सेनेचे अनेक मंत्री नाराज-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मोदी सरकारची कामे जनतेपर्यंत नेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा

मुंबई ,२३ ऑगस्ट /प्रतिनिधी :- ‘केंद्रीय मंत्री नारायण राणे हे छातीठोकपणे सांगतात म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असेल. एकनाथ शिंदे हे एकटेच नाहीत, तर अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्री झाले, लाल दिवा, केबिन, स्टाफ मिळतो पण या मंत्रिमंडळात रिमोट कंट्रोल मात्र अन्य ठिकाणी आहे’, अशी टीका भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.

Displaying PHOTO 1.jpg

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘नारायण राणे हे नव्याने भाजपमध्ये आले असले तरीही त्यांचा अनुभव मात्र दांडगा आहे. ज्या शिवसेनेबाबत ते बोलत आहेत त्या सेनेत नारायण राणे हे सुद्धा फार काळ होते. त्यामुळे त्यांनी जर छातीठोकपणे दावा केला असेल, तर त्यात नक्की तथ्य असेल. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत’, असा दावाही पाटील यांनी केला.

‘वसईमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेली भेट ही राजकीय नव्हती. राणेंसारखा एवढा मोठा नेता कोणाला भेटला तर कोणी त्याचा वेगळा अर्थ असा काढू नये’, असेही ते म्हणाले. ‘राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. हे सरकार किती काळ चालेल हे माहीत नाही. पण या सरकारमुळे दुखावलेल्या आणि भाजपसोबत आलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही नक्की न्याय देऊ’, अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.

‘आगामी निवडणुका या स्वबळावरच लढवू. सेना-भाजप सोबत येऊन लढतील हा जर-तरचा प्रश्न आहे. पण आम्ही स्वतंत्रच लढणार’, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ‘मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे हे सरकारची भूमिका समजून घेतात असे तुम्ही म्हणता, मग नांदेडचे आंदोलन हे भाजप पुरस्कृत होते, असे कसे म्हणता येईल’, असा टोलाही पाटलांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. ‘मागास आयोगाचे काम सरकार सुरू का करत नाही? अशात आंदोलन करू नका, असे सरकार कसे म्हणू शकते?’ असा सवालही त्यांनी अशोक चव्हाण यांना केला आहे.

‘मी भांडुपमधून येत असताना महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कार्यक्रमाला फटाके वाजवण्यासाठी गर्दी झाली होती. त्यामुळे महापौर पेडणेकर ह्या जन आशीर्वाद यात्रेतील गर्दीबाबत कशा बोलू शकतात’, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. यशोमती ठाकूर यांच्याप्रमाणेच अन्य अनेक मंत्र्यांची अशीच स्थिती बनली आहे. सगळ्याच मंत्र्यांची गळचेपी होत आहे, असे पाटील म्हणाले. अजित पवार यांच्याकडून आपल्या खात्याला निधी मिळत नसल्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विधानावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.

जन आशीर्वाद यात्रेच्या कोकणातील प्रवासाला पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ७ वर्षांत अनेक लोकोपयोगी योजना आखल्या आहेत. या योजना सामान्य माणसापर्यंत पोहचवून आणखी चांगले काम करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आल्या, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी केले.

          पाली ( जि. रायगड ) येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या कोकणातील प्रवासाला पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर याप्रसंगी उपस्थित होते.         

         पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करताना महाराष्ट्रातील ४ जणांचा समावेश करत देशात महाराष्ट्राला सर्वाधिक प्रतिनिधित्व दिले. मोदी सरकारच्या जन कल्याणकारी योजना जनतेपर्यंत नेण्याबरोबरच जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आणि आणखी चांगले काम करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा सुरु आहे. नारायण राणे यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या खात्याच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राच्या विकासाला नक्की चालना मिळेल.

          केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे भारताची मान जगात उंचावली आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा जाणून घेऊन जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.

          आपल्यावर सोपविण्यात आलेल्या लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग खात्याच्या माध्यमातून रोजगार वाढविणाऱ्या  योजना आपण सुरु करू, असेही त्यांनी नमूद केले.दरम्यान, राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.