आजचा नव भारत आपल्या खेळाडूंवर पदक प्राप्तीसाठी दडपण न लादता खेळाडूंनी आपली सर्वोत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा ठेवतो – पंतप्रधान

टोक्यो 2020 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय दिव्यांग खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधला संवाद

  • आपली गावे आणि दुर्गम भागात उदंड प्रतिभा असून दिव्यांग खेळाडूंचे पथक हे त्याची साक्ष – पंतप्रधान
  • देश आज खेळाडूंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे-पंतप्रधान
  • स्थानिक कौशल्य हुडकण्यासाठी खेलो इंडिया केंद्रांची सध्याची 360 ही संख्या वाढवून 1,000 पर्यंत नेणार –पंतप्रधान
  • भारतात क्रीडा संस्कृती बहरावी यासाठी आपले मार्ग आणि व्यवस्थेत सुधारणा जारी ठेवतानाच मागच्या पिढीच्या मनातली भीती दूर करायला हवी – पंतप्रधान
  • देश खुलेपणाने आपल्या खेळाडूंना मदत करत आहे- पंतप्रधान
  • तुम्ही कोणत्याही राज्यातले, कोणतीही भाषा बोलणारे असलात तरी या सर्वापेक्षा आज सर्व जण ‘टीम इंडिया’ आहात,हीच भावना समाजाच्या प्रत्येक स्तरावर प्रत्येक भागात नांदावी-पंतप्रधान
  • याआधी दिव्यांगासाठीच्या सुविधांकडे कल्याण या दृष्टीने पाहिले जात असे आज उत्तरदायीत्वाचा भाग म्हणून काम केले जाते – पंतप्रधान
  • दिव्यांगजनाचे अधिकार यासाठीचा कायदा आणि सुगम्य भारत अभियान यासारख्या उपक्रमातून देशातल्या प्रतिभेला आत्मविश्वासाचे बळ देण्या बरोबरच त्यांच्या जीवनात परिवर्तनही घडवत आहे- पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोक्यो 2020 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय दिव्यांग खेळाडूंचे पथक,त्यांचे कुटुंबीय, पालक आणि प्रशिक्षक यांच्याशी दूर दृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यावेळी उपस्थित होते.

या खेळाडूंशी संवाद साधताना पंतप्रधानांनी खेळाडूंचा आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीची प्रशंसा केली. पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक सहभागी होत आहे याचे श्रेय त्यांनी खेळाडूंच्या कठोर मेहनतीला दिले.या खेळाडूंशी संवाद साधल्या नंतर टोक्यो 2020  पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारत नवा इतिहास घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजचा नव भारत आपल्या खेळाडूंवर पदक प्राप्तीसाठी अपेक्षांचे ओझे  न लादता खेळाडूंनी आपली सर्वोत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा ठेवतो.नुकत्याच आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा उल्लेख करत, आपला विजय असो वा पराजय, आपल्या खेळाडूंच्या प्रयत्नांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभा राहतो असे  पंतप्रधान म्हणाले.

या क्षेत्रात शारीरिक सामर्थ्याबरोबरच मानसिक सामर्थ्याचे महत्वही त्यांनी विशद केले. दिव्यांग खेळाडूंनी आपल्या शारीरिक परिस्थितीवर मात करत त्यासह आगेकूच केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

नव्या जागेचे दडपण, नवे लोक आणि आंतरराष्ट्रीय वातावरण यासारखे मुद्दे लक्षात घेऊन क्रीडा मानसशास्त्राशी निगडीत या पथकातल्या खेळाडूंसाठी कार्यशाळा आणि चर्चा सत्रे याद्वारे तीनसत्रे आयोजित करण्यात आली.

पंतप्रधान म्हणाले की, आपली  गावे  आणि दुर्गम भाग प्रतिभेने परिपूर्ण आहेत आणि पॅरा खेळाडूंचा चमू त्याचे जिवंत उदाहरण आहे.ते म्हणाले, आपण आपल्या युवा वर्गाचा विचार केला पाहिजे आणि त्यांना सर्व संसाधने आणि सुविधा मिळाल्या पाहिलेत हे सुनिश्चित करायला हवे. पदके जिंकण्याची क्षमता असलेले अनेक युवा खेळाडू या क्षेत्रात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.आज देश त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, ग्रामीण भागावर विशेष लक्ष दिले जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले.स्थानिक पातळीवरील प्रतिभा ओळखण्यासाठी 360 खेलो इंडिया केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. लवकरच ही संख्या 1,000 केंद्रांपर्यंत वाढवली जाईल. खेळासाठीचे साहित्य , मैदाने आणि इतर संसाधने तसेच  पायाभूत सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या जात आहेत.देश आपल्या खेळाडूंना खुल्या मनाने मदत करत आहे.देशाने ‘लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजने’द्वारे आवश्यक सुविधा आणि उद्दिष्टे पुरवली, असे पंतप्रधानांनी सांगितले.

जर एखाद्या मुलाला खेळांमध्ये रस असेल मात्र  एक किंवा दोन खेळ वगळता अन्य खेळांमध्ये कारकीर्द घडण्याची  शक्यता नसल्याबद्दल त्याच्या कुटुंबांला चिंता वाटत असे मात्र आपल्याला अग्रस्थानी पोहोचायचे असेल तर जुन्या पिढीच्या हृदयात घर करून असणारी ही भीती दूर करायला हवी असा आग्रह पंतप्रधानांनी धरला.  ही असुरक्षिततेची भावना संपुष्टात आणणे आवश्यक आहे .भारतातील क्रीडा संस्कृती विकसित करण्यासाठी आपल्याला आपले मार्ग आणि व्यवस्था सुधारत राहावी लागेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला. आंतरराष्ट्रीय खेळांना प्रोत्साहन देण्याबरोबरच पारंपरिक खेळांना एक नवीन ओळख दिली जात आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले. मणिपूरमधील इम्फाळमध्ये क्रीडा विद्यापीठाची स्थापना, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात खेळांना स्थान आणि खेलो इंडिया चळवळ ही त्या दिशेने टाकलेली महत्त्वाची पावले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी क्रीडापटूंना सांगितले की , ते कोणत्याही खेळाचे प्रतिनिधीत्व करत असले तरी क्रीडापटू हे ;एक भारत श्रेष्ठ भारत’ ही भावना बळकट करतात.  “तुम्ही कोणत्या राज्य, प्रदेशाशी संबंधित आहात,तुम्ही कोणती भाषा बोलता, या सर्वांपेक्षा आज तुम्ही‘ टीम इंडिया ’आहात.ही भावना आपल्या समाजातील प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक स्तरावर झिरपली पाहिजे, यावर पंतप्रधानांनी जोर दिला.

पंतप्रधान म्हणाले की, यापूर्वी दिव्यांगजनांना सुविधा देणे हे कल्याण मानले जात होते,आज देश जबाबदारीचा एक भाग म्हणून हे काम करत आहे.म्हणूनच, दिव्यांग जनसमूहाला सर्वसमावेशक सुरक्षा प्रदान करण्यासाठी  संसदेने ‘दिव्यांग व्यक्तींसाठी अधिकार’ या कायद्यासारखा कायदा केला.

ते म्हणाले, ‘सुगम्य भारत अभियान’ हे या नव्या विचारांचे  सर्वात मोठे उदाहरण आहे.आज शेकडो सरकारी इमारती, रेल्वेस्थानके , रेल्वे गाड्यांचे  डबे, देशांतर्गत विमानतळ आणि अन्य  पायाभूत सुविधा दिव्यांगस्नेही  बनवल्या जात आहेत.भारतीय सांकेतिक भाषेचा मानक शब्दकोश, एनसीईआरटीच्या पुस्तकांचा सांकेतिक भाषेत अनुवाद यांसारखे प्रयत्न दिव्यांगजनांच्या जीवनात परिवर्तन करत आहेत.आणि देशभरातील असंख्य प्रतिभेला आत्मविश्वास देत आहेत असे पंतप्रधानांनी समारोप करताना सांगितले.

9 क्रीडा प्रकारात सहभागी होणारे  54 पॅरा खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी टोक्योला  जात आहेत.पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारा  भारताचा हा  आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू आहे.