टोक्यो पॅरा-ऑलिम्पिकमध्ये 54 भारतीय क्रीडापटू करणार देशाचे प्रतिनिधीत्व

सर्व 54 क्रीडापटू टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (TOPS) योजनेचा भाग

नवी दिल्ली, २२ऑगस्ट /प्रतिनिधी :-

25 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पॅरा-ऑलिम्पिकमध्ये भारताकडून 54 क्रीडापटू 9 क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. यात तिरंदाजी, अ‍ॅथलेटीक्स (ट्रॅक आणि फील्ड), बॅडमिंटन, जलतरण, भारोत्तोलन या क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. पॅरा-ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू आहे. सर्व 54 क्रीडापटूंना टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (TOPS) योजनेतून प्रशिक्षण मिळाले आहे. 

गुजरात येथील भाविना पटेल आणि सोनलबेन पटेल पॅरा टेबल टेनिस महिला एकेरीत आणि महिला दुहेरीत प्रतिनिधीत्व करणार आहेत. दोघींचीही पात्रता फेरी पहिल्याच दिवशी म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी आहे. तर, उपांत्यफेरी आणि अंतिम फेरीचे सामने 28 आणि 29 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहेत.

हरियाणाची 21 वर्षीय अरुणा तंवर टेबलटेनिसपटू बहिणीपासून प्रेरणा घेत पॅरा तायक्वांदो स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ती या स्पर्धेतील एकमेव भारतीय क्रीडापटू आहे. 2 सप्टेंबर रोजी पात्रता फेरीपासूनच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.  

पॅरा-भारोत्तोलन स्पर्धेत जयदीप आणि सकीना खातून देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. पश्चिम बंगालमधील सकीनाचे प्रशिक्षण बेंगळुरु येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात पार पडले आहे. तर, हरियाणाच्या जयदीपने रोहतक येथील राजीव गांधी स्टेडियममध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

2014 साली ग्लास्गो येथील स्पर्धेत पदक पटकावून राष्ट्रकुल स्पर्धेत विजय मिळवणारी सकीना एकमेव भारतीय महिला पॅरा-ऑलिम्पियन आहे. तसेच तिने 2018 च्या आशियाई स्पर्धांमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. बालपणी पोलिओची बाधा झालेल्या सकीनाने दहावीनंतर भारोत्तोलन प्रशिक्षण सुरु केले.

जयदीप पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत दोन्ही खेळाडूंचा सहभाग असणार आहे.