पिक विमा देण्यास टाळाटाळ केल्याविरोधातील याचिकेची सुनावणी सप्टेंबर महिन्यांत 

औरंगाबाद,१८ऑगस्ट /प्रतिनिधी :-शेतकऱ्यांना पिक विमा देण्यास टाळाटाळ केल्याविरोधात दाखल याचिका बुधवारी  सुनावणीस निघाली असता न्‍यायमुर्ती संजय व्ही. गंगापुरवाला आणि न्‍यायमुर्ती आर.एन. लड्डा यांच्‍या खंडपीठाने चार आठवड्यांनी सुनावणी ठेवली आहे. याचिकेत यापूर्वी झालेल्या सुनावणीत पिक विमा कंपनीसह केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्‍यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान होऊनही विमा कंपनीने विमा दिला नाही. त्यामुळे याचिकाकर्ते नवनाथ अंबादास शिंदे यांच्यासह उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर येथील १४ शेतकऱ्यांनी  संजय वाकुरे यांच्या मार्फत खंडपीठात याचिका दाखल केली.  
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर महसूल विभागातर्फे पंचनामे करण्यात आले होते. शासनाच्या परिपत्रकानूसार ज्या भागात २५ टक्के पेक्षा कमी नुकसान झाले तर वैयक्तीक पातळीवर शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा आणि ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले असेल तर त्या परिसरातील पिक विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे आदेश आहेत. उस्मानाबाद आणि परिसरात महसूल प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार १ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झालेले आहे. विशेष म्हणजे नुकसानभरपाई देण्यासंदर्भात ५ मार्च २०२१ रोजी राज्य शासनाने विमा कंपन्यांना कळवले होते, तरीही विमा कंपन्यांनी केवळ ७२ तासामध्ये वैयक्तीक तक्रार अर्ज केला नसल्याचे कारण देत विमा नाकारला असे याचिकेत म्हटले आहे.