पारगाव भातोडी गावाचा सर्वांगीण विकास आराखडा सादर करा – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई,२४ऑगस्ट /प्रतिनिधी :- अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव भातोडी या गावाला आदर्श गाव म्हणून विकसित करण्यासाठी राज्याच्या व केंद्राच्या योजनांचा लाभ घेऊन या गावाच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेले हे गाव ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असून या गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओसवाल अहमदनगर तालुक्याचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील, महावितरणचे अभियंता श्री कोपनर, विस्ताराधिकारी श्री खाडे, ग्रामविकास अधिकारी सचिन पवार, पारगांवच्या सरपंच मीनाक्षी शिंदे, व्याख्याते गणेश शिंदे, तसेच संबधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

श्री. सत्तार म्हणाले,पारगांव भातोडी या गावाचा विकास आराखडा तयार करतांना आधी या गावाच्या सिमा निश्चितीचे काम मंत्रालय स्तरावरून आदेशित करुन व्हायला पाहिजे. त्याच बरोबर या गावातील तळे सुशोभिकरण, किल्ला तसेच ब्रिटीशकालीन भींतीचे संवर्धन व्हावे यासाठी ग्रामविकास, पुरातत्व विभाग व पर्यटन विभागाच्या समन्वयाने काम होणे आवश्यक आहे.

या ठिकाणी असलेले पुरातन शिव मंदीर,वाघेश्वरी देवीचे मंदीर यांचा जिर्णोद्धार तसेच मशिदीसमोरील जागेत मुस्लिम समाजासाठी शादीखाना प्रस्तावित करण्यात आले आहे. गावातील शाळेच्या परिसरात मुलांसाठी खेळण्याची जागा, ग्रामपंचायतीची नवी इमारत, विद्युतीकरण व इतर सुशोभीकरणाचे काम प्रस्तावित आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारगांव भातोडी हे एक ऐतिहासिक गाव आहे या गावाला शहाजीराजांच्या लढाईचा इतिहास आहे. अनेक वर्ष विकासापासून वंचित असणाऱ्या पारगांवला ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार त्यांनी दत्तक घेतले आहे.

यावेळी व्याख्याते गणेश शिंदे आणि सरपंच मीनाक्षी शिंदे यांनी गावाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध मागण्या व गावांची सद्य परिस्थिती दर्शवणारे सादरीकरण केले.