कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

औरंगाबाद,३० जुलै /प्रतिनिधी :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.  नागरिकांना कुठल्याही प्रकारे अडचणी भासू देऊ नयेत, अशी सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.           

विभागीय आयुक्त यांच्या दालनात आयोजित आढावा बैठकीत श्री. थोरात बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, अपर आयुक्त आबासाहेब बेलदार, अविनाश पाठक,  उपायुक्त पराग सोमण, जगदीश मिनीयार, पांडुरंग कुलकर्णी, वामन कदम, सहायक आयुक्त शिवाजी शिंदे, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आदी उपस्थित होते.

श्री. थोरात यांनी प्रारंभी मराठवाडा विभागातील कोरोनाची स्थिती, पाऊस, धरणातील उपलब्ध पाणीसाठा, पेरणी, अतिवृष्टीने झालेले नुकसान, गौणखनिज  याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत श्री. थोरात यांनी कौतुक करुन संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी व्यवस्थित नियोजन  करण्याबाबत सूचित केले.  कोरोना लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.   विभागातील पाऊसाच्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की, अतिवृष्टीने  नुकसान झालेल्यांना निश्चितपणे सहकार्य केले जाईल. यावेळी त्यांनी सात-बारा संगणकीकरण, ई-फेरफार यांचा देखील आढावा घेतला. वाळू लिलावाच्या संबंधित अडचणी सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्रस्ताव द्यावेत, असे त्यांनी सूचित केले.

            प्रारंभी  श्री. केंद्रेकर यांनी  विभागात  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, ऑक्सिजन, व्हेटिंलेटर, बेडची  उपलब्धता, पाऊस, पेरणी, ई-पिक पाहणी, सात-बारा संगणकीकरण, ई-फेरफार, वाळू लिलावबाबत  सविस्तर माहिती दिली. तसेच  राबविण्यात आलेले विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची  देखील त्यांनी माहिती दिली.