ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण न करणाऱ्या गुत्तेदारांवर गुन्हे दाखल करावेत-पालकमंत्री अमित देशमुख

लातूर जिल्ह्यातील 3 लाख 80 हजार ग्रामीण कुटुंबापैकी 1 लाख 65 हजार कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा

लातूर, दि.20:- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत बारमाही पाणीपुरवठा करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवावी व पाणीपुरवठा बाबत लातूर जिल्ह्याचा एक वेगळा दर्जा व लौकिक निर्माण करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या आढावा बैठक पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता श्री एस. कायंदे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील गावे व वाड्यांची संख्या जवळपास बाराशे असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण 3 लाख 80 हजार 377 इतके कुटुंबे वास्तव्य करत आहेत. या सर्व कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नावीन्यपूर्ण संकल्पना राबवावी व ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला प्रतिमाणशी आवश्यक असलेला पाणीपुरवठा करून संपूर्ण राज्यात लातूर जिल्ह्याचा लौकिक वाढवावा असे त्यांनी निर्देशित केले. त्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने लातूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातून पाण्याच्या कायमस्वरूपी स्त्रोताची माहिती घ्यावी व सुरुवातीला त्या ठिकाणाहून किमान एक तरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करून ती यशस्वीपणे चालवावी. अशा योजनांचे प्रस्ताव तात्काळ करून ते मंजुरीसाठी सादर करावेत. पानचिंचोली व बाभळगाव पाणीपुरवठा योजनाबाबत ही तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री श्री. देशमुख यांनी दिले. पानचिंचोली पाणीपुरवठा योजना बऱ्याच वर्षापासून बंद आहे. तरी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत. त्याप्रमाणेच एमजीपी मार्फत हस्तांतरित केलेल्या पाणीपुरवठा योजनाही बहुतांश बंद असल्याचे दिसून येत आहे तरी एमजी पिणे पाणीपुरवठा योजनांची कामे व्यवस्थितपणे पार पाडावीत तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे चालवण्याचे प्रयत्न करावेत असे श्री देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात किमान एका ठिकाणी तरी पाण्याचा कायमचा स्त्रोत शोधावा व त्या ठिकाणाहून प्रादेशिक पाणीपुरवठा योजना करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश श्री देशमुख यांनी दिले. तसेच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बारमाही पाणीपुरवठा करणाऱ्या गावांची यादी सादर करावी. या गावातील 100 टक्के कुटुंबापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा झालेला असला पाहिजे असे पालकमंत्री देशमुख यांनी सुचित केले. त्याप्रमाणेच ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केलेल्या सर्व पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टीची वसुली शंभर टक्के झाली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील ज्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण आहेत व संबंधित गुत्तेदार यांनी ते कामे पूर्ण केलेली नाहीत त्या गुत्तेदारांवर संबंधित यंत्रणांनी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

प्रारंभी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शेलार यांनी लातूर जिल्ह्यात 1181 गावे व वाड्या असून ग्रामीण लोकसंख्या 18 लाख 87 हजार इतकी असल्याचे सांगितले. तसेच ग्रामीण भागात 3 लाख 80 हजार 377 इतकी कुटुंबे असून त्यापैकी 1 लाख 65 हजार 992 कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत शासन निकषाप्रमाणे जिल्ह्यातील शंभर गावे हाताळण्यात आली आहेत व उर्वरित 1081गावे अंशतः हाताळलेली आहेत असे त्यांनी सांगितले. तसेच नव्याने प्रस्तावित 185 योजनांचे अंदाजित किंमत 311 कोटी 72 लाख इतकी असून या वर्षाकरिता 73 कोटी 98 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री कायंदे यांनी जिल्ह्यात प्राधिकरणामार्फत केलेल्या पाणीपुरवठा योजनांची माहिती दिली. तसेच पानचिंचोली पाणीपुरवठा योजना मसलगा प्रकल्पावर असून त्या योजनांच्या दुरुस्तीचा आराखडा सादर केलेला आहे त्या आराखड्यास मान्यता मिळाली तर ही योजना तात्काळ सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *