पीएनजी गॅस आणि इंडियन ऑइल डेपो, चिकलठाणा येथे पिटलाईन मंजूर करून घेतले-डॉ. भागवत कराड

आपण सर्वजण मिळून काम करूया- डॉ. भागवत कराड यांचे आवाहन

औरंगाबाद ,२२ऑगस्ट /प्रतिनिधी :-

माझा उल्लेख साहेब नको, डॉ. कराड इतकाच पुरेसा आहे. आपण सर्वजण मिळून काम केले तरच औरंगाबादसाठी ठोस काम करता येणार आहे, असे आवाहन केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. ते हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे विविध संस्थांतर्फे आयोजित चर्चासत्रात रविवारी बोलत होते.

पुढे बोलताना डॉ. कराड म्हणाले की, आता फक्त ९३५ दिवस हातात शिल्लक आहे. फक्त मागण्या करण्याऐवजी मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सर्वांनी मिळून प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करावा. ज्यामुळे पाठपुरावा करणे सोप्पे होईल. आताच औरंगाबाद फर्स्टच्या पुढाकाराने हवामानाच्या रडारासाठी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला. यामुळे शहरापासून ५०० किलोमीटर अंतरावर हवामानाचा अंदाज घेतला जाऊ शकतो. यापद्धतीने जी कामे असतील ती योग्य पध्दतीने अहवाल सादर करून करता येतील. आजवर पीएनजी गॅस आणि इंडियन ऑइल डेपो, चिकलठाणा येथे पिटलाईन मंजूर करून घेतले,

औरंगाबाद पुणे रेल्वेचे सर्वेक्षण, मनमाड ते नांदेड रेल्वे विद्युतीकरण पाठपुरावा, विभागीय जेरीयाट्रीक सेंटरची मागणी, एम्स हॉस्पिटलची मागणी, कन्व्हेन्शन सेंटरची मागणी आणि मोठ्या आयटी पार्क साठी मागणी केलेली आहे. त्यासह पायाभूत सुविधा, उद्योग, व्यापार, रेल्वे आणि इतर विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. इथून पुढे एक एक दिवस महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रत्येक दिवसांत शहर आणि जिल्ह्याच्या पदरात योजना आणण्याची जबाबदारी माझ्याप्रमाणे आपली सर्वांची आहे.

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतिश चॅटर्जी, सीआयआयचे अध्यक्ष रमण आचगावकार, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, मासीआचे अध्यक्ष नारायण पवार आणि औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ जगन्नाथ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या प्रस्तावनेत औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतिश चॅटर्जी म्हणाले की, आतापर्यंत औरंगाबाद चा विकास करण्यात डॉ. रफिक झकेरीया यांचे नाव आवर्जून घेतले जाते. आता त्यांच्यासह डॉ. भागवत कराड यांचे नाव निश्चितच भविष्यात घेतले जाईल. औरंगाबाद फर्स्टच्या पुढाकाराने पुढील ३० वर्षाच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार करण्यात येईल. त्यात प्रामुख्याने उद्योग, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण या सहा घटकांवर भर दिला जाईल.

आमदार अतुल सावे म्हणाले की, केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. कराड यांनीऑरीकमध्ये दोन आयटी पार्क येण्यासाठी पाठपुरावा करावा आणि ऑरीकमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रातील अँकर प्रोजेक्ट आणावा, अशी मागणी केली. आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले की, डॉ. भागवत कराड यांनी जिल्ह्यातील उद्योग आणि व्यापाराला बळकटी द्यावी.

यावेळी उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, ऋषी बागला, मुकुंद भोगले, रणजित कक्कड, रितेश मिश्रा, सुनील रायथठ्ठा, रवींद्र कोंडेकर, जसवंत सिंग राजपूत, रसदीपसिंग चावला, प्रशांत देशपांडे, आशिष गर्दे, रमेश नागपाल आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद यांनी केले. आभार सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनी मानले.

या संस्थाचाही सहभाग

मॅजिक, एआयएसए, एआयसीए, एमसीटीसी, क्रेडाई, सीएएमएआयटी, पर्यटन, औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट, सराफा, कपडा आदींसह विविध संस्थाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

सगळ्या संस्थांतर्फे विविध मागण्या

यावेळी संस्थांतर्फे विविध मागण्या केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे करण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने ऑरीकचे जागतिक स्तरावर मार्केटिंग करून अँकर प्रोजेक्ट आणणे, बिडकीन येथील मेडिसिन पार्कचे काम सुरू करणे, डिफेन्स क्लस्टर कार्यान्वित करणे, माईस डेस्टिनेशन करिता प्रोत्साहन देणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग, स्कुल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्ट सुरू करणे, आयआयटी, एम्स हॉस्पिटल, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि मराठवाडा वॉटर ग्रीड आदी मागण्या करण्यात आल्या. सर्वात शेवटी प्रश्नोत्तरे झाली. यात उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. कराड यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.