कोणीही आपल्या भूभागात नाही, तसेच कोणीही आपले कुठलेही ठाणे ताब्यात घेतलेले नाही: पंतप्रधान

Banner
The Prime Minister, Shri Narendra Modi holding an All Party Meeting via video conferencing to discuss the situation in India-China border areas, in New Delhi.
  • भारताला शांतता आणि मैत्री हवी आहे, मात्र सार्वभौमत्व राखणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य : पंतप्रधान
  • लष्कराला आवश्यक त्या सर्व कारवाईसाठी पूर्ण सूट देण्यात आली आहे: पंतप्रधान
  • आपल्या सीमा अधिक सुरक्षित करण्यासाठी सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांच्या विकासाला सरकारचे प्राधान्य: पंतप्रधान
  • राष्ट्रीय सुरक्षा आणि पायाभूत सुविधांची उभारणी यासाठी आवश्यक ती सर्व पावले यापुढेही जलद गतीने टाकली जातील : पंतप्रधान
  • सर्वपक्षीय नेत्यांकडून सरकारसोबत खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही, पंतप्रधानांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास

नवी दिल्ली, 19 जून 2020:भारत-चीन सीमावर्ती भागातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष या बैठकीत सहभागी झाले होते.

भारतीय सैन्यदलांचे शौर्य

आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांच्या पाठीशी आपण सगळे जण एक होऊन खंबीरपणे उभे आहोत, ही बाब पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली. या जवानांचे शौर्य आणि हिमतीवर आपल्या सर्वांचा पूर्ण विश्वास आहे, असेही ते म्हणाले. या सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून आपल्याला, हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना ग्वाही द्यायची आहे की या प्रसंगी संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे.

बैठकीच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, आपल्या कोणत्याही भूभागावर कोणीही नाही आणि कोणीच सैन्याचे कुठले ठाणे (पोस्ट) काबीज केलेले नाही. आपल्या 20 जवानांनी लदाख येथे शौर्य गाजवत देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, मात्र त्याचवेळी आपल्या मातृभूमीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवला, असे पंतप्रधान म्हणाले. या जवानांचे शौर्य आणि बलिदान देश कायम लक्षात ठेवेल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

Banner

LAC म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर, चीनने जे कृत्य केले, त्यामुळे संपूर्ण देशभरात संताप आणि दुःखाची भावना आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशाचे संरक्षण करण्यासाठी आपली सैन्यदले प्रयत्नात कोणतीही कसूर करणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी सर्व नेत्यांना दिली. सीमेवर सैन्य तैनात करणे असो, कोणती कारवाई असो किंवा मग प्रत्युत्तर द्यायचे असो, आपली सैन्यदले देशरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत. आज आपला देश एवढा सक्षम आहे, की कोणीही आपल्या भूमीचा एक इंच तुकड्याकडे बघण्याची हिंमत देखील करु शकणार नाही, असे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. आज, भारतीय फौजा कोणत्याही क्षेत्रात एकत्रितपणे पुढे जाण्यास सक्षम आहेत. एकीकडे, लष्कराला आवश्यक ती सर्व कारवाई करण्यासाठी पूर्ण सूट देण्यात आली आहे, तर दुसरीकडे राजनैतिक मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून भारताने चीनला आपली भूमिका स्पष्टपणे सांगितली आहे,अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

सीमाभागात पायाभूत सुविधांना गती

भारताला शांतता आणि मैत्री हवी आहे, मात्र, आमचे सार्वभौमत्व अबाधित राखणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आपल्या देशाच्या सीमा अधिक सुरक्षित करण्यासाठी सीमाभागात पायाभूत सुविधा उभारण्याला सरकारने प्राथमिकता दिली आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. लढावू विमाने, अत्याधुनिक हेलीकॉप्टर्स, क्षेपणास्त्र संरक्षण व्यवस्था आणि आपल्या सैन्यदलाला आवश्यक त्या साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे. अलीकडेच विकसित केलेल्या पायाभूत सुविधांमुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गस्त घालण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे, पर्यायाने आपले जवान सीमाभागात अधिक दक्ष राहून गरज पडल्यास, प्रत्युत्तर देऊ शकतात. आधी ज्यांच्या या परिसरात विनासायास हालचाली होऊ शकत, त्यांच्या हालचालींकडे आता आपले जवान नित लक्ष देऊ शकतात. यामुळेच कधीकधी सीमेवर तणाव वाढतो, असे त्यांनी सांगितले. आता उत्तम पायाभूत सुविधा निर्माण झाल्यामुळे, जवानांना या दुर्गम प्रदेशातही आवश्यक ते सामान आणि गरजेच्या वस्तू मिळू शकतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

देशाचे आणि नागरिकांचे कल्याण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असे सांगत, पंतप्रधान म्हणाले की, व्यापार असो, दळणवळण असो किंवा मग दहशतवाद विरोधी कारवाई असो, केंद्र सरकार बाह्य शक्तींच्या दबावासमोर समर्थपणे उभे राहिले आहे.राष्ट्रीय सुरक्षा आणि आवश्यक त्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी, आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असून, भविष्यातही जलद गतीने ही पावले उचलली जातील, असे मोदी यांनी सांगितले. आपल्या सैन्यदलांमध्ये देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची पूर्ण क्षमता असून त्यांना कोणतीही कारवाई करण्याची सूट देण्यात आली आहे, अशी ग्वाही त्यांनी पुन्हा एकदा दिली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील या बैठकीला उपस्थित होते. सीमेवर शहीद झालेल्या जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही असे त्यांनी सांगितले. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी यावेळी भारत-चीन दरम्यान सीमा व्यवस्थापनाबाबत याआधी झालेल्या सर्व करारांची थोडक्यात माहिती दिली. 2014 साली पंतप्रधानांनी दिलेल्या सुचनेनुसार, सीमाभागात पायाभूत सुधारणांचा विकास करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 1999 साली केलेल्या निर्णयाला प्राधान्य दिले जात आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. तसेच अलीकडेच सीमेवर झालेल्या घडामोडींचीही माहिती दिली. 

सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली मते

सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांनी यावेळी भारतीय जवानांने लडाखमध्ये लढतांना दाखवलेल्या अतुलनीय शौर्याचे कौतुक केले.. आज या संकटकाळात आमच्या देशाच्या नेतृत्वावर विश्वास असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, सरकारसोबत खंबीरपणे उभे राहण्याची कटिबद्धताही व्यक्त केली. तसेच, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांनी आपले विचार आणि सूचनाही या बैठकीत मांडल्या.

आपला पक्ष या काळात सरकारसोबत खंबीरपणे उभा आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. अशा काळात पक्ष आणि पक्षनेत्यांमध्ये मतभेद राहू नयेत जेणेकरुन त्या मतभेदांचा गैरफायदा दुसऱ्या देशांना मिळू शकेल, अशी भावना नितीशकुमार यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे, असे चिराग पासवान यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करत संपूर्ण देश आज त्यांच्यासोबत उभा आहे, अशी भावना व्यक्त केली.

श्रीमती सोनिया गांधी यांनी म्हटले की या संपूर्ण घटनेचे तपशील अद्यापही सर्वांना मिळालेले नाही तसेच देशाची गुप्तचर यंत्रणा तसेच इतर मुद्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सैनिकांनी शस्त्रे बाळगावीत की नाही हे निर्णय आंतरराष्ट्रीय करारान्वये निश्चित केले जातात त्यामुळे राजकीय पक्षांनी अशा मुद्द्यांवर मत व्यक्त करताना संवेदनशीलता बाळगावी, अशी अपेक्षा शरद पवार यांनी या बैठकीत बोलतांना व्यक्त केली. पंतप्रधान ईशान्य भारतात पायाभूत सुविधा उभारण्याचे काम करत असून, हे काम पुढेही सुरूच ठेवायला हवे, असे मत कोर्नाड संगमा यांनी व्यक्त केले. तर, ही राजकारण करण्याची वेळ नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही निर्णय घेतल्यास, आपण त्यांच्या सोबत ठामपणे उभे राहू, अशी भावना मायावती यांनी व्यक्त केली. या प्रकरणी पंतप्रधानांनी अलीकडेच दिलेल्या निवेदनाचे एम के स्टेलीन यांनी स्वागत केले.या बैठकीत सहभागी होऊन आपली मते आणि सूचना मांडल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *