हिंगोली शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतींमुळे शहराच्या वैभवात भर : पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

हिंगोली,१३ ऑगस्ट /प्रतिनिधी :- नगर परिषदेच्या वतीने हिंगोली शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या नगर परिषद प्रशासकीय इमारत, नवीन नाट्यगृह, कै. शिवाजीराव देशमुख सभागृहामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले.

येथील नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या हिगोली नगरपरिषद प्रशासकीय इमारत, नवीन नाट्यगृह आणि कै.शिवाजीराव देशमुख सभागृहाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे अध्यक्ष बाबाराव बांगर हे होते. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांची उपस्थिती होती.

हिंगोली शहरात उभारण्यात आलेल्या या नवीन वास्तूंमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.  ही सर्व कामे लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे झाली आहेत. या इमारतीमधून पारदर्शकपणे कारभार करुन सर्वसामान्यांची कामे करावीत. हिंगोली शहराचा नावलौकिक व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावे. यासाठी मी आपल्या पाठीशी आहे, असे सांगून हिंगोली नगर परिषदेच्या इमारतीत फर्निचर, नाट्यगृहासाठी खुर्च्या व साऊंड सिस्टीम तयार करण्यासाठी तसेच विविध चौकांचे सुशोभिकरण निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले. हिंगोली नगर परिषदेने माझी वसुंधरा या स्पर्धेत सहभाग घेऊन स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्रात प्रथम आल्याबद्दल सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागात आय लव हिंगोली असे ठिकाण निर्माण करणारी हिंगोली नगर परिषद ही राज्यात पहिली आहे. त्यामुळे हिंगोलीने पॅटर्न निर्माण केला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली  व  औंढा रोडवरील सभागृहाला स्व. राजीव सातव यांचे नाव देण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, आमदार तान्हाजी मुटकुळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.यावेळी हिंगोली नगर परिषदेचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.