ऑलिंपिकमध्ये यंदा भारतीय खेळाडूंचा मोठा चमू सामील

पुणे:जपानची राजधानी टोकियो येथे काल (23 जुलै) पासून सुरू झालेल्या ऑलिंपिकमध्ये यंदा भारतीय खेळाडूंचा मोठा चमू सामील झाला आहे. भारतातून प्रथमच 119 इतका मोठा खेळाडूंचा गट या जागतिक स्पर्धेत उतरला आहे.

या सर्व खेळाडूंपर्यन्त भारतीय जनमानसातून भरगोस शुभेच्छा पोहचाव्यात यासाठी प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र – गोवा), पुणे तसेच, या विभागांतर्गत काम करणार्‍या 11 क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोंनी ‘चियर फॉर इंडिया’ मोहिम हाती घेतली होती.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या या सर्व एकाकांनी #cheer4indiaचे फोटो स्टँडी महाराष्ट्र व गोव्यात उभे केले होते. अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, वर्धा, नागपूर, सोलापूर, पणजी अशा सर्व ठिकाणी या उपक्रमाला लोकांनी भरपूर प्रतिसाद देत फोटो काढले.

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, अहमदनगर यांनी यानिमित्ताने शुभेच्छा स्वाक्षरी मोहिम राबविली.

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, अमरावतीने ‘करिअरमध्ये खेळाचे महत्व’ या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते. योगायोग असा की यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या डॉ. सुरेश देशपांडे यांच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील मल्लखांबपटूंची यंदाच्या ऑलिंपिकमध्ये कौशल्य सादरीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. सुमारे 85 वर्षांनंतर भारतीय मल्लखांबाचे प्रात्यक्षिक जागतिक स्तरावरच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये होत आहे.

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद व नागपूरने सायकल फेरीचे आयोजन केले होते. याला अनेक सायकल पटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, नांदेडने क्रीडा अकादमीच्या सहयोगाने धावफेरीचे आयोजन केले होते. यावेळी संपूर्ण स्टेडीयम cheer4indiaच्या घोषणांनी दुमदुमून गेले.

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, नाशिक यांनी देखील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, पणजी, गोवा कार्यालयाने 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. ऑलिंपिक असोसिएशन, गोवा यांच्या सहयोगाने ऑलिंपिक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होणार आहे; त्या ठिकाणी फोटो स्टँडी उभारण्यात आली आहे. गोव्याचे क्रीडा मंत्री मनोहर (बाबू) अजगावकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  

प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणेने ऑलिंपिक खेळाडूंना शुभेच्छा म्हणून नागरिकांना डिजिटली किंवा हाताने रेखाटलेले भित्तिचित्र (पोस्टर) आणि घोषवाक्य (स्लोगन) तयार करण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 30 जुलै पर्यन्त स्पर्धक आपली कला सादर करू शकतात.