मुंबईत मुसळधार,मुंबईसह पुण्याला झोडपणार पाऊस; 9 जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यातील अनेक भागात पावसाची ओढ

मुंबई ,१९जुलै /प्रतिनिधी :- मुंबई आणि परिसराला पाऊस झोडपून काढत असला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढलेली आहे. जुलै महिना अर्धा संपला तरी राज्याच्या अनेक तालुक्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पावसाने अशीच पाठ फिरवली तर पिण्याच्या पाण्याची समस्याही उद्भवू शकते.

शुक्रवार मध्यरात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे मुंबईकराचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज मुंबईसह एकूण नऊ जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

आज संपूर्ण कोकण विभागाला आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला आहे. तर संबंधित जिल्ह्यात उद्यापासून सलग चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार आहे. आज मुंबईसह, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय, पुढील तीन तासांत मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांच्या कडकडासह वेगवान वाराही वाहण्याची शक्यता आहेत. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना, लांबचा प्रवास टाळण्याचा आणि मोठ्या झाडाखाली उभा न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञाकडून देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसानं काहीसी विश्रांती घेतली आहे. दरम्यानच्या काळात याठिकाणी एक दोनदा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पण विदर्भातील शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. आज संपूर्ण विदर्भाला आणि दक्षिण महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळू शकतात.

Weather Alert

राज्यातील 13 तालुक्यात 25 ते 50 टक्केच पाऊस झाला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 5 तालुके आणि नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यांचा समावेश आहे. 33 तालुक्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. तर 309 तालुक्यात 75 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले आहे.

सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यात – 31 टक्के, नाशिक जिल्ह्यात – 60 टक्के, तर पुणे जिल्ह्यात 71 टक्के इतका झाला आहे.तर सरासरीच्या 150 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस जालना, परभणी, नांदेड, बीड, रत्नागिरी अशा पाच जिल्ह्यातच झाला आहे.