कोविड चाचण्या वाढविण्यावर अधिक भर द्या-प्रशासक आस्तिककुमार पांडेय

Displaying DSC_8210.JPG

औरंगाबाद, २३ जुलै /प्रतिनिधी :- कोविड विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून यंत्रणांनी कोविड चाचण्या वाढविण्यावर अधिक भर द्यावा, अशा सूचना मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड उपाय योजनांबाबतच्या आढावा बैठकीत श्री. पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी नेमाणे, पोलीस उपायुक्त सुरेश वानखेडे यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

कोविड प्रतिबंधात्मक लशी प्रशासनाकडे उपलब्ध होताच, तत्काळ त्या नागरिकांना द्याव्यात. लशींचा साठा शिल्लक राहणार नाही, याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी. लसीकरणासाठी आवश्यक असलेले नियोजन काटकोरपणे करावे. त्याची अंमलबजावणी करावी. जिल्ह्याचा 16 जुलै ते 22 जुलै दरम्यान 1.15 टक्के बाधित दर आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचीही प्राधान्याने काळजी घेण्यात यावी. या रुग्णांच्या उपचारात आवश्यक असलेल्या औषधी, त्यांची उपलब्धता याबाबत खबरदारी घ्यावी, अशा श्री. पांडेय यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

जिल्ह्यातील कोविड स्थिती आणि प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती डॉ. गव्हाणे यांनी सादर केली. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोविड चाचण्या, पॉझिटिव्हीटी दर, खाटांचे व्यवस्थापन, ऑक्सीजन साठा, कोविड लसीकरण आदींबाबतही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच योग्य त्या सूचनाही केल्या.