मोठी दुर्घटना! रायगडमधील तळई गावात दरड कोसळून 37 जणांचा मृत्यू

राज्यावर अस्मानी संकट, आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू

सुतारवाडी आणि केवनाळे गावात भुस्खलन होऊन 11 जणांचा मृत्यू

महाड-पोलादपूर येथील पूरबाधितांच्या उपचारासाठीजिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतीलमृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदतीची घोषणा

Video : रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, 80 ते 90 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली, नेमकं काय घडलं?

अलिबाग,जि.रायगड,२३ जुलै /प्रतिनिधी :- सतत चालू असलेल्या पावसामुळे गेल्या दोन दिवसात महाड येथे पूरस्थिती/ अतिवृष्टी झालेली आहे. गुरुवार, दि. 22 जुलै, 2021 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता तळीये गाव (वरची वाडी) ता.महाड येथे अचानक दरड कोसळल्याने जवळपास 30 घरे ढिगाऱ्याखाली गेली. आज दि.23 जुलै रोजी दुपारी 1.00 वाजेपर्यंत 32 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तसेच पोलादपूर तालुक्यातील केवनाळे-सुतारवाडी ता. पोलादपूर गावातील 5 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. अशा एकूण 37 मृतदेहांचे शवविच्छेदन जागेवरच (Spot Post Mortem) करण्यात येणार आहेत. यानंतरही अजूनही काही व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकलेल्या असून शोधकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. तसेच महाडमध्ये 7 ते 8 फूटावर खूप उंचीवर पाणी साचलेले असून अद्यापही जखमी रुग्ण सापडलेले नाहीत व उंच ठिकाणी ज्या व्यक्ती आहेत, त्यांना हेलिकॉप्टरने स्थलांतरित करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी दिली आहे.

महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनपेक्षित संकट ओढवले आहे. तालुक्यातील मौजे तळीये येथे काल ३५ घरांवर दरड कोसळल्याने काही लोक ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. यापैकी ३६ जणांचा मृतदेह आतापर्यंत त्यातून बाहेर काढण्यात आला असून काही जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एनडीआरएफच्या १२ जणांची टिम दुर्घटनास्थळी दाखल झाली असून बचाव व शोधमोहिम कार्य वेगाने सुरू आहे. रूग्णवाहिकादेखील याठिकाणी पोहचल्या आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्यास अडचणी निर्माण होत आहे. आपत्तीजन्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून सभोवतालच्या परिसरातील रहिवाश्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्यात येत आहे.

VIDEO: काल इथे गाव होतं... डोंगराच्या आडोशाला गेले आणि...; तळीयेची दुर्घटना नेमकी कशी घडली?; वाचा सविस्तर

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं थैमान घातले आहे. मुंबई, ठाणे, सातारा आणि कोकणात झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेमध्ये राज्यात 121 जणांचा मृत्यू झाला आहे. पुढील 3 दिवस कोल्हापूर, पुणे  रायगड, पालघर मुंबई आणि ठाण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगडमध्ये पावसामुळे हाहाकार उडाला आहे.  पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी आणि केवनाळे गावात भुस्खलन होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत एक 9 वर्षांची मुलगी अजूनही बेपत्ता आहे.

पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे गावात भुस्खलनहोऊन अनेक लोक ढिगाराखाली अडकले होते. उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचावकार्याअंती 11 लोक मृत झाल्याचे समोर आले आहे. तर 28 लोक जखमी झाले आहेत. साखर सुतारवाडी येथून पाच तर केवनाळेयेथील सर्व पाचही मृतांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काडण्यात यश आले आहे.

जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

May be an image of 1 person and sitting

राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

एमआयडीसी बिरवाडी, महाड येथे दोन कंपन्यांमध्ये स्फोट होवून आग लागल्याची घटना घडली होती परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आलेले आहे.तसेच मागील 2 दिवसापासून विद्युत पुरवठा बंद असल्याने महाड येथील खाजगी व शासकीय डॉक्टर्स यांच्याशी संपर्क होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचप्रमाणे महाड येथील कोविड सेंटर (सीसीसी / डिसीएचसी) सेंटरमधील रुग्ण सुरक्षित असून जिल्हा स्तरावरुन व उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथून औषधांचा व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरु आहे. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत प्रतिबंधात्मक औषधोपचारही सुरु आहेत. उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे 37 रक्तपिशव्या उपलब्ध असून 50 रक्तपिशव्यांची अलिबाग जिल्हा रुग्णालय येथून मागणी करण्यात आली आहे.

गंभीर जखमी रुग्णांना (Poly Trama) एम.जी.एम. कामोठे, जिल्हा रुग्णालय अलिबाग व गरज भासल्यास जे.जे. रुग्णालय मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. स्थिर व किरकोळ जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय माणगांव व जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे दाखल करण्यात येत आहे. विविध स्वयंसेवी संस्थेमार्फत गरजूंना पाणी, जेवणाची पाकीटे व औषधांचा पुरवठा करण्यात येत असून शवविच्छेदन करण्यासाठी 1) उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील तज्ञपथक (न्यायवैद्यक तज्ञ) डॉक्टरांसह 2) उपजिल्हा रुग्णालय, म्हसळा, 3) उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन, 4) उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे चार वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. पालकमंत्री कु.आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे यांनी महाड येथे पाहणी करून जखमींची विचारपूस करून सर्व संबंधीत विभागांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी कळविले आहे.तसेच वैद्यकीय सोयी-सुविधांबाबत संपर्कासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य हेल्पलाईन नं. 02140-263006/263003, डॉ. प्रदीप इंगोले, वैद्यकीय अधीक्षक (नोडल ऑफिसर) मो.नं.9130733202/8369424489, सनियंत्रण अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अलिबाग रायगड मो.नं. 9404001000 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.

जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त



महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

ट्विटरच्या माध्यमातून प्रसारित केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात, “महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या अपघातातील जीवितहानीमुळे अतिशय व्यथित झालो आहे. शोकाकुल परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्तींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात उदभवलेल्या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष दिले जात असून बाधितांना मदत पुरवली जात आहे.”

या दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, “महाराष्ट्रात रायगडमध्ये दरड कोसळून झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपयांची नुकसानभरपाई पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून दिली जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.”

महाडमधील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे प्रशासनाला निर्देश

अलिबाग,जि.रायगड: जिल्ह्यातील महाड या तालुक्यातील अतिवृष्टी झाल्याने उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित नागरिकांचे आणि जनावरांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा व जलदगतीने मदतकार्य सुरू करा, अशा सूचना आज पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील महाड येथील पूरपरिस्थितीची पहाणी करुन पूरबाधितांना मदतकार्य पोहोचण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी खासदार सुनिल तटकरे, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, स्थानिक प्रशासनातील इतर अधिकारी आदिंची उपस्थिती होती.

May be an image of 8 people, people sitting, people standing and outdoors

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या भागातील पावसाचा आणि पूरपरिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतरण करून त्यांना युद्धपातळीवर मदत पोहोचवावी व स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी अन्नधान्य, औषध पुरवठा, वैद्यकीय सेवा सुविधा या सारख्या आवश्यक सर्व बाबी उपलब्ध करुन द्याव्यात तसेच जनावरांनाही आवश्यक पशुखाद्य आणि पाणी पुरवावे, अतिवृष्टीमुळे खंडित झालेली दूरध्वनी सेवा आणि विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करावा, अशा सूचना दिल्या. तसेच या आपत्कालीन परिस्थितीवर मात करुन मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रीमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांच्या सहकार्याने पूरबाधितांना योग्य ती मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

महाड तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु असून मदतकार्य वेगाने सुरु आहे. या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारणची 2 पथके, राज्य आपत्ती निवारणची 2 पथके, नौदलाची 2 पथके, सागरी सीमा सुरक्षा दलाची 2 पथके तसेच 12 स्थानिक रेस्क्यू टीममार्फत मदतकार्य सुरु आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु आहे. पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे परंतु पाणी ओसरले तरी महाबळेश्वरला पडत असलेला पाऊस, संभाव्य अतिवृष्टीचा इशारा यामुळे महाड शहरात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सखल भागात व पूरप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांनी पुढील काही दिवस प्रशासनाने निश्चित केलेल्या सुरक्षित निवारास्थळांमध्ये स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही सुरु असून त्याठिकाणी प्रशासनामार्फत पूरबाधितांसाठी कपडे, पिण्याचे पाणी, बिस्कीट, अन्नधान्य, वैद्यकीय उपचार अशा विविध आवश्यक बाबींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय पथके लोणरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.

May be an image of 2 people, people standing and outdoors

नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग 02141-222097 / 227452, व्हॉट्सअप क्रमांक 8275152363 येथे संपर्क साधावा, तसेच महाड व पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी खाद्यपदार्थ, पाणी बॉटल्स, बिस्कीट, दूध पॉकेट, कपडे, चादर-बेड शीट, सतरंजी व इतर जीवन उपयोगी साहित्य स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, व्यापारी, उद्योगपती व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पाठवावयाचे असल्यास 1) मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड – 9965100800. 2) प्रशाली दिघावकर, उपविभागीय अधिकारी, माणगाव – 7588816292, 3) प्रियांका आयरे-कांबळे, तहसिलदार, माणगाव – 8805160570, 4) परमेश्वर खरोडे, अव्वल कारकून, माणगाव तहसील – 9028585985, 9804546546, या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.पूरग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपविली आहे. तर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे,आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे व इतर लोकप्रतिनिधी सातत्याने या भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून जिल्हाधिकारी निधी चौधरी व प्रशासनातील जिल्हा परिषद, महसूल, आरोग्य, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, तसेच इतर विभागातील अधिकारी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करीत आहेत.

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात बचाव व मदतकार्यासाठी सैन्यदलांच्या मदतीचे संरक्षणमंत्र्यांकडून आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा

उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मीडिया यंत्रणेची गरज नाही

मुंबई, दि. 23 : रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन  संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात असल्याची माहीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राज्यात सर्वदूर होत असलेल्या अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार जातीने लक्ष ठेवून आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून तसेच खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे तसेच स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रीमहोदयांना तसेच लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत.

कोयना धरण परिसरातील अतिवृष्टीमुळे धरणाची पाणीपातळी वाढत असून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. कोयना धरणाच्या पाणीपातळीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वत: जातीने लक्ष ठेवून असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही संपर्कात आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत नियंत्रणात ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, गुहागर, पाटण, शिराळा, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये पूरस्थिती गंभीर असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ व सैन्यदलांची मदत घेण्यात येत आहे. लष्कर व नौदलही बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून गरजेनुसार सैन्यदलाची अधिकची मदत तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

अतिवृष्टीग्रस्त भागात रस्ते वाहून गेल्याने व दरड कोसळल्याने ज्या गावांचा संपर्क तुटला आहे तिथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे व खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांनीही आपत्कालिन परिस्थितीत आपापल्या भागातल्या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या बचाव व मदतकार्यात सहकार्य करावे. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षितस्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाशी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.