मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना श्रद्धांजली

मुंबई,१०ऑगस्ट /प्रतिनिधी :-  आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपलं – उपमुख्यमंत्री अजित पवार

“आयुर्वेदाचार्य श्री. बालाजी तांबे यांनी अध्यात्म, आयुर्वेद, योगोपचार, संगीतोपचारासारख्या पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींचं पुनर्जीवन केलं. आयुर्वेद, योगोपचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्ती, लोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचं महत्वं घराघरात पोहचवलं. स्वयंपाकघरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गूण गृहिणींना समजावून सांगितले. आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, सुदृढ, आनंदी समाज निर्माण  करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं. श्री. बालाजी तांबे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

आयुर्वेदाचार्य श्री. बालाजी तांबे यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारताच्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचारपद्धतीला आधुनिक स्वरुप देऊन समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. आयुर्वेदाचं महत्वं सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हजारो लेख लिहिले. दूरचित्रवाणीवरुन संवाद साधला. आयुर्वेदातील गुणकारी औषधं त्यांचा उपयोग याचं ज्ञान देशविदेशात पोहचवलं. सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगितलं. आयुर्वेदाच्या समृद्ध परंपरेचा दस्तावेज तयार करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं आहे. त्यांनी निर्माण केलेल्या दस्तावेजातून भारतीय आयुर्वेदाचं ज्ञान, महत्त्वं भावी पिढ्यांसाठी चिरंतन राहणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी श्री. बालाजी तांबे यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं.

तांबे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

आयुर्वेद व योग प्रचार प्रसारासाठी आयुष्य वेचणारे आयुर्वेदाचार्य श्री बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. श्री. तांबे यांनी आरोग्यविषयक लिखाण तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून निरामय जीवन जगण्यासाठी लोकांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केले. योगाप्रमाणेच आयुर्वेदाचे व श्रीमतभगवद्गीतेचे ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.