सर्वांगीण विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Image

हिंगोली ,६ऑगस्ट /प्रतिनिधी :- जिल्ह्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असून या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावेत, असे निर्देश राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांनी दिले.

येथील शासकीय विश्रागृहातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Image

हिंगोली जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रातील अनुशेष अधिक असल्याने जिल्ह्यात सिंचनाच्या बाबतीत उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सिंचनाच्या प्रलंबित असलेल्या योजना तात्काळ राबविल्यास शेतकऱ्यांना त्याचा शेतीसाठी फायदा होईल. बँकांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करुन द्यावे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणाऱ्या नुकसान भरपाईपोटी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा.

Image

जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या नागरिकांना त्यांच्या विकासासाठी असलेल्या योजनांबाबत जनजागृती करुन योजना प्रभावीपणे राबवाव्यात. तसेच त्यांच्या मुलां-मुलींच्या शिक्षणांत प्रगती होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महिला सुरक्षा, पोषण आहार व आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना अतिशय चांगल्या असून या योजनांची अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील महिलांना बचतगटाच्या चळवळीत सहभागी करुन घेवून त्यांचा विकास साधत त्यांना उद्योग-व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करावे. मानव विकास निर्देशांकात प्रगती साधण्यासाठी संबंधित विभागानी एकत्रित प्रयत्न करावे. जिल्ह्यात सुंदर माझे कार्यालय, शाळा, गाव असे उपक्रम राबवावेत. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून प्रशासनाने वेळेत आरोग्याच्या सर्व उपाययोजना तयार ठेवाव्यात, असे निर्देशही महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी दिले.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी कृषी, सिंचन, वन हक्क, तिर्थक्षेत्र, आदिवासी विकास, मानव विकास, जलयुक्त शिवार आदी योजनासह जिल्ह्यातील विविध विकास योजनांची माहिती सादरीकरणांद्वारे सादर केली.या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.