व्यक्तीच्या जडणघडणमध्ये भाषेचे अभुतपुर्व योगदान – कवी आणि गीतकार दासू वैद्य

नवी दिल्ली,१०ऑगस्ट /प्रतिनिधी :- व्यक्तीच्या जडणघडणमध्ये भाषेचे अभुतपुर्व योगदान असल्याचे मत  प्रसिध्द कवी आणि गीतकार दासू वैद्य यांनी मांडले. भाषा आणि आपण  विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 54 वे पुष्प गुंफताना श्री वैद्य बोलत होते.

भाषेचा व्यक्तीमत्वाशी खुप जवळचा संबंध असल्याचे सांगुन श्री वैद्य म्हणाले,  व्देषाची किंवा प्रेमाची कोणतीही भाषा वापरू शकतो, त्याप्रमाणे आपले व्यक्तीमत्वाची ओळख निर्माण होत असते.  भाषेला गांभीर्याने घेतले पाहिजे.  व्यक्तीमत्वाचा विकास असो, ज्ञान निर्मिती असो, ज्ञान प्राप्ती असो या सर्वांमध्ये भाषेचे फार महत्व आहे. भाषा ही जोडण्यासाठीच असते ती तोडण्यासाठी कधीच नसते. योग्य भाषेच्या वापरामुळे आपल्या जगण्यात एक ओलावा,  समृद्धी निर्माण होत असते असे श्री वैद्य म्हणाले.

या पृथ्वीतलावर सर्वश्रेष्ठ प्राणी हा मनुष्यच आहे. मनुष्य हा इतर प्राण्यांच्या तुलनेत वेगळा असण्याचे एक महत्वाचे कारण, मनुष्याला अंगठा आहे आणि भाषा निर्माण करण्याची क्षमता आहे.  अंगठामुळेचे अवजारे, प्रसाद, हत्यारे, रस्ते हे सर्व निर्माण होऊ शकले. मनुष्यमात्राच्या स्थित्यंतराच्या प्रक्रियेत अंगठा आणि अवगत असलेली भाषा कारणीभूत ठरल्याचे मानववंशशास्त्र पुराव्यासह सांगत असल्याचे श्री वैद्य यांनी यावेळी सांगीतले. इतर प्राणीही त्यांच्या भाषेत आरेडून रडून संवाद साधतात. मात्र, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या भाषेचा विकास होऊ शकला  नाही.  माणसांनी निर्माण केलेल्या भाषेचा विकास टप्प्या-टप्प्याने होत गेला. माणुस हा समाजिक प्राणी असून हे सामाजिकत्व जपण्यासाठी संवादाची आवश्यकता भासते आणि हेच भाषेमुळे शक्य झाले, असल्याचे श्री वैद्य म्हणाले.

व्यक्तीमत्व विकासात भाषा फार महत्वाची ठरत असते. भाषा नसली तर प्राणवायु गेल्यासारखे मनुष्याचे आयुष्य होईल. कारण संवाद साधल्याशिवाय व्यक्ती जीवंत राहू शकत नाही. ग्रामीण भागात आजही सांगीतले जाते खरा माणुस हा तोंड उघडल्यावर कळतो.  त्याच्या शब्दांच्या वापरावरून तो ज्ञानी आहे की, वरवर बोलतो हे लक्षात येते असल्याचे निरीक्षण श्री वैद्य यांनी यावेळी नोंदविले.

श्री वैद्य पुढे म्हणाले, शब्दा-शब्दांमध्ये अनुभव बांधुन ठेवल्या सारखा असतो, साप हा आवाज कानी पडल्यावर भीती, निशीगंधाचे फुल, गुलाब  उच्चारल्यावर सुगंध हे शब्द आणि त्यांचा भाव लगेच आठवतो.   मराठवाडयात एका पसरट पातेल्याला  भगोना अस म्हणतात. हा शब्द संस्कृततील बहुगुण यातुन अपभ्रंश होऊन वापरला जातो. तसेच  मांजर पाटच कापड अस साध्या  कपडाच नाव आहे. मांजर पाट हा शब्द मॅनचेस्टर या शब्दाचा अपभ्रंश आहे. लोकांनी त्यांच्या सोयी प्रमाणे शब्दाचा उपयोग बोलीभाषेत केल्याचे श्री वैद्य म्हणाले. असे अनेक उदाहरण देऊन भाषेची महती  श्री वैद्य यांनी यावेळी सांगीतले.  भाषेच्या मुळाशी संस्कृती असते. त्यामुळे अनुवाद, भाषांतर करताना संस्कृतीचा गाभा असला की  कोरडेपणा राहत नाही तर भावासह भाषा उमटत असल्याचे श्री वैद्य यांनी सांगितले.

काही शब्द असे असतात ज्यांना पर्यायवाची शब्द इतर भाषेत नाही. ते केवळ भारतीय भाषेतच आहेत. असे काही शब्द परदेशी शब्दकोश आलेले आहेत. जसे गुरूजबरदस्त हे शब्द अमेरिका, इंग्लंड  च्या शब्दकोशात आलेले असल्याची माहिती श्री वैद्य यांनी यावेळी दिली.

नदीच्या पाण्यात जे-जे काही येते ते ती सोबत घेऊन समुद्रात जाऊन मिळते. तसेच भाषेचे आहे. निर्सग भेद करत नाही.  माणस भाषे-भाषेमध्ये भेद करीत असतात. सीमालगतच्या भागात वापरत असणारे बरेच शब्द सर्व सामान्यपणे वापरले जातात. जसे अडकित्ता , विठठल हे शब्द कानडी भाषेतून आले आहेत. हे शब्द मराठीत लोकप्रिय झालेले आहेत. मराठवाडा, विदर्भ येथील भाषेमध्ये वापरणा-या शब्दांमध्ये भौगोलिक, सांस्कृतिकतेनुसार बदल झाल्याचे दिसत असल्याचे श्री वैद्य म्हणाले.

श्री वैद्य पुढे म्हणाले,  भाषेचे जगण्याशी नाते बघताना  प्रत्येक भाषेचे एक वजन असते. काही शब्द हे त्या-त्या भाषेत जास्त उठून दिसतात. भाषेच्या वापरण्यावरून बोलण्याचा रोखही लक्षात येत असल्याचे श्री वैद्य यांनी यावेळी सांगितले. भाषा ही कुठलीही शुध्द अशुध्द नसते.  आपण चांगली सर्वांना समजणारी भाषा बोलली आणि लिहीली पाहिजे असा सल्लाही  असे श्री वैद्य यांनी यावेळी दिला.

चारशे वर्षापुर्वी इंग्रजी भाषेत 50 हजार शब्द होते. आताती संख्या 10 लाखांच्यावर गेलेली आहे. इतर भाषेतील शब्द आपले करून इंग्रजी भाषा समृध्द होत गेली. असेच मराठी भाषेचही झाल्यास मराठी भाषा वाढत जाईल. आपला शब्दकोश वाढला पाहिजे. आपले भाषेवरचे काम वाढायला हवे, असे श्री वैद्य यावेळी सांगीतले. यासह मराठी साहित्य वाचले गेले पाहिजे, मराठी सिनेमे, नाटक बघावे, संगीत ऐकावे.  मराठी माणसांनी मराठीतच स्वाक्षरी करावी असा आग्रह श्री वैद्य यांनी यावेळी केला. यासह  श्री वैद्य म्हणाले, भाषेकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. भाषेवर काम करायला हव. जसे पैलावान आपल्या शरिरावर काम करीत असतो तसेच आपल्याला आपल्या भाषेवर काम करायला हवे.

भाषा म्हणजे शब्दकोशाचीच भाषा नसते तर त्या पलीकडची संवादाची भाषा असते. महाराष्ट्राचा विचार आणि भाषेचा विचार केला तर यामध्ये  संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा , संत तुकाराम, संत नामदेव संत एकनाथ अशा सर्व संतांचे साहित्य  त्या-त्या संताचे वैश‍िष्टये सांगते. तसेच   नामदेव ढसाळ, बाबुराव बागुल, ना.धो. महानोर, विं.दा. करंदीकर या साहित्यकांचे साहित्य वाचल्यानंतर ते साहित्य कोणी  लिहीलेले हे कळते. ज्या साहित्यिकांना भाषेचे भान येते स्वत:ची  भाषा सापडते तेव्हा त्या लेखकाची, कवीची वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे वैद्य यावेळी म्हणाले.