणार नाही, जरी लागले तरी ते फाडले जाणार, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे प्रणय वाडकर यानी दिला आहे.

भाजप-सेना कार्यकर्ते आमने-सामने

कार्यक्रमप्रसंगी सेनेचे मोजकेच कार्यकर्ते हातात भगवा घेऊन घोषणाबाजी करीत होते. याचादेखील ना. राणे यांनी समाचार घेताना या कार्यकर्त्यांपेक्षा भाजप कार्यकर्त्यांच्या अंगी भगवे रक्त आहे, अशा शब्दात सेनेच्या कार्यकर्त्यांचा समाचार घेतला. तर भाजपा प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे व प्रमोद जठार यांनी सेनेच्या या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला.

कार्यक्रमाप्रसंगी भाजप-सेना कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वातावरण तंग झाले होते. दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, तोपर्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत देखील सदरील कार्यक्रम पूर्ण झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.