भारतात या वर्षाअखेर, 35 भूकंप निरीक्षण केंद्रे तर 2026 पर्यंत आणखी 100 भूकंप निरीक्षण केंद्रे उभारली जाणार: डॉ जितेंद्र सिंह

नवी दिल्ली ,२१ ऑगस्ट /प्रतिनिधी :- देशात या वर्षाच्या अखेरीस आणखी 35 भूकंप निरीक्षण केंद्रे उभारली जातील तसेच येत्या पांच वर्षात, अशी आणखी 100 केंद्रे देशभरात निर्माण होतील, अशी माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वीविज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज दिली. स्वातंत्र्यानंतर म्हणजे गेल्या 65 वर्षात, देशभरात केवळ 115 भूकंप निरीक्षण केंद्रे स्थापन होऊ शकली.. मात्र,आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत, देशात भूकंप निरीक्षण केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय भू-मॅगनेशियम आणि अवकाश शास्त्र – आयएजीए तसेच, आंतरराष्ट्रीय भूकंपशास्त्र आणि पृथ्वीच्या गर्भातील भौतिकशास्त्र संस्था- आयएएसपीईआय ने आयोजित केलेल्या  संयुक्त विज्ञान परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. भारतीय उपखंड, भूकंप, भूस्खलन,चक्रीवादळे, पूर, त्सुनामी अशा नैसर्गिक संकटासाठी प्रवण भाग मानला जातो. त्यामुळे अशा संकटांचा सामना करण्यासाठी मोदी सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे, असे डॉ सिंह म्हणाले.

आयएजीए आणि आयएएसपीईआय च्या या संयुक्त विज्ञान सभेतून, या विषयावर संशोधन करणारे अधिकाधिक जागतिक संशोधक निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भूगर्भात खोलवरच्या रचना आणि भू-मैगेनेशियम यातील परस्परसंबंध तसेच भूकंपकेंद्रात द्रवपदार्थाचा उपयोग, अशा विषयांवर, आंतरशाखीय अध्ययन केले जाऊ शकते. आयएजीए आणि आयएएसपीईआय  यांनी 2021 पासूनच ही संयुक्त परिषद सुरु केली आहे. भारत सरकारच्या पृथ्वीविज्ञान मंत्रालयाच्या पाठिंब्याने सीएसआयआर-एनजीआरआय ने यंदा ही परिषद आयोजित केली आहे.

या संयुक्त परिषदेत होणाऱ्या विविध मालिका सत्रात, पृथ्वी विज्ञान व्यवस्थेचे शास्त्र जाणून घेण्यासाठी नवनवे पैलू समोर येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.