टोक्योमध्ये नीरज चोप्राने घडवला इतिहास!

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सात पदके- देशाची आजवरची सर्वोत्तम पदकांची कमाई

भालाफेकपटू चोप्रा ऑलिम्पिक स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू

टोक्यो, ७ऑगस्ट /प्रतिनिधी :- अवघ्या तेवीस वर्षांच्या भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने आज टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत, सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. त्याने आपला सर्वोत्तम म्हणजे, 87.58 मीटर लांब भालाफेक करत, या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या कामगिरीमुळे नीरज चोप्रा सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय अ‍ॅथलिट आणि नेमबाज अभिनव बिंद्रानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. अभिनव बिंद्राने बीजिंग 2008 ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले होते.

Image

नीरजच्या या अत्युच्च कामगिरीमुळे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताची एकूण पदक संख्या सात झाली आहे- जी देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त पदकसंख्या आहे. याआधी, 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने, सहा पदके जिंकली होती. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अत्यंत आनंदित झालेल्या सर्व भारतीयांनी नीरजचे या अभिमानास्पद कामगिरीसाठी कौतुक केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नीरजचे अभिनंदन करत म्हटले आहे- “तुझ्या या यशाने अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे. “अभूतपूर्व विजय नीरज चोप्रा! भालाफेकमधील तुझे सुवर्णपदक, सर्व श्रुंखला तोडत नवा इतिहास रचणारे आहे ! तू, तुझ्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत, भारतासाठी पहिले ट्रॅक अँड फिल्ड पदक आणले आहे. भारताची मान आज अभिमानाने उंचावली आहे. मनःपूर्वक अभिनंदन!! असे ट्वीट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नीरजचे या अभूतपूर्व कामगिरीसाठी कौतूक केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे “ आज टोक्योमध्ये इतिहास रचला गेला ! नीरज चोप्राने आज जे यश मिळवले आहे, ते कायम सर्वांच्या लक्षात राहील. युवा नीरजने अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. अत्यंत जिद्द आणि अतुलनीय धाडस दाखवत त्याने आज हे प्रदर्शन केले आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन!”

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्वीटर वर हा सामना बघत असतांनाची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.. आणि नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. “नीरज चोप्रा, भारताचा सुवर्ण पुत्र ! तुझ्या अप्रतिम भालाफेकीसाठी तुला अब्जावधी सलाम ! तुझे नाव इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल” असे ट्वीट त्यांनी केले आहे.

नीरज चोप्रा वैयक्तिक माहिती :

क्रीडाप्रकार : पुरुष भालाफेक स्पर्धा

जन्मतारीख :  24 डिसेंबर, 1997

मूळ रहिवासी : पानिपत, हरियाणा

प्रशिक्षण केंद्र: SAI NSNIS पतियाला

सध्याचे प्रशिक्षण केंद्र : उपासाला, स्वीडन

राष्ट्रीय प्रशिक्षक : डॉ क्लाउस बर्तोनेझ

हरियाणाच्या खान्दरा गावाचा रहिवासी असलेल्या नीरजचे वजन तो  12 वर्षांचा असतांना  खूप जास्त होते, त्यामुळे त्याच्या घरचे लोक, त्याला कुठला तरी खेळ खेळत जा, म्हणून आग्रह करत असत. शेवटी त्यांच्या आग्रहाखातर नीरजने पानिपत येथील शिवाजी क्रीडा संकुलात जाण्यास सुरुवात केली.  तिथे त्याने काही वरिष्ठ खेळाडूंना भालाफेक खेळतांना पहिले आणि त्यानेही या खेळात आपले नशीब आजमावण्याचे ठरवले. सुदैवाने हा खेळ त्याला आवडू लागला आणि नंतर त्यात प्राविण्य मिळवण्यासाठी त्याने प्रचंड परिश्रम घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर, 2018 च्या राष्ट्रकुल तसेच आशियाई स्पर्धेत तो भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पहिला भालाफेकपटू ठरला.

कामगिरी :

– सुवर्ण पदक, आशियाई क्रीडास्पर्धा  2018

– सुवर्ण पदक, राष्ट्रकुल  क्रीडास्पर्धा 2018

– सुवर्ण पदक, आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद 2017

– सुवर्ण पदक, जागतिक U-20 अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद 2016

– सुवर्ण पदक, दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धा  2016

– रौप्य पदक, आशियाई ज्युनियर अजिंक्यपद 2016

– सध्याचा राष्ट्रीय विक्रम (88.07m – 2021)

– सध्याचा जागतिक ज्युनिअर विक्रम (86.48m – 2016)

सरकारची मदत :

– युरोपात प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी व्हिसा मिळवण्यात सहकार्य

– क्रीडा साहित्य घेण्यासाठी वित्तीय सहाय्य

– राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात तसेच परदेशीही त्याच्यासाठी बायो-तज्ञ आणि प्रशिक्षकाची व्यवस्था करणे.

– दुखापत व्यवस्थापन आणि पुनर्वसन

– 26 आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि ऑलिम्पिकसाठी अर्थ सहाय्य

निधी (2016 रिओ ऑलिम्पिक ते आतापर्यंत  )

TOPS: Rs. 52,65,388 सुमारे                      

ACTC: Rs. 1,29,26,590 सुमारे

TOTAL: Rs. 1,81,91,978 सुमारे.

प्रशिक्षक माहिती :

a) प्राथमिक पातळी: जाई चौधरी

b) द्वितीय पातळी :स्व गैरी  आणि उवे होन  c) वरिष्ठ पातळी :डॉ क्लाउस बर्तोनेझ

दक्षिण कमांडच्या सुभेदार नीरज चोप्रा यांनी  टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रचला इतिहास

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे सुभेदार नीरज चोप्रा यांनी आज  ऑलिम्पिक स्पर्धेत 87.58  मीटर भालाफेक करत, ट्रॅक अँड फिल्ड सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे.नीरज चोप्रा यांनी आपले प्रशिक्षण पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट मध्ये   केले आहे.  सुभेदार नीरज मूळचे हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातल्या खांदरा गावातल्या शेतकरी कुटुंबातले आहे.   26 ऑगस्ट 2016 साली, नायब सुभेदार पदावर भारतीय लष्करात ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून ते रुजू झाले . नीरजला 2018 साली अर्जुन पुरस्कार आणि 2021 साली त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीसाठी विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल, तसेच भारतीय लष्कर आणि संपूर्ण देशाचा गौरव वाढवल्याबद्दल,  दक्षिण कमांडचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन यांनी  अभिनंदन केले आहे.


टोक्यो ऑलिंपिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाला 65 किलो वजनीगटात कांस्यपदक

ठळक वैशिष्ट्ये:

  • कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात कझाकस्तानच्या दौलत नियाझबेकोव्हला 8-0 असे पराभूत केले
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या कामगिरीबद्दल बजरंग पुनियाचे अभिनंदन
  • बजरंगचे अभिनंदन करताना क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, मला तुमचा खूप अभिमान वाटतो, प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवणारी तुमची कामगिरी आणि कुस्तीचा खूपच चांगला शेवट पाहणे अतिशय आनंददायी होते.

भारतीय कुस्तीसाठी एक विशेष क्षण!

#Tokyo2020 कांस्यपदक जिंकल्याबद्दल बजरंग पुनियाचे अभिनंदन. अनेक वर्षांचे अथक प्रयत्न, सातत्य आणि दृढनिश्चय यामुळे तुम्ही स्वतःचे वेगळेपणे सिद्ध केले आहे. तुमच्या यशामध्ये प्रत्येक भारतीय सहभागी आहे !