पं. नाथराव नेरलकर शिष्यांची गुरूपौर्णिमा साजरी

औरंगाबाद ,२३ जुलै /प्रतिनिधी :- अनंत संगीत विद्यालयाचे संस्थापक महान संगीतकार गायक कै. पंं. नाथराव नेरलकर यांच्या शिष्य वर्गाच्या वतीने गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरूजींच्या माघारी ही पहिलीच गुरू पौर्णिमा. कोरोना काळात त्यांच्या आकस्मिक जाण्यानं सर्वानाच धक्का बसला होता.
आज त्यांच्या शिष्यांनी स्वरांजली अर्पण करून आपल्या भावनांना वाट करून दिली.
डाॅ. श्रीरंग देशपांडे यांनी पं. नाथराव नेरलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली.
पं. नाथरावांचे शिष्य आणि ज्येष्ठ शिष्य पं. जयंत नेरलकर यांनी गुरूजींची यमन रागातील बंदिश गावून संगीत सभेस सुरवात केली.

जयराम शिवराम, लक्ष्मीकांत बोर्डे, अविनाश मुळावेकर त्यानंतर जानकीदास सांगवीकर – (बागेश्री)श्रीगीता भट्टाचार्य,अनुभव अरूण,प्रथमेश महाबळेश्वरकर,शुभम बोर्डे,नितीन कुमार, दिलीप दोडके आदींनी गायन सेवा दिली.
पं. नाथराव यांच्या आवाजातील भैरवीची ध्वनीफीत ऐकवण्यात आली.कार्यक्रमास ज्येष्ठ शिष्य शिवराम व जयराम गोसावी, अविनाश मुळावेकर, लक्ष्मीकांत बोर्डे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.श्रीकांत गोसावी यांनीही गायन सादर केले.

सर्व शिष्यांच्या आणि रसिकांच्या वतीने श्रद्धांजली वाहताना श्रीकांत उमरीकर यांनी अभंगातून भावना व्यक्त केली

यथाशक्ती पुढे । चालवु वारसा ।
ठेवा भरवसा । आम्हावर ।।१।।
शिकविले शिष्य । घोटोनिया तान ।
रसिकांचा कान । घडविला ।।२।।
म्हणाला वाहव्वा । तूम्ही दिली दाद ।
तोची हा प्रसाद । संगीताचा ।।३।।
तुमच्या कष्टाने । रूजले संगीत ।
जीवन रंगीत । बनले गा ।।४।।
मराठवाड्याच्या । मातीचाच गुण ।
इथे कण कण । कलासक्त ।।५।।
ओले केले त्याला । कोरडे जे रूक्ष ।
बीजाचा हो वृक्ष । आज येथे ।।६।।
तुमच्या आतल्या । गुरूला वंदन ।
सुरांचे चंदन । घमघमे ।।७।।
आम्ही कानसेन । गळ्यात ना सुर ।
भावनांचा पुर । कांत म्हणे ।।८।।

पोटापुरते देई विठ्ठला लई नाही लई नाही मागणे या भैरवीने सांगता झाली. जयंत नेरलकर यांनी सर्वांचे आभार मानले. श्रीकांत उमरीकर यांनी सुत्र संचालन केले. तबल्यावर साथ पंकज मोरे आणि गोसावी यांनी केली.