मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॅाटेल मालकांना ठणकावले

कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॉटेल, रेस्टॉरंटना वेळ वाढवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील निर्बंध शिथिलतेचा आढावा घेणार

मुंबई,६ऑगस्ट /प्रतिनिधी :- हॉटेल आणि बारचालकांनीही दुकाने १०  पर्यंत सुरू ठेवण्याबद्दल आंदोलने  सुरू केली आहे. पण, ‘मला लोकांचा जीव महत्वाचा आहे’ असे  म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  हॅाटेल मालकांना चांगलेच ठणकावले  आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या निर्बंधावर ठाम असल्याचं स्पष्टपणे सांगितले . कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे, त्यामुळे लोकांचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे.  आठवड्याभरात परिस्थिती पाहुन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी हॅाटेल मालकांना दि​ले.

राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले.

राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकाच्या इंडियन हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंटस असोसिएशन – आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. वर्षा येतील समिती सभागृहात झालेल्या या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कोविड टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी तसेच  हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार,  डॉ. पी.व्ही शेट्टी, रवि शेट्टी, राकेश शेट्टी, सुकेश शेट्टी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आपल्याला सर्व गोष्टी पूर्वी प्रमाणेच सुरळीत आणि नेहमीप्रमाणे सुरु करायच्या आहेत. आता आपण पहिल्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामध्ये आऊटडोअर म्हणजेच मोकळ्या जागांवरील व्यवहारांवरील बंधने कमी केली आहेत. पण इनडोअर अशा गोष्टींबाबत सावधपणे पावले टाकावी लागतील. दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनची मोठी गरज भासली. पुढे तिसऱ्या लाटेतही रुग्ण संख्या वाढली, तर ऑक्सीजनची मागणी वाढू शकते, असे केंद्रीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. याबाबत आताही मोठी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांचाही ऑक्सीजन उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येणार आहे. निर्बंध शिथिलतेनंतर संसर्ग आणि रुग्णसंख्या यांचाही आढावा घेतला जाणार आहे.

टास्क फोर्सचे डॉ.जोशी यांनी हॉटेल व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, वातानुकूलन प्रणाली बंद करून हवेशीर व्यवस्था करणे, स्वच्छतागृहांची रचना याबाबतही सूचना केल्या.