औरंगाबादचा विकास हाच ध्यास- पालकमंत्री सुभाष देसाई

मसिआच्या नूतन सभागृहाची केली पाहणी

उद्योजक, पदाधिकारी यांच्याशी साधला संवाद

औरंगाबाद,१४ ऑगस्ट /प्रतिनिधी :- औरंगाबादच्या विकासाला प्राधान्य आहे. येथील विकास हाच ध्यास असल्याचे उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले. त्याचबरोबर शहराचा पाणी पुरवठा, घन कचरा व्यवस्थापन, रस्ते, ऑरीक, क्लस्टर विकास आदी माध्यमातून शहराचा झपाट्याने विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Displaying 0D1A7847.JPG

महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ (एमआयडीसी), मनपा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मसिआ आणि प्रयास फाऊंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने मसिआच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात मंत्री देसाई बोलत होते. यावेळी आमदार अंबादास दानवे,अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, मसिआचे अध्यक्ष नारायण पवार आदींसह मसिआचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले,  यापूर्वी मसिआ पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या भेटीत सध्या उभारण्यात येत असलेल्या सभागृहाबाबत चर्चा झाली होती. सभागृह वेगाने तयार होतेय, याचा मनस्वी आनंद होतो आहे. मसिआ कार्यालयाच्या परिसरातील या नवीन सभागृहात कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहे, ही कौतुकाची बाब आहे. कोरोनासारख्या कठीण काळात उद्योगांना शासनाने साथ दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही, याप्रकारेच उद्योगांनीही शासनाला साथ दिली. शासनाचे सर्व नियम पाळत उद्योगाला उद्योजकांनी चालना दिली.  औरंगाबादचे पर्यटन आणि उद्योग शक्तीस्थळे असल्याने शासनानेही यावर लक्ष  दिले.

Displaying 0D1A7918.JPG

मसिआने लघु उद्योग आणि कृषी याबरोबरच अन्न प्रक्रिया उद्योगाबाबतही प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शासन औरंगाबादच्या वस्तूंचे जगभर ब्रँडिंग करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. त्यातीलच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने राज्यात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी भेट वस्तू म्हणून हिमरू शाल आण‍ि पैठणी साडी देण्यात येत आहे. त्यामुळे येथील उद्योगालाही चालना  मिळण्यास मदत होणार असल्याचे देसाई म्हणाले. शिवाय येथील लघु उद्योग मोठे व्हावेत, यासाठी शासन कटीबद्ध आहे. औरंगाबादशी जुने नाते असल्याने या भागाचा विकास हेच ध्येय असल्याचे यावेळी देसाई म्हणाले.

आमदार दानवे यांनी शासन सर्व उद्योजकांशी पाठिशी आहे. मोठे उद्योग औरंगाबादेत येत आहेत. पालकमंत्री देसाई यांच्या नेतृत्त्वात उद्योगनगरीतील विविध प्रश्न वेळेत सोडविण्यात येत आहेत, असे सांगत उद्योजकांचे प्रश्न सूटत असल्याबाबत आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मसिआचे पवार यांच्याहस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Displaying 0D1A7725.JPG

पालकमंत्री देसाई यांच्याकडून सभागृहाची पाहणी

मस‍िआच्यावतीने उभारण्यात येत असलेलया नवीन सभागृहाची पाहणी पालकमंत्री देसाई यांनी केली. या पाहणीनंतर या सभागृहाची ध्वनी चित्रफित देखील मसिआच्यावतीने पालकमंत्री यांना दाखविण्यात आली. मसिआच्यावतीने दीड हजार सक्रीय सदस्यांसह करण्यात येत असलेला कौशल्य विकास, महिला सशक्तीकरण, नवउद्योजकांना मार्गदर्शन, रोजगार संधी आदी उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली. 

क्रेडाई पदाधिकाऱ्यांशी संवाद

मराठवाड्यात आयटी पार्क महत्त्वाचा आहे. शेंद्रा-बिडकीन हायवे प्राधान्याने करण्यात येईल, त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. औद्योगिक मंडळ, मनपा, महसूल विभागाशी संबंधित प्रश्न सोडविण्यात येतील,असे सांगत क्रेडाईच्या सूचनांचे पालकमंत्री देसाई यांनी स्वागत केले. त्याचबरोबर क्रेडाईचे पदाधिकारी आणि नगर विकास मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन इतर विषय देखील सोडविण्याची ग्वाही मंत्री देसाई यांनी मसिआच्या सभागृहात क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिली. यावेळी आमदार दानवे, उद्योजक श्री. जबिंदा, प्रवीण सोमाणी, प्रमोद खैरनार आदींसह क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. सोमाणी यांनी यावेळी क्रेडाईच्यावतीने सूचना मांडल्या.

चिकलठाणा परिसरात वृक्षारोपण

चिकलठाणा एमआयडीसीच्या खुल्या परिसरात मंत्री देसाई यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार अंबादास दानवे, मसिआचे अध्यक्ष नारायण पवार, उद्योजक यांची उपस्थिती होती.