समाजातील गरजवंतांसाठी अवयवदानाचे दूत व्हा – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

अवयवदान सप्ताहाला उद्यापासून सुरुवात

नागपूर,१०ऑगस्ट /प्रतिनिधी :- नागरिकांमध्ये अवयवदान करण्याबाबत पुरेशी जागृती नाही. त्यामुळे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये अवयवदान करण्याबाबत उदासिनता असून, नागरिकांनी समाजातील गरजवंतांसाठी अवयवदानाचे दूत व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त  प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे केले. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), विभागीय आयुक्त कार्यालय आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून अवयवदान सप्ताहाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

आयएमएचे डॉ. संजय देवतळे, डॉ. विभावरी दाणी, माहिती संचालक हेमराज बागुल प्रामुख्याने उपस्थित होते. 11 ऑगस्टपासून अवयवदान सप्ताहाला सुरुवात होत आहे. या सप्ताहामध्ये उद्या दिनांक 11 ऑगस्ट रोजी आयएमए सभागृहात सायंकाळी 4 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. सप्ताहामध्ये आयोजित उपक्रमांमध्ये डॉ. विभावरी दाणी झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरबाबत, 12 ऑगस्ट रोजी डॉ. प्रकाश खेतान किडनी दानावर, 13 ऑगस्ट रोजी डॉ. निखिलेश वैरागडे, डॉ. समीर जहागीरदार डोळे व त्वचा दानावर आणि 14 ऑगस्ट रोजी डॉ. राहुल सक्सेना यकृत दान करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

मध्य भारतातील एक महत्त्वाचे मेडिकल हब म्हणून नागपूर ओळखले जात असून येथे विविध वैद्यकीय शिक्षणसंस्थांसह मोठी रुग्णालये आहेत. तसेच नागपूर रस्ते, लोहमार्ग आणि हवाईमार्गाच्या माध्यमातून देशाच्या प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे. त्यामुळे येथून ‘ग्रीन कॉरिडॉर’ बनवून अवयवदानातून अनेकांना जीवनदान मिळाले आहे. अवयव दान करण्याची संख्या पुरेशा प्रमाणात वाढविण्याची गरज आहे. या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून नागरिक तसेच रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये अवयव दानाप्रती असलेले अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे आणि समाजात गरजवंतांना तत्काळ अवयव मिळावेत  याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

अवयवांचे प्रत्यारोपण करण्यासाठी वेळेत अवयवांची आवश्यकता असते. याबाबतची सूक्ष्म माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी, त्यासाठी ऑनलाईन नोंदणी पद्धत अधिक सुलभ आणि सोयीची करण्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अवयव दान मोहिमेला यशस्वी करण्यासाठी युवा वर्गाचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणे आणि समन्वय ठेवणे आवश्यक असून, ऑनलाईन नोंदणी सेवेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

जगातील इतर देशाच्या तुलनेत भारतामध्ये अवयव दान करण्याचे प्रमाण अत्यल्प असून, ते वाढविण्याची  गरज असल्याचे सांगून डॉ. संजय देवतळे यांनी एका ब्रेनडेड  रुग्णामुळे 8 ते 10 रुणांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे अवयवदान सप्ताहानिमित्त ही जनजागृती करण्यात येणार आहे. अवयवदानाचे प्रमाण वाढल्यास नागपूर जगाच्या नकाशावर येऊ शकते, असा विश्वास डॉ. संजय देवतळे यांनी व्यक्त केला.

ब्रेनडेड झालेल्या रुग्णाच्या अवयवदानातून अनेकांना जीवदान मिळू शकते. मात्र त्याचे वेळेत रिपोर्टींग झाले पाहिजे. ते वेळेत होणे आवश्यक असून, त्यासाठी रुग्णालय प्रशासन आणि रुग्‍णांचे नातेवाईक यांच्यात आयएमए हे समन्वयाचे काम करेल, असे डॉ. विभावरी दाणी यांनी सांगितले. ब्रेनडेड व्यक्तिचे सर्वच अवयव दान करता येवू शकतात. त्या सर्वच अवयवदानातून मोठ्या प्रमाणावर जीवनदानाची मोहिम उभारली जावू शकते. रस्ते अपघातातील ब्रेनडेड रुग्णांना कृत्रित श्वासोश्वासावर ठेवले जाते. अशा रुग्णांचे  हृदय 48 तासांपर्यंत  कार्यान्वित असते. त्यामुळे अवयवदान करणाऱ्यांनी  पुढे यावे, असे आवाहन डॉ. दाणी यांनी केले.

140 कोटी लोकसंख्या असलेला देश अवयवदानात मागे असल्याचे सांगून माहिती संचालक हेमराज बागुल यांनी अवयवदान ही संकल्पना समाजात मोठ्या प्रमाणावर रुजली पाहिजे. त्याबाबत समाज-माध्यमांमधून प्रबोधन झाले पाहिजे. ती देशाची, समाजाची आणि वेळेची गरज आहे. अवयव दानाचे प्रमाण वाढविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर तसेच रुग्णालय प्रशासन यांनी जाणिवांची जोड देत यावर विशेष भर दिला पाहिजे, असा विश्वास श्री. बागुल यांनी व्यक्त केला.