राज्यात २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान सामाजिक ऐक्य पंधरवडा – अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

२० ऑगस्ट रोजी साजरा होणार सद्भावना दिवस

मुंबई, दि. १२ : राज्यात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंतीदिन २० ऑगस्ट हा “सद्भावना दिवस” म्हणून तर २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ हा पंधरवडा “सामाजिक ऐक्य पंधरवडा” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावना, सौहार्दभाव वृध्दींगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करुन सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे व राज्यातील तसेच देशातील सामाजिक ऐक्य, सौहार्द, सद्भावना वाढीस लागण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले. केंद्रीय युवा व क्रिडा मंत्रालय यांच्या निदेशानुसार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंती दिवस २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “सद्भावना दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या कार्यालयीन ज्ञापनान्वये देण्यात आलेल्या निदेशास अनुसरुन “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्यात येणार आहे.याअनुषंगाने शासन परिपत्रकाद्वारे विविध सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतरविषयक नियमांचे पालन करून सद्भावना दिवस साजरा करण्यात यावा, सर्व उपस्थितांना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यास सांगण्यात यावे. महसूल विभागाच्या आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातून ऑनलाईन, लाऊड स्पिकरमार्फत सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी जागेवर उभे राहून किंवा प्रांगणात सामाजिक अंतरविषयक नियमांचे पालन करून सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घ्यावी. यावर्षी सद्भावना शर्यत आयोजित करू नये. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहाता यावा यासाठी वेबसाईटव्दारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करावे. बृहन्मुंबईत लोकांच्या विशेषतः युवकांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्य संचालक यांनी सद्भावना या विषयावर वेबिनार इत्यादीव्दारा संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत. विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळा बंद असल्याने तेथे यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मुख्यालयात सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसृत करण्यासाठी वेबिनार इत्यादीव्दारा संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील प्रख्यात स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करावे. सांस्कृतिक कार्य संचालक यांनी पंधरवड्यामध्ये वेबिनार इत्यादीव्दारा संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.