पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीकेसी येथे मियावाकी वनीकरणास सुरूवात

मुंबई,११ ऑगस्ट /प्रतिनिधी :- मुंबईत अधिकाधिक हिरवाई निर्माण करण्यासाठी कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी पद्धतीची मियावाकी वने विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून एमएमआरडीएच्या वतीने आज बीकेसी येथील वनीकरणाची सुरूवात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली. यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, अपर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी उपस्थित होते.

बीकेसी येथील मियावाकी वनामध्ये पस्तीस प्रजातींची झाडे लावण्यात येत असून यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणारी झाडे अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, साग, पेरू, आपटा, भोकर, अडुळसा, अनंता, तामण, विलायती चिंच, फणस,  सुरू, पारिजातक, काशीद, मोहा, सप्तपर्णी, बेल यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

मियावाकी वनपद्धती

कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी मियावाकी वने ही कोकणातील ‘देवराई’शी आणि सिंगापूरमधील ‘अर्बन फॉरेस्ट’ संकल्पनेशी नाते सांगणारी आहेत.

सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणाऱ्या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो त्या तुलनेत साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्या उंचीचे झाड वाढते. साधारणपणे दोन वर्षात विकसित होणाऱ्या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात. साधारणपणे दोन किंवा तीन वर्षांनंतर ही वने नैसर्गिकरीत्या वाढून अव्याहतपणे प्राणवायू देत राहतात. या दृष्टीने मुंबईत अधिकाअधिक मियावाकी वने विकसित करून पर्यावरणीय समतोल राखण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.