देशातील दलित, महिला, ओबीसी समाजातील व्यक्ती तसेच शेतकऱ्यांची मुले मंत्री होणं काही लोकांच्या पचनी पडत नाही : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदींची टीका

महिला, दलित, आदिवासी मंत्री मोठ्या संख्येने असणं उत्साह, आनंद आणि अभिमानास्पद बाब : पंतप्रधान

नवी दिल्ली ,१९जुलै /प्रतिनिधी :-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सोमवारी गोंधळ झाला, त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करावे लागले. या गोंधळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून देता आला नाही. शेतकरी, आदिवासी केंद्रात मंत्री झाल्याचे विरोधकांना पाहावले नाही. हे लोक दलितविरोधी आहेत, असा संताप पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 दलित समाजाच्या प्रतिनिधींचे नाव ऐकायला हे तयार नाहीत. ही कुठली  मा‍नसिकता आहे, जी दलितांचा गौरव करायला तयार नाही, आदिवासींचा गौरव करायला तयार नाही, शेतकऱ्याच्या गौरव करायला तयार नाही, ही कुठली  मा‍नसिकता आहे, जी महिलांचा गौरव करायला तयार नाही . अशा प्रकारची  विकृत मानसिकता प्रथमच या सभागृहाने पाहिली आहे, अशी टीका मोदी यांनी राज्यसभेत केली. 

मोदी नेमकं काय म्हणाले –

आज सभागृहात उत्साहाचे वातावरण असणार कारण आमच्या महिला खासदार, मोठ्या संख्येने मंत्रीपदांवर रुजू झाल्या आहेत. आज मला खूप आनंद झाला आहे, की आमचे दलित बांधव मोठ्या संख्येने मंत्रीपदावर आरुढ झाले आहेत. आज आपल्या आदिवासी अनुसूचीत जमातीतील सर्व सहकारी मोठ्या संख्येने मंत्री झाले आहेत याबद्दल सर्वांना आनंद झाला असणार, असा मी विचार करत होतो.

या वेळी सभागृहात असलेले आपले सहकारी खासदार जे शेतकरी कुटुंबातील आहेत, ग्रामीण भागातून पुढे आले आहेत, सामाजिक-आर्थिकद्रूष्ट्या मागासवर्गीय, ओबीसी समाजातील आहेत, त्यांना मोठ्या संख्येने मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे, त्यांचा परिचय करून देण्यात आनंद झाला असता, प्रत्येक बाकावरून, ते बाक वाजवून त्यांचा सन्मान करण्यात आला असता. पण कदाचित देशातील दलित मंत्री व्हावेत, देशातील महिला मंत्री व्हाव्यात, देशातील इतर मागासवर्गीय मंत्री व्हावेत, देशातील शेतकऱ्यांची मुले मंत्री व्हावीत, ही गोष्ट काही लोकांना पसंत पडली नसावी आणि म्हणून ते त्यांचा परिचय देखील होऊन देत नाहीत. आणि म्हणूनच, माननीय सभापती महोदय, मंत्रिमंडळातील नवनियुक्त सदस्यांची  लोकसभेत ओळख झाली पाहिजे.