राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची जय्यत तयारी

  • देश, ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’साजरा करतो आहे.
  • पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली उद्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन सोहळा
  • सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रासह सर्व ऑलिंपिकपटू कार्यक्रमाचे विशेष पाहुणे
  • कोरोना  योद्ध्यांसाठी विशेष आसनव्यवस्था
  • हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्समधून अमृत आकारात पुष्पवृष्टी केली जाणार

नवी दिल्ली,१४ ऑगस्ट /प्रतिनिधी :- देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देश, ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करत आहे. संपूर्ण देशात, देशभक्तीचे चैतन्यमयी वातावरण आहे. भारत सरकारच्या विविध मंत्रालयांद्वारे तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह, सैन्यदले आणि जनताही देशभरात, गेल्या काही दिवसांपासून या ऐतिहासिक प्रसंगानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत

उद्या, म्हणजेच 15 ऑगस्ट 2021 ला, या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन मुख्य सोहळा होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर ते लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करतील.  पंतप्रधानांनी मार्च 2021 मध्ये, गुजरातमधील साबरमती आश्रमातून ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अभियानाची’ सुरुवात केली होती. हा उत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणार आहे.

उद्या सकाळी पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन झाल्यावर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग,संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव डॉ अजय कुमार त्यांचे औपचारिक स्वागत करतील. त्यानंतर, संरक्षण सचिव पंतप्रधानांना दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग, लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा, AVSM यांचा परिचय करुन देतील. त्यानंतर, जनरल ऑफिसर कमांडिंग पंतप्रधानांना सलामी तळाकडे घेऊन जातील. या ठिकाणी तिन्ही सैन्यदल प्रमुख आणि दिल्ली पोलिस गार्ड पंतप्रधानांना सलामी देतील. यानंतर, पंतप्रधान मानवंदना स्वीकारतील.

पंतप्रधानांना मानवंदना देणाऱ्या पथकात,  लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलिस यांचा प्रत्येकी  एक अधिकारी आणि 20 जवान या पथकात असतील.यावर्षी भारतीय नौदल समन्वय सेवा म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. मानवंदना पथकाची कमान कमांडर पीयूष गौर यांच्याकडे आहे. पंतप्रधानांच्या नौदल मानवंदना पथकाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर सुने फोगट करतील तर लष्कराच्या पथकाचे नेतृत्व मेजर विकास संगवान करतील. हवाई दल तुकडीचे नेतृत्व स्क्वाड्रन  लीडर ए बेरवाल करतील. दिल्ली पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त पोलिस उप महासंचालक (पश्चिम जिल्हा) सुबोध कुमार गोस्वामी करतील.

मानवंदना स्वीकारल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्याकडे प्रस्थान करतील. तिथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत,लष्कर प्रमुख एम एम नरवणे, नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग आणि हवाई दल प्रमुख आर के एस भदौरिया त्यांचे स्वागत करतील. दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग पंतप्रधानांना लाल किल्याच्या बुरुजावरील व्यासपीठापर्यंत घेऊन जातील.

ध्वजारोहण झाल्यानंतर, राष्ट्रध्वजाला  राष्ट्रीय सलामी दिली जाईल. ध्वजारोहण आणि सलामीच्या वेळी नौदलाचे 16 जवानांचे पथक राष्ट्रगीत धून वाजवतील. या बॅन्ड  पथकाचे नेतृत्व एमसीपीओ व्हीनसेंट जॉन्सन करतील.

लेफ्टनंट कमांडर पी  प्रियंवदा साहू पंतप्रधानांना राष्ट्रध्वज फडकवतांना सहाय्य करतील. त्याचवेळी, एलिट 2233 फील्ड बॅटरी पथकाचे बंदूकधारी  बंदुकीच्या 21 फैरी झाडून राष्ट्रध्वजाला सलामी देतील. लेफ्टनंट कर्नल  जितेंद्र सिंग मेहता, एस एम, या पथकाचे नेतृत्व करतील आणि नायब सुभेदार अनिल चंद गन पोझिशन ऑफिसर असतील.

राष्ट्रध्वज मानवंदना पथकात, पांच अधिकारी आणि तिन्ही सैन्यदले व दिल्ली पोलिसांचे 130 जवान असतील. हे संपूर्ण पथक ध्वजारोहण  सुरु असतांना राष्ट्रध्वजाला सलामी देईल. या पथकाचे नेतृत्व भारतीय नौदलाचे कमांडर कुलदीप एम नेरळकर करतील.

 राष्ट्रध्वज मानवंदना पथकात नौदल तुकडीचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर प्रवीण सारस्वत करतील तर लष्कराच्या तुकडीची जबाबदारी, मेजर अंशूल कुमार यांच्याकडे तसेच, हवाई दलाचे नेतृत्व स्क्वाड्रन  लीडर रोहित मालिक यांच्याकडे असेल. दिल्ली पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त पोलिस उपायुक्त ( दक्षिण-पश्चिम जिल्हा )अमित गोयल यांच्याकडे असेल.

या कार्यक्रमात, सुवर्णपदक विजेता भालाफेक पटू नीरज चोप्रा सह 32 ऑलिंपिक विजेते खेळाडू देखील सहभागी होणार आहेत. त्याशिवाय, साई- म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे दोन अधिकारी यांना उद्याच्या कार्यक्रमाचे विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच इतर 240 ऑलिंपिक खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि साई चे अधिकारी  यांना लाल किल्ल्यासमोरच्या  ज्ञान पथाची शोभा वाढवण्यासाठी  आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय खेळांडूनी यंदाच्या टोक्यो ऑलिंपिकमध्ये आजवरची सर्वोत्तम, कामगिरी करत एक सुवर्ण,दोन रौप्य आणि चार कांस्य पदके पटकावली आहेत. 

तसेच कोविड-19 विरोधातल्या लढ्यात, ज्यांनी आघाडीवर राहून या अदृश्य शत्रूशी लढा दिला, अशा सर्व कोरोना योध्यासाठी यावेळी किल्याच्या दक्षिण भागात वेगळी आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

यावर्षी पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिन सोहळ्यात, पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, या संपूर्ण स्थळावर हवाई दलाच्या Mi 17 1 V हेलिकॉप्टरने, अमृत आकारात पुष्पवृष्टि केली जाईल.

पहिल्या हेलिकॉप्टरचे कॅप्टन विंग कमांडर बलदेव सिंग बिश्त असतील. तर दुसऱ्या हेलिकॉप्टरची धुरा  विंग कमांडर निखिल मेहरोत्रा यांच्याकडे असेल.

पुष्पवृष्टी झाल्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्राला उद्देशून  भाषण संपल्यानंतर, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स राष्ट्रगीत गातील. विविध शाळांमधील एनसीसीचे 500 कॅडेट्स (लष्कर, नौदल आणि हवाई दल)  या कार्यक्रमात सहभागी होतील.