केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे सुरु केला नाविन्यपूर्ण उपक्रम

वृक्ष बंधन प्रकल्पाअंतर्गत देशी झाडांच्या बियांचा समावेश असलेल्या राख्या आदिवासी महिला तयार करीत आहेत

नवी दिल्ली,११ ऑगस्ट /प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसोबत भागीदारी करून केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत वृक्षबंधन प्रकल्पाची सुरुवात केली. या उपक्रमात 1100 आदिवासी महिला देशी झाडांच्या बियांचा समावेश असलेल्या राखी  रक्षाबंधनाच्या सणासाठी  तयार करीत आहेत. जमिनीवरील वृक्षांचे आच्छादन वाढविणे आणि हवामान बदलाच्या दुष्परिणामांचा सामना करणे यासाठीच्या प्रयत्नांमध्ये हे अत्यंत अनोखे योगदान ठरत आहे.

अशा प्रकारच्या राख्या  तयार करण्याचा हा उपक्रम म्हणजे औरंगाबादच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसाठी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने ऑक्टोबर 2020मध्ये मंजूर केलेल्या कृषिविषयक प्रकल्पाचा एक भाग आहे. या कृषिविषयक प्रकल्पाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील 10 आदिवासी गावांमधील 10,000 आदिवासी शेतकऱ्यांना गो-आधारित शेती तंत्रावर आधारित शाश्वत नैसर्गिक शेती पद्धतीचे प्रशिक्षण दिले जात आहे.

राख्या तयार करण्याच्या या उपक्रमाचे ठळकपणे प्रदर्शन करण्यासाठी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या आभासी कार्यक्रमात, आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर देखील उपस्थित होते. आदिवासी किसान महिला मंचाच्या कार्यकर्त्या महिलांनी या कार्यक्रमात बीज राख्यांची खूप विस्तृत मालिका उपस्थितांसमोर प्रस्तुत केली आणि या राख्या तयार करण्याच्या प्रक्रियेची देखील सविस्तर माहिती दिली.

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने मंत्रालयाचे सहसचिव डॉ.नवल जीत कपूर आणि सहसचिव तसेच आर्थिक सल्लागार यतींद्र प्रसाद या आभासी कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ.कपूर म्हणाले की, हा प्रकल्प पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेच्या धर्तीवर संरेखीत केला असून आदिवासी समुदायांच्या पारंपरिक पर्यावरणीय ज्ञानाला पुनर्जीवित करून ते जतन करण्यासाठी मदत करणाऱ्या आणि त्यांना रासायनिक शेती पद्धतीच्या दुष्परिणामांपासून वाचविणाऱ्या गो-आधारित पारंपरिक शेती पद्धतीवर आधारित आहे.

सेंद्रिय शेतीमधील आदिवासी शेतकऱ्यांची भूमिका आणि राख्या तयार करण्यात आदिवासी महिलांची भूमिका ठळकपणे अधोरेखीत करत श्री श्री रविशंकर म्हणाले की वायू प्रदूषण आणि हवामान बदलासारख्या समस्या सोडविण्यासाठी जन शक्ती, राज्य शक्ती आणि देव शक्ती एकत्र येण्याची गरज असते, आणि ते या प्रकल्पात झालेले आपल्याला दिसत आहे.