“ते‘ स्वराज्या’साठी लढले; तुम्हाला ‘सु-राज्य’ घडवायचे आहे”: पंतप्रधान

पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये आयपीएस प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला

पुढील 25 वर्षे तुमच्यासाठी आणि भारतासाठी महत्त्वपूर्ण आहेत: पंतप्रधान

तांत्रिक अडथळ्यांच्या या काळात पोलिसांना सज्ज ठेवण्याचे आव्हान आहे: पंतप्रधान

तुम्ही ‘एक भारत -श्रेष्ठ भारत’चे ध्वजवाहक आहात, ‘राष्ट्र प्रथम, नेहमीच प्रथम’ या मंत्राला नेहमी प्राधान्य द्या : पंतप्रधान

सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा आणि गणवेशाचा सर्वोच्च सन्मान राखा : पंतप्रधान

नवी दिल्ली,३१ जुलै/प्रतिनिधी :-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे आयपीएस प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद देखील साधला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्य  मंत्री नित्यानंद राय उपस्थित होते.

Banner

अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद

पंतप्रधानांनी भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थींशी थेट संवाद साधला. अधिकारी प्रशिक्षणार्थींबरोबर हा  एक उत्स्फूर्त संवाद होता आणि पंतप्रधानांनी सेवेच्या अधिकृत बाबींच्या पलीकडे जाऊन नवीन पिढीतील पोलीस अधिकाऱ्यांच्या आकांक्षा आणि स्वप्नांबाबत चर्चा केली.

हरियाणाचा अनुज पालीवालने  आयआयटी रूरकी इथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना  केरळ केडर मिळाले. त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी अधिकाऱ्याच्या विरोधाभासी परंतु  पूर्णपणे उपयुक्त पर्यायांबद्दल चर्चा केली. गुन्हे अन्वेषणात जैव-तंत्रज्ञानाची  पार्श्वभूमी  आणि नागरी सेवा परीक्षेत समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाची यापुढील कारकीर्दीच्या विविध बाबी हाताळताना मदत होईल असे  त्यांनी  पंतप्रधानांना सांगितले. पंतप्रधान म्हणाले की,  पालीवाल यांचा संगीताचा छंद कदाचित पोलिसांच्या रुक्ष जगात दुर्लक्षिला जाईल मात्र  तो त्यांना एक उत्तम अधिकारी बनवेल आणि सेवा सुधारण्यात मदत करेल.

रोहन जगदीश हे कायद्यातील पदवीधर असून  राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा त्यांचा नागरी सेवा परीक्षेचा विषय होता. ते उत्तम जलतरणपटू आहेत. त्यांच्याशी पंतप्रधानांनी पोलिस सेवेतील तंदुरुस्तीच्या  महत्त्वावर चर्चा केली. इतक्या वर्षात प्रशिक्षणातील बदलांवरही  त्यांनी चर्चा केली कारण जगदीशचे वडील कर्नाटकचे राज्य सेवेतील अधिकारी होते जेथे ते आयपीएस अधिकारी म्हणून जात आहेत.

महाराष्ट्रातील गौरव रामप्रवेश राय हे सिव्हिल इंजिनिअर असून त्यांना छत्तीसगड केडर मिळाले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या बुद्धिबळाच्या छंदाबाबत विचारले आणि रणनीती आखण्यात या खेळाची कशी मदत होईल यावर त्यांनी चर्चा केली. छत्तीसगडमधील नक्षली कारवाया संदर्भात, पंतप्रधान म्हणाले की, या भागात अनन्यसाधारण आव्हाने आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच आदिवासी भागात विकास आणि सामाजिक संपर्क यावर भर देण्याची गरज आहे. पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्यासारखे तरुण अधिकारी तेथील तरुणांना हिंसाचाराच्या मार्गापासून परावृत्त  करण्यात मोठे योगदान देतील. पंतप्रधान म्हणाले की, आम्ही माओवाद्यांचा हिंसाचार रोखत आहोत आणि आदिवासी भागात विकासाचे आणि विश्वासाचे नवीन पूल उभारले जात आहेत.

हरियाणाच्या राजस्थान कॅडरच्या अधिकारी रंजिता शर्मा यांच्याशी संवाद साधताना  पंतप्रधानांनी प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या कामगिरीचा उल्लेख केला. प्रशिक्षणादरम्यान  त्यांना सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीं म्हणून गौरवण्यात आले होते. मास कम्युनिकेशन मधील शिक्षणाचा या कामात होणाऱ्या उपयोगाबद्दल पंतप्रधानांनी चर्चा केली. मुलींची स्थिती सुधारण्यासाठी हरियाणा आणि राजस्थानमध्ये झालेल्या  कामाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.  त्यांनी रंजिता याना त्यांच्या  पोस्टिंगच्या ठिकाणी मुलींना दर आठवड्याला एक तास देण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांची पूर्ण क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रेरित करण्याची सूचना केली.

केरळमधील नितीनराज पी यांना केरळ केडर मिळाले आहे. त्यांना  पंतप्रधानांनी फोटोग्राफी आणि शिकवण्याची  आवड कायम  ठेवण्याचा सल्ला दिला कारण लोकांशी जोडले जाण्याची ती  चांगली माध्यमे  आहेत.

पंजाबमधील दंतवैद्य डॉक्टर नवज्योत सिमी यांना बिहार कॅडर मिळाले आहे त्यांना पंतप्रधानांनी सांगितले की पोलीस दलात महिला अधिकाऱ्यांचे अस्तित्व या  सेवेत सकारात्मक बदल आणेल आणि कोणत्याही भीतीशिवाय करुणा आणि संवेदनशीलतेने कर्तव्य बजावण्याचा सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले की, पोलीस सेवेत अधिक महिलांचा  समावेश झाल्यास ती अधिक मजबूत होईल.

आंध्र प्रदेशातील कोमी प्रताप शिवकिशोर यांनी आयआयटी खडगपूर येथून एम टेक केले असून त्यांना आंध्र प्रदेश केडरच मिळाले आहे. पंतप्रधानांनी आर्थिक फसवणूक हाताळण्याबाबत त्यांच्या कल्पनांवर चर्चा केली. माहिती तंत्रज्ञानाच्या सर्वसमावेशक क्षमतेवर पंतप्रधानांनी भर दिला. पंतप्रधानांनी त्यांना सायबर गुन्हे  जगातील घडामोडींबाबत अवगत  राहण्यास सांगितले. डिजिटल जागरूकता सुधारण्यासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन त्यांनी युवा  अधिकाऱ्यांना केले.

मोदींनी मालदीवमधील मोहम्मद नझीम या अधिकारी प्रशिक्षणार्थीशीही संवाद साधला. मालदीवच्या निसर्गप्रेमी लोकांची  पंतप्रधानांनी प्रशंसा केली.  ते म्हणाले की मालदीव फक्त शेजारी नाही तर एक चांगला मित्र देखील आहे. भारत तेथे पोलीस अकादमी स्थापन करण्यात मदत करत आहे. पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील सामाजिक आणि व्यावसायिक संबंधांचा उल्लेख केला.

पंतप्रधानांचे संबोधन

याप्रसंगी बोलताना, पंतप्रधानांनी लक्षात आणून दिले की, येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या 75 वर्षात चांगली पोलीस सेवा निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. अलिकडील काळात, पोलीस प्रशिक्षणाशी संबंधित पायाभूत सुविधांमध्ये महत्वपूर्ण परिवर्तन घडून आले. पंतप्रधानांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना स्वातंत्र्यलढ्याची भावना लक्षात ठेवण्यास सांगितले. ते म्हणाले, 1930 ते 1947 या काळात आपली युवा पिढी महान ध्येय साध्य करण्यासाठी पुढे आली. आजच्या युवकांकडून हीच भावना अपेक्षित असल्याचे पंतप्रधान म्हणाले, ते ‘स्वराज्यासाठी’ लढले, तुम्ही ‘सु राज्य’ पुढे न्या, असे पंतप्रधानांनी भर देऊन सांगितले.  

पंतप्रधानांनी सध्याच्या महत्त्वपूर्ण काळात, भारत अनेक पातळीवर परिवर्तनाला सामोरे जात आहे, हे सांगत या काळाचे महत्त्व लक्षात ठेवण्यास सांगितले. कारण त्यांच्या सेवेतील पहिली 25 वर्षे, देशासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. पुढच्या 25 वर्षांत आपण स्वातंत्र्याच्या 75 वर्षांवरुन पुढे जात शतक साजरे करु.

पंतप्रधानांनी तांत्रिक अडथळ्यांच्या या काळात पोलिसांच्या सज्जतेवर भर दिला. ते म्हणाले, कल्पक पद्धतींनी गुन्ह्यांच्या नवीन स्वरुपाला प्रतिबंध घालण्याचे आव्हान  आहे. सायबर सुरक्षेसाठी नवनवीन प्रयोग, संशोधन आणि पद्धती हाती घेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. 

पंतप्रधान मोदी प्रशिक्षणार्थींना म्हणाले की, तुमच्याकडून लोकांना एका विशिष्ट वागणुकीची अपेक्षा असते. त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालय किंवा मुख्यालयातच नव्हे तर त्याही पलीकडे सेवेच्या सन्मानाबद्दल नेहमी जागरूक असले पाहिजे. “तुम्ही समाजासाठी निभावणाऱ्या प्रत्येक भूमिकेबद्दल जागरुक असले पाहिजे, तुम्ही मैत्रीपूर्ण राहून वर्दीच्या सर्वोच्चतेचा सन्मान केला पाहिजे” असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना स्मरण करुन दिले की, ते ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ चे ध्वजवाहक आहेत, म्हणून त्यांनी नेहमी ‘राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम’ हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे आणि प्रत्येक कृतीतून हे दिसले पाहिजे. त्यांच्या प्रत्येक निर्णयात राष्ट्रहित आणि राष्ट्रीय दृष्टीकोन सर्वोपरी असला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.  

पंतप्रधान मोदी यांनी नव्या पिढीच्या गुणवान युवा महिला अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि पोलीस दलात महिलांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असे म्हणाले. आपल्या मुली अधिक कार्यक्षमता, उत्तरदायित्व आणि नम्रता, सहजता आणि संवेदनशीलता या माध्यमातून पोलीस दलात सर्वोच्च निकष घालून देतील, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, 10 लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये आयुक्त प्रणाली (कमिशनर सिस्टीम) लागू करण्यावर राज्ये काम करत आहेत. 16 राज्यांतील काही शहरांमध्ये ही व्यवस्था लागूही करण्यात आली आहे. पोलीसिंग प्रभावी आणि भविष्यकालीन होण्यासाठी सर्वांनी सामुहिकरित्या आणि संवेदनशीलतेने कार्य करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

महामारीच्या काळात प्राण गमावलेल्या पोलिसांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. पोलिसांनी महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे त्यांनी स्मरण केले.

पंतप्रधान म्हणाले, अकादमीत शेजारील राष्ट्रांचे पोलीस अधिकारी प्रशिक्षण घेत आहेत, यातून त्या देशांशी असलेले संबंध आणि जवळीकता दिसून येते. ते म्हणाले, भूतान, नेपाळ, मालदीव आणि मॉरिशस हे केवळ शेजारी नाहीत तर समान विचारसरणी आणि सामाजिक बंध असलेले राष्ट्र आहेत. आपण गरजेच्या काळात कामी येणारे मित्र आहोत आणि ज्या-ज्यावेळी काही संकट किंवा अडचण निर्माण होते त्यावेळी सर्वात प्रथम मदतीला धावून येणारे आहोत. हे कोरोना काळातही दिसून आले आहे.