कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी ‘राष्ट्रवादी‌ सेवा‌ दूत’ देणार मायेचा आधार

उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त “राष्ट्रवादी जीवलग” उपक्रमाची खा. सुप्रियाताई सुळे यांच्याकडून घोषणा

मुंबई,२१ जुलै /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपमुख्यमंत्री ‌अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “राष्ट्रवादी जीवलग” या उपक्रमाची घोषणा केली आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मायेचा आधार या माध्यमातून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टद्वारे दिला जाणार आहे.

कोरोनामुळे आई व वडीलांचे‌ छत्र हरपलेल्या राज्यातील बालकांचे भविष्य‌ अंधकारमय होते‌ की काय, अशी भीती‌ होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने या मुलांचे पालकत्व घेत त्यांना आर्थिक मदत मिळेल, याची तरतूद केली आहे. त्याचबरोबर या मुलांना आपल्या जवळचे व्यक्तीचे प्रेम, आधार, पाठिंबा, सहकार्य मिळावे यासाठी राष्ट्रवादी‌ काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट कडून राष्ट्रवादी‌ जीवलग उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ४५० ‘राष्ट्रवादी‌ सेवा‌ दूत’ या मुलांचे पालक बनणार आहेत, अशी माहिती खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिली.

May be an image of text that says 'राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट कोविड अनाथांशी आपुलकीचं नातं! "राष्ट्रवादी जीवलग" देणार मायेचे आश्वासक छत्र!! राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचा अभिनव संकल्प!!!'

कोविड अनाथांशी आपुलकीचं नातं !‘‘राष्ट्रवादी जीवलग’’ देणार मायेचे आश्वासक छत्र !!राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचा अभिनव संकल्प !!!

त्या चिमुकल्या जिवांचं आभाळागत मायेचं छत्र कोरोनाने हिरावून घेतलं. हसतं-खेळतं कुटुंब अचानक गुमसुम झालं. हक्काने काळजी घेणारे आई-वडीलच या लहानग्या जिवांना पोरकं करून गेले. मागे राहिलेल्या या बालकांच्या आयुष्याचं गणित आता आपल्या सर्वांनाच मिळून सोडवावं लागेल.

शासन, नातेवाईक, सामाजिक संस्था आपापल्या परीने जबाबदारी उचलतायत. पण आयुष्यभर साथ देणारा विश्वासाचा हात या बालवयात पाठीशी असावा लागतो.तो हात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचाच असेल.या लहानग्यांसोबत कायमस्वरूपी आपुलकीचं नातं जोडण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने पुढाकार घेतलाय. त्यांना हक्काचे दादा-ताई, भाऊ-आक्का, काका-काकू, मामा-मामी, आत्ये-तात्या बनण्यासाठी आणि त्यांचा विश्वासाचा माणूस म्हणून आपुलकीचं नातं जोडण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे युवक, युवती, विद्यार्थी यांतून निवडलेले जीवलग कार्यकर्ते पुढे येत आहेत. ते या मुलांच्या आयुष्यातील सच्चे भागीदार होतील. त्यांचे मित्र, साहाय्यक, मार्गदर्शकही होतील.

चाकोरी पलीकडे जाऊन या मुलांना सावरण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे हे जीवलग आपुलकीने प्रयत्न करतील. त्यांना कोमेजू न देता, त्यांनी आयुष्य पुन्हा स्वच्छंदी पाखराप्रमाणे जगावं यासाठी समरसून प्रयत्न करतील.ही मुलं अनाथपण विसरून या जीवलगांकडे हक्कानं व्यक्त होतील. हट्ट धरतील, रडतील, खेळतील. या मुलांच्या सातत्याने भेटी होतील. त्यातूनच आधाराचा आश्वासक हात घट्ट होत जाईल. त्यांच्या अडचणींच्या काळात, सुखदुःखात हक्काचं मायेचं छत्र राष्ट्रवादीचे जीवलग बहाल करतील.चला, तर मग या लहानग्यांना आधार देऊया… !त्यांच्याशी आपुलकीचं नातं निर्माण करूया… !!त्यांचे जीवलग बनूया… !!!