राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत-शरद पवारांचे आवाहन

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज

पूरबाधितांसाठी जीवनावश्यक वस्तुंचे १६ हजार कीट्स होणार रवाना

ट्रस्टचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

May be an image of 4 people and people standing

मुंबई ,२७जुलै /प्रतिनिधी :-राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली आहे.पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल शरद पवारांनी काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबादारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

राज्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट सज्ज झाली असून पूरबाधितांसाठी जीवनावश्यक वस्तुंचे १६ हजार कीट्स पाठविण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

घरगुती भांड्याचे एकूण २० हजार कीट्स व पांघरूणांचे २० हजार कीट्स यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ट्रस्टतर्फे निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात यापैकी १६ हजार कीट्सचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी-५०००, रायगड-५०००, सिंधुदुर्ग-५००, कोल्हापूर-२०००, सातारा-१०००, सांगली-२००० असे जिल्हानिहाय वाटप होणार आहे, अशी माहिती पवार साहेबांनी दिली. तसेच घरगुती भांडी, पांघरुण साहित्य, बिस्कीट व टोस्ट यांचे कीट्स इ. विविध सामग्री पुरग्रस्तांसाठी येत्या दोन ते तीन दिवसांत तातडीने रवाना केली जाणार आहे.पूरग्रस्तांच्या आरोग्याचा विचार करून २५० डॉक्टरांची पथके बाधित गावांमध्ये कॅम्प आयोजित करून रुग्णांची तपासणी, उपचार आणि औषधांचे वाटप करणार आहेत. पुरामुळे निर्माण झालेले रोग उदा. ताप, सर्दी, खोकला, उलटी आदींसाठी औषधे पुरवली जाणार आहेत. तसेच १ लाख वाटप कोरोना प्रतिबंधक मास्कचा पुरवठा केला जाईल. याशिवाय पूरग्रस्त भागात ५ अ‍ॅम्ब्युलन्स पाठवल्या जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

May be an image of one or more people, people standing and text that says 'NOWNEL AMBULANCE Bsid AMBU ONN राष्ट्रवादी वेल्फेअर'

महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अमरावतीच्या काही भागात घरांचे नुकसान आणि अन्य नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्य या संकटाच्या काळात पूरग्रस्तांच्या सोबत आहे. हे जिल्हे सोडल्यास राज्याच्या उर्वरीत भागात अतिवृष्टीमुळे शेतीचेही नुकसान झाले आहे. मात्र या सहा जिल्ह्यांमध्ये झालेले नुकसान प्रचंड आहे. त्यामुळे तिथे तातडीने मदत देण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकार आपल्यापरीने मदत जाहीर करेलच. पूरपरिस्थितीचे पूर्ण चित्र राज्य सरकारसमोर आल्यानंतर अंतिम धोरण आखले जाईल.आमच्याकडे आलेल्या आकडेवारीनुसार सहा जिल्ह्यांमध्ये १६ हजार घरे पुरामुळे बाधित झाली आहेत. या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून जीवनावश्यक वस्तूंचे १६ हजार कीट्स पाठविण्यात येणार आहेत. यात घरगुती भांडी, पांघरुण साहित्य, खाण्याच्या वस्तू यांचा समावेश असणार आहे. तसेच पुरानंतर उद्भवणाऱ्या आजारांचा विचार करून २५० डॉक्टरांची पथके बाधित गावांमध्ये कॅम्प आयोजित करून रुग्णांची तपासणी, उपचार आणि औषधांचे वाटप करणार आहेत. तसेच १ लाख कोरोना प्रतिबंधक मास्कचा पुरवठा ट्रस्टकडून केला जाणार आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी पूरग्रस्त भागासाठी पाच रुग्णवाहिका दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे यांची २५० डॉक्टरांची टीम ही पूरग्रस्त भागातील गावात जाऊन लोकांची आरोग्य तपासणी करणार आहे. सौम्य आजार असलेल्या लोकांना औषधे दिली जाणार आहेत. तर गंभीर आजाराच्या रुग्णांना सरकारी रुग्णालयात भरती केले जाईल. ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जग्गनाथ शिंदे हे पूरग्रस्त भागाला औषधे पुरविण्याचे काम करणार आहेत. तसेच लहान मुलांसाठी बिस्किट आणि टोस्ट याचे वीस हजार किट्स ब्रिटानिया आणि इतर कंपन्याकडून एकत्र करून त्याचे वाटप केले जाणार आहे.राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या या मदतीची किंमत अडीच कोटींच्या आसपास आहे. याशिवाय जिल्हा पातळीवर देखील पक्षाचे नेते, कार्यकर्ते आपापल्यापरिने मदत करतील अशी माहिती शरद पवार यांनी दिली.