लवकरात लवकर कोकण रेल्वे पुर्ववत करा

कोकणात गणेशोत्सवासाठी अजुन 40 गाड्या-रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे याची माहिती

मुंबई ,२३ जुलै /प्रतिनिधी :- कोकणातील पूर परिस्थितीतून मार्ग काढून रेल्वे लवकरात लवकर सुरु कशी करता येईल जेणेकरून मदत कार्याला वेग येईल.. याबाबत तातडीने आढावा घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना करतानाच गणेशोत्सवासाठी अजून 40 गाड्यांचे नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केल्या आहेत.
भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्यासह खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांनी आज नवी दिल्ली येथे रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन कोकणातील पुर परिस्थिती आणि रेल्वे, तसेच मुंबईत दरवेळी निर्माण होणारी पुर परिस्थिती आणि रेल्वेच्या दळणवळणावर होणारे परिणाम याबाबत चर्चा केली. याबाबत दानवे यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणांची ततडीने आढावा घेऊन आवश्यकत्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. कोकणात रेल्वेची सेवा लवकरात लवकर सुरु झाल्यास चिपळूण, संगमनेर आणि तळकोकणात मदत कार्याला वेग येईल त्यामुळे रेल्वे तातडीने पुर्ववत करण्यासाठी काम करण्यात यावे याबाबत आवश्यक सूचना त्यांनी केल्या. तसेच मुंबई बाबतीतही कायमस्वरूपी उपाययोजना सुचवायला त्यांनी सांगितल्या आहेत.
दरम्यान, कोकणात गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने सोडलेल्या 72 गाड्या फुल झाल्यामुळे अधिकच्या गाड्यांची मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली होती. त्यानुसार अजून 40 गाड्यांची घोषणा आज दिल्लीतून रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.  त्यामुळे आता गणेशोत्सवासाठी 112 गाड्या उपलब्ध होणार आहेत. तसेच त्यानंतर ही जर प्रतिक्षा यादी वाढल्यास गाड्यांची संख्या लाढविण्यात येईल, असेही मंत्री दानवे यांनी पत्रकार परिषदे घेऊन जाहीर केले आहे. कोकणवासीयांना तातडीने न्याय दिल्याबद्दल रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे आमदार अँड आशिष शेलार यांनी आभार मानले आहेत.