आज देशात देशहितासाठी सर्वाधिक जोखीम पत्करणारे सरकार, आधीच्या सरकारांमध्ये राजकीय जोखीम पत्करण्याचे धैर्य नव्हते : पंतप्रधान

आज भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांवर लोकांचा विश्वास वाढतो आहे: पंतप्रधान

ज्या भारतात आधी परदेशी गुंतवणुकीबाबत भय होते त्याच भारतात आज सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचे स्वागत होत आहे : पंतप्रधान

भारतीय औद्योगिक महासंघ (सीआयआय) च्या वार्षिक बैठकीत पंतप्रधानांचे भाषण

आत्मनिर्भर भारताची मोहीम यशस्वी करण्यात, भारतीय उद्योगांची जबाबदारी मोठी : पंतप्रधान

पूर्वलक्षी कर रद्द करण्यामुळे सरकार आणि उद्योगांमधील विश्वास अधिक भक्कम होईल: पंतप्रधान

नवी दिल्ली,११ ऑगस्ट /प्रतिनिधी :-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीआयआय म्हणजेच भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक बैठक 2021 मध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आपले विचार मांडले. या बैठकीत, उद्योगसमूहाच्या धुरिणांनी, पाच ट्रिलीयन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकारने  विविध क्षेत्रात केलेल्या, सुधारणांसाठी तसेच पंतप्रधानांच्या कटीबद्धतेसाठी त्यांचे कौतुक केले. ‘भारत@75: सरकार आणि उद्योगांचे आत्मनिर्भर भारतासाठी एकत्रित प्रयत्न’ या संकल्पनेवर बोलतांना सर्व उद्योजकांनी, पायाभूत सुविधांची आव्हाने, उत्पादन क्षेत्राची क्षमता वाढवणे, वित्तीय क्षेत्र अधिक गतिमान करणे, भारताचे तांत्रिक बळ वाढवत तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अव्वलस्थानी नेणे अशा सर्व विषयांवर आपली मते आणि सूचना पंतप्रधानांसमोर मांडल्या.

यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ही आजची सीआयआय बैठक, 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला होत आहे, आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान होत आहे, ही विशेष बाब आहे. भारतीय  उद्योगांना नवे संकल्प करण्याची, नवी उद्दिष्टे निश्चित करण्याची ही एक मोठी संधी आहे. आत्मनिर्भर भारताचा आपला संकल्प प्रत्यक्षात साकार करण्याची सर्वात मोठी जबाबदारी भारतीय उद्योगजगताची आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. महामारीच्या काळात, उद्योगक्षेत्राने दाखवलेल्या चिवट वृत्तीबद्दल, त्यांनी उद्योगजगताचे कौतुक केले.

भारतात निर्माण झालेल्या विश्वासाच्या वातावरणाचा उद्योगक्षेत्राने देशाचा विकास आणि क्षमता वृद्धी करण्या साठी पुरेपूर उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. सध्याच्या सरकारच्या दृष्टिकोनातील बदलांचा उल्लेख करत तसेच, सध्याच्या कार्यपद्धतीत झालेले बदल नमूद करत, पंतप्रधान म्हणाले की आजचा नवा भारत नव्या जगाकडे वाटचाल करण्यासाठी सज्ज आहे. एकेकाळी, भारतात परदेशी गुंतवणुकीविषयी, अनास्था किंवा भयाचे वातावरण असे, मात्र आज आपण सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचे स्वागत करतो आहोत. तसेच, पूर्वी देशातील करधोरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये नैराश्याचे वातावरण असे, मात्र आज,  जगातील सर्वात उत्तम स्पर्धात्मक कॉर्पोरेट कर आणि चेहराविरहीत पारदर्शक करप्रणाली आपल्या देशात आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. एकेकाळी देशात असलेल्या लालफितीच्या कारभाराच्या जागी आज भारताने उद्योगपूरक वातावरणाच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याचप्रमाणे, गुंतागुंतीच्या कामगार कायद्याच्या जागी आज केवळ चार सुटसुटीत, सुस्पष्ट कामगार संहिता आहेत, ज्या कृषीक्षेत्राकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून बघितले जात होते, ते कृषीक्षेत्र आज सुधारणांच्या माध्यमातून बाजारपेठेशी जोडले गेले आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणूनच भारतात आज विक्रमी परदेशी थेट गुंतवणूक आणि एफपीआय येत आहे. परदेशी गंगाजळीतही विक्रमी वाढ झाली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

एक काळ असा होता, ज्यावेळी परदेशी ते उत्तम असा सर्वसाधारण समाज असे. अशा मानसिकतेचा काय परिणाम होत असे हे उद्योगक्षेत्रातील धुरिणांना चांगलेच माहित आहे. त्यावेळी परिस्थिती इतकी वाईट होती, की अत्यंत परिश्रमाने तयार केलेल्या भारतीय उत्पादनांची देखील परदेशी नावाने जाहिरात केली जात असे. मात्र आज परिस्थिती वेगाने बदलते आहे. आज भारतातील लोकांचा भारतात तयार झालेल्या उत्पादनांवर विश्वास आहे. आज प्रत्येक भारतीयाला, भारतात तयार झालेली उत्पादने प्राधान्याने घ्यायची आहेत. जरी कंपनी भारतीय नसेल, तरीही, भारतात तयार झालेली उत्पादने विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आज ज्यावेळी भारतीय युवा मैदानात येतात, त्यावेळी ते संकोचत किंवा बिचकत नाहीत, आत्मविश्वासाने पुढे जातात. त्यांना कठोर परिश्रम करायचे आहेत, जोखीम पत्करण्याची आणि यश मिळवण्याची त्यांची तयारी आहे. आज युवकांना वाटते, की ते इथे स्वतःचे स्थान बनवू शकतात, हाच आत्मविश्वास आज आपल्याला स्टार्ट अप कंपन्यांमधेही दिसतो.

आज भारतात, 60 युनिकॉर्न स्टार्ट अप्स आहेत, सहा-सात वर्षांपूर्वी ही संख्या कदाचित, 3 ते चार एवढीच होती, असे पंतप्रधान म्हणाले. आज असलेल्या 60 युनिकॉर्नपैकी 21 कंपन्या केवळ गेल्या काही महिन्यात उदयाला आल्या आहेत. विविध क्षेत्रातील या युनिकॉर्न, भारतात घडत असलेला बदल दर्शवणाऱ्या आहेत. अशा स्टार्ट अप कंपन्यांना गुंतवणूकदारांकडून मिळणारा प्रतिसाद अफाट आहे आणि भारतात विकासासाठी प्रचंड संधी असल्याचीच ही चिन्हे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

आज देशाचा आपल्या उद्योगक्षेत्रावर वाढलेल्या विश्वासाचाच हा परिणाम आहे की देशात उद्योगपूरक वातावरण तसेच लोकांचे जीवनमान अधिकाधिक सुकर होत चालले आहे. कंपनी कायद्यात झालेला बदल हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्र सरकार कठीण सुधारणा करण्यास सक्षम आहे कारण आमच्यासाठी सुधारणा हा बळजबरीचा विषय नाही, तर आमच्या दृढनिश्चयाचा विषय आहे, असे पंतप्रधान म्हणाले. संसद अधिवेशनात, आणण्यात आलेली विधेयके, जसे की फॅक्टरींग रेग्युलेशन सुधारणा विधेयकामुळे, छोट्या उद्योजकांना कर्ज मिळण्यात मदत होईल, असे त्यांनी सांगितले. ‘ठेव विमा आणि पतहमी महामंडळ विधेयक,’ छोट्या ठेवीदारांच्या बचत ठेवींचे संरक्षण करेल. या सर्व उपाययोजना सरकारच्या प्रयत्नांना बळ देणाऱ्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

आधीच्या चुका दुरुस्त करून, सरकारने पूर्वलक्षी करप्रणाली रद्द केली आहे. आज उद्योगक्षेत्राकडून या निर्णयांचे होत असलेले कौतुक बघून, या सर्व उपाययोजना, सरकार आणि उद्योगक्षेत्रातील संबंध अधिक दृढ करणाऱ्या ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज देशात असलेले सरकार देशहितासाठी मोठ्यात मोठी जोखीम पत्करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे वस्तू आणि सेवा कायदा रखडला होता, कारण त्याच्याशी संबंधित राजकीय धोके पत्करण्याचे धैर्य आधीच्या सरकारमध्ये  नव्हते, यावर त्यांनी भर दिला. आम्ही केवळ जीएसटीची अंमलबजावणीच केली नाही, तर आज देशात जीएसटीचे विक्रमी संकलन होतानाही आपण बघतो आहोत, असे पंतप्रधानांनी सांगितले.