मशिप्र मंडळाचे कार्यकारिणी सदस्य अभिजीत आवरगांवकर यांचे निधन

औरंगाबाद:- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य अभिजीत आवरगांवकर (वय.41, रा.विश्रामबाग कॉलनी) यांचे सोमवारी (दि.16) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भावंडे असा मोठा परिवार आहे. माजी खासदार तथा मशिप्र मंडळाचे माजी उपाध्यक्ष स्व.रामराव आवरगांवकर यांचे ते नातू होत. पुष्पनगरी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मशिप्र मंडळाचे सरचिटणीस आ.सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम, कोषाध्यक्ष डॉ.अविनाश येळीकर, कार्यकारिणी सदस्य विवेक भोसले, त्रिंबक पाथ्रीकर, डॉ.राजीव खेडकर यांची उपस्थिती होती.

      शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक क्षेत्रात कल्पकपणे कार्य करणारे आणि आपल्या योजनांना काटेकोरपणे पूर्णत्वास घेऊन जाणारा एक सच्चा सहकारी गमावल्याने तीव्र दु:ख होत आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध ठिकाणी कार्यरत असणार्‍या देवगिरी ग्लोबल स्कूल या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना नावारूपास आणण्यात अभिजीत आवरगांवकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या जाण्याने मशिप्र मंडळाची कधीही भरून न येणारी हानी झाली असल्याचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.