हृदय शस्त्रक्रिया होणाऱ्या बालक व त्यांच्या पालकांची मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली भेट; शस्त्रक्रियेसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई,१०ऑगस्ट /प्रतिनिधी :- सांगली जिल्ह्यातील हृदयविकार असलेल्या ४० बालकांवर मुंबईतील एसआरसीसी रुग्णालयात पुढील दोन दिवस  शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या बालकांची आणि त्यांच्या पालकांची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यावेळी उपस्थित होते.

शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या बालकांच्या पालकांशी संवाद साधताना श्री ठाकरे म्हणाले, डॉक्टरांना आपण देव मानतो. कोविडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच घटक आपले योगदान देऊन समाजसेवा करीत आहेत. या काळात काही डॉक्टर कोविड व्यतिरिक्त इतर आजार असणाऱ्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी गावोगावी जाऊन सेवा देत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज सांगली जिल्ह्यातील या बालकांना असलेला आजार वेळेत लक्षात आल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व घटकांना यावेळी श्री ठाकरे यांनी धन्यवाद दिले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी आणि शाळेतील बालकांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम राबवला जातो. मागील मार्चपासून राज्यात कोरोना आपत्ती व सद्यस्थितीत महापुराची परिस्थिती यामुळे अंगणवाडी व शाळा बंद असल्याने सदर योजनेअंतर्गत नियुक्त पथकांनी सांगली जिल्ह्यातील बालकांची गावागावात शिबिरांद्वारे तपासणी केली असता ४० बालकांवर हृदयशस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. या शस्त्रक्रियांकरिता अंदाजे दोन कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून सदरची सर्व बालके ही गरीब परिवारातील असल्याने सदरच्या शस्त्रक्रिया पूर्ण करणे त्यांच्या पालकांना अवघड होते. त्यासाठी सांगली जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय तसेच सांगली जिल्हा शिवसेना यांच्या माध्यमातून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपलब्ध होणारा निधी, शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या बालकांवर मुंबई येथील एसआरसीसी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.