कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थती

पूर परिस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री- मुख्यमंत्री यांची चर्चा

बहुतांश नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या २ तुकड्या दाखल

नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने संपर्कात

मुंबई / कोल्हापूर,२२जुलै /प्रतिनिधी:- जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफ च्या 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे.  आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी 25 जवानांची 2 पथके सज्ज झाली आहेत.

Image

राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज सायंकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती दिली.

Image

एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आणि मुसळधार पाऊस आणि पुरामुळे  महाराष्ट्रातील काही भागात उद्‌भवलेल्या परिस्थितीवर चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी  प्रार्थना करीत आहे.बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पथक प्रमुख निरीक्षक ब्रिजेशकुमार रैकवार, निरीक्षक बलबीरलाल वर्मा, उपनिरीक्षक अजयकुमार यादव यांच्याशी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती व मदतकार्याबाबत चर्चा केली. जिल्ह्यात मदतकार्य करताना या पथकाला कोणतीही अडचण आल्यास प्रशासन पूर्णपणे सहकार्य करेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी एनडीआरएफ च्या जवानांना दिले. कोरोना परिस्थितीत आवश्यक ती खबरदारी घेऊन मदतकार्य करण्यासाठी पथक सज्ज असल्याचा विश्वास पथकातील निरीक्षक ब्रिजेशकुमार रैकवार यांनी व्यक्त केला.

पूरपरिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काल रात्रीपासून बऱ्याच नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नदीकाठचे नागरिक, पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांबरोबरच सर्वांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करावे, जेणेकरून  वेळेत मदत उपलब्ध करुन देवून जिवीत व वित्तहानी टाळता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

जिल्ह्यात पावसाच्या पाण्यामुळे बंद करण्यात आलेले रस्ते नागरिकांनी ओलांडू नयेत. तसेच या ठिकाणी लावण्यात आलेले बॅरीगेट्स काढण्याचा प्रयत्न करून स्वत:चा व कुटूंबियांचा जीव धोक्यात घालू नये.

पूरपरिस्थितीमुळे बाधित नागरिकांचे आणि जनावरांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा -पालकमंत्री सतेज पाटील
May be an image of 4 people, people standing, people sitting and indoor

सध्याच्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या भागातील नागरिकांचे आणि जनावरांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, अशा सूचना देवून प्रयाग चिखली, आंबेवाडी, आरे यासह पुराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या गावातील ग्रामस्थांचे शंभर टक्के स्थलांतर करून जलदगतीने मदतकार्य सुरू करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील विविध भागांतील पावसाचा आणि पूरपरिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी पंचगंगा नदीची पाणी पातळी सतत वाढत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४३ फुटांवर गेल्यानंतर कोल्हापूर-रत्नागिरी रस्ता बंद होतो. त्यामुळे प्रयाग चिखली, आंबेवाडी आणि आरे गावातील पूरग्रस्त नागरिकांचे १०० टक्के स्थलांतर करावे, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. जिल्ह्यातील पुरबाधित नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतरण करून त्यांना युद्धपातळीवर मदत पोहचवावी. स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करावी. यात अन्नधान्य, औषध पुरवठा, वैद्यकीय सेवा सुविधा पुरवाव्यात. तसेच जनावरांनाही आवश्यक चारा, पाणी आणि पशुखाद्य पुरवावे, अशा सूचना देऊन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पूरग्रस्त भागात अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः जाऊन मदत करावी. अतिवृष्टीमुळे खंडित झालेला दूरध्वनी आणि विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करावा. पूर परिस्थितीमुळे चंदगड, गडहिंग्लज, आजरा मार्ग बंद झाले आहेत. कर्नाटक मार्गावरुन चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागात येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना आरटीपीसीआर तपासणी बंधनकारक करु नये, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दूरध्वनीवरून केल्या. जिल्ह्यात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांपर्यंत गतीने मदतकार्य पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रसंगी हेलिकॉप्टर ची मदत घेण्यात येईल, असे सांगून यासाठी हेलिपॅड ची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्याकडून घेतली.त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प, शाहूपुरी, रामानंदनगरसह पुरबाधित भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांरीत करण्याचा सूचना त्यांनी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिल्या.

कणकवली – कनेडी मल्हार पुलाचा काही भाग कोसळला; वाहतूक बंद

सिंधुदुर्गनगरी –जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे कणकवली – कनेडी दरम्यानच्या मल्हार पुलाचा काही भाग कोसळला असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे कनेडी परिसरातील गावांचा कणकवली शहराशी संपर्क तुटला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

Image

वागदे येथे राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यामुळे मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाघोटन नदीने इशारापातळी ओलांडल्यामुळे खारेपाटण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गड नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे कणकवली येथील गोपुरी आश्रमाजवळील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. कणकवली तालुक्यात हरकुळ बुद्रुक येथे रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वैभववाडी तालुक्यातील जांभवडे येथील जामदा पूल पूर्णपणे बुडाला असून गुरववाडीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. तसेच नदीकाठची भात शेती वाहून गेली आहे.

दोडामार्ग तालुक्यात भेडशी कॉजवेवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच घोडगेवाडी – केर, परमे – भेडशी, उसप – खोक्रल, खोक्रल – मांगेली  या मार्गांवरही पाणी आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. आंबेरी पुलावर अजूनही पाणी असून वाहतूक बंद आहे. कणकवली रस्ता (श्रावण नदीवाडी) पाण्यामुळे वाहतूक बंद आहे.

Image

तिरवडे तर्फ सौंदल येथील चंद्रकांत लक्ष्मण पावसकर यांचा घरा बाहेरील शौचालय कोसळले आहे. लोरे नं.2 पियाळी नदीच्या पुलावरील पाणी कमी झालेले असून वाहतूक सुरू झालेली आहे.

पूर परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली

पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने  एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्यदलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

तसेच पुणे विभागातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेवून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुध्दा एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत मदत व बचावकार्य करण्यात येत आहे.

एनडीआरएफच्या २ तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी २५ जवानांची २ पथके सज्ज झाली आहेत.