लोकदेव पांडुरंगाचा महिमा

वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार. पंढरपूरची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुरला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यायचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. पंढरीचा वारकरी | वारीचुको न दे हरी || या उदात्त भावनेने लाखोंच्या संख्येने भक्तगण या पायी वारीमध्ये सहभागी होतात आणि चालत २१ दिवसांचा प्रवास करत पंढरपूर च्या विठ्ठलाला येऊन भेटतात.
अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कीर्तने करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला ‘दिंडी असे म्हणतात. वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यासोबत वारीला जात असत असत असे सांगीतले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस जी ही यात्रा भरते त्या एकादशीस देवशयनीएकादशी असेही म्हणतात.
मुख्य चार यात्रा(वाऱ्या) )-
१) चैत्री यात्रा : चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे.पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते.
(२) कार्तिकी यात्रा : कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातीलशुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तनप्रवचन चालू असते.
३)माघी यात्रा : माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरते. या एकादशीस  जया एकादशी म्हणतात. ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालु असते.
Shri. Vitthal-Rukmini Temple Pandharpur | District Solapur, Govt. of Maharashtra, India | India
४) आषाढी यात्रा : ज्ञानेश्वर महाराजांचा आजचा जो सोहळा आहे त्यांची सुरूवात मात्र दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या हैबतबाबा आरफळकर यांनी केली. त्यांचा जन्म सरदार कुळात झाला होता. ते ग्वाल्हेरहून परत येत असताना चोरांनी गाठले व एका गुहेत कोंडले. तेथे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा धावा केला. त्याच राजाच्या   नायकास मुलगा झाला व आनंदाप्रीत्यर्थ त्यांनी हैबतबाबांना सोडले. ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आपण सुटलो. आता उर्वरित आयुष्य ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पणकरू, असा निर्धार करून ते आळंदीला आले व तेथेच राहिले. आळंदीला माउलीच्या समाधीपुढे रात्रीच्या शेजारतीपासून सकाळच्या आरतीपर्यंत ते भजन करीत. त्यांनी मनोभावे माउलींच्या सेवेत आपले आयुष्य घालविले. त्यांच्यापूर्वी माउलीच्यापादुका गळ्यात घालून पंढरपूरच्या वारीला येण्याची प्रथा होती. बाबांनी त्या पादुका पालखीत घालून दिंड्या काढून भजन करीत सोहळा नेण्याची परंपरा सुरू केली.आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातीलशुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी असेही म्हणतात. भगवंत या एकादशीपासुन शयन करतात. आषाढी एकादशीपासुन चातुर्मास चालु होतो. चातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणांचे रुपाचे श्रवणकीर्तन करुन भक्तविठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. आषाढी कार्तिकीला श्रीविठ्ठल-रुक्मिणीचेदर्शन २४ तास चालु असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातीलकानाकोपर्यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. इथुन आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्याहळुहळु पंढरीकडे जायला निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात.
Pandharpur Vitthal Temple - Info, Temple Timings, Photos, History, Videos
साधारणत: हा काळ वर्षाॠतूचा काळ. शेतकरी वर्ग शेतात पेरण्या करुन श्रीविठ्ठलदर्शनाची आस मनी घेऊन पंढरीत येतो. चंद्रभागा नदी यात्रा काळात दुथडी भरुन वहात असते. आल्हाददायक वातावरण झालेले असते. वारकऱ्यांप्रमाणेच अनेकव्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी दुकाने थाटून बसतात. आषाढ शुध्द दशमीला अनेक संतांच्या पालख्यांचे पंढरपुरात आगमन होते. हजारो लोक पालखीला सामोरे जातात. साधु-संतांच्या आगमनाचा हा देवदुर्लभ सोहळाअसतो. ''दिंडया पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥'' संत नामदेवाच्या या अभंगानुसार लाखो वारकरी 'माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥'' हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्यागजरात पंढरीत दाखल होतात. यावेळी पंढरपुराला 'भूवैकुंठ' का म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव येतो.
पंढरीचा पौराणिक महिमा - वारकऱ्यांचे नव्हे, तर अनेक वैष्णवसंप्रदायांचे, केवळ महाराष्ट्रीयांचेच नव्हे तर कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशादि अनेक प्रांतातील अनेक लोकांचे, मराठी भाषिकांचेच नव्हे तर अनेकविध भाषिकांचेपरमात्मा पंढरीनाथ हे आराध्य दैवत आहे. अनेक संतानी या देवाचे माहात्म्य गाइलेले आहे. स्वत: पांडुरंगाने नामदेवरायांच्या जवळ आपले गुपित सांगताना म्हटले आहे, ''आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥'' वारकरीसंप्रदायाची ही अत्यंत महत्त्वाची यात्रा मानली जाते. आषाढी यात्रेपासून ते कार्तिकी यात्रेपर्यंतचा चार महिन्यांचा काळ 'चातुर्मास' म्हणून संबोधिला जातो. या चातुर्मासात हजारो वारकरी पंढरपुरात मठ, मंदिर, धर्मशाळेत राहून भजन, कीर्तनादिकार्यक्रमात सहभागी होत असतात. भागवत धर्माचा अभ्यास करतात. या सर्वात मोठया यात्रेसाठी दरवर्षी संतांच्या पालख्यांसमवेत व अन्य मार्गाने सुमारे ५ ते ६ लाख लोक पंढरीत येत असतात. पंढरीचा आसमंत 'ग्यानबा (ज्ञानोबा) तुकाराम', 'पुडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाने, टाळ-मृदुंगाच्या नादघोषाने दुमदुमत असतो.

या यात्रेत पूर्वी ठरलेल्या मुहूर्तावर आळंदी, देहू, पैठण, शेगाव इ. संत सत्पुरुषांच्या गावाहून त्या त्या संतांच्या पालख्या पंढरपुराकडे मार्गस्थ होतात. एवढेच नव्हे तर भारताच्या विविध प्रांतांतून भिन्न भिन्न भाषा बोलणारे, चालिरीतीचेश्रीविठ्ठलाच्या भक्तिप्रेमाने आपले भिन्नत्व विसरुन एकत्र येतात, उच्चनीचता,श्रीमंत-गरीब, जातिभेद, भाषाभेद, प्रांतभेद विसरुन आपण सर्व एक श्रीविठ्ठलाचे वारकरी, 'विष्णुदास' आहोत ही भावना मनीमानसी दृढ धरुन येतात. वारकरीसंप्रदाय समता, एकता, अभेदता शिकविणारा आहे, कारण त्याला माहीत आहे, ''उच्चनीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भावभक्ती देखुनिया ॥'' यामुळेच यात्रेत विषमता संपते, भेद-भाव नाहीसा होतो. परदेशी अभ्यासू पर्यटकही हा सोहळापाहण्यासाठी पंढरपूरास मोठ्या संख्येने येतात.
आषाढ शु. ९ ला भंडीशेगाव येथे रिंगण होऊन सर्वजण वाखरीयेथील संतनगरात मुक्कामास येतात. दशमीच्या दिवशी सकल संतांच्या पालख्यांसमोर दिंडयांचे रिंगण होते. रिंगण-सोहळा अत्यंत प्रेक्षणीय असतो, संतांचा अश्व वर्तुळाकार नाचतअसतो,धावत असतो व त्यामागे वारकरी धावत असतात. रिंगण-सोहळा संपल्यावर सर्व पालख्या पंढरपूराकडे निघतात.
वाखरी येथून सर्व पालख्यांच्या शेवटी निघणारी पालखीश्री ज्ञानेश्वर महाराजांची. या पालखीचा प्रथम क्रमांक असतो.दुसरा क्रमांक देहूच्या श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचा असतो. तिसरा क्रमांक पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्यापालखीचा, चौथी पालखी निवृत्तिनाथ महाराजांची, पाचवी सोपानदेवाची, सहावी एदलाबादहून आलेली संत मुक्ताबाईची पालखी आणि सातवी पालखी पंढरपुराहून संतांच्या पालख्यांना सामोरे जाऊन पंढरीस आणणारी श्रीनामदेवरायांची पालखी.याप्रमुख संतांच्या पालख्यांचे मार्ग ठरलेले असतात. संतनगर-वाखरी येथील सर्व संतांच्या पालख्या एकत्रित येण्याच्या ठिकाणाहून आषाढ शुध्द दशमीला सकाळी १० च्या सुमारास एकेक पालखी हळूहळू पंढरपूरकडे मार्गक्रमणा करुलागते.पंढरपुरात सर्वात शेवटी येणारी पालखी असते श्रीज्ञानेश्वरमहाराजांची; ती रात्री १०-११ वाजण्याच्या सुमारास पंढरपुरातील प्रदक्षिणा रोडवरील श्रीज्ञानेश्वर मंदिरात येते. अन्य संतांच्या पालख्या आपापल्या मंदिरात जातात. आषाढ शुध्दएकादशीला यात्रेकरु चंद्रभागेच्या पवित्र प्रवाहात स्नान करुन शुचिर्भूत होतात. कपाळी गोपीचंदन व बुवक्याची नाममुद्रा लावतात. गळयात तुळशीची माळ व टाळ, खांद्यावर पताका घेऊन हे वारकरी संतांच्या पालख्यांसमवेत नामघोष करीत, क्षेत्र-प्रदक्षिणा करतात. श्रीविठ्ठल मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. दर्शन बारीत १८-२० तास उभे राहून लोक 'श्री'चे दर्शन घेऊन कुतार्थ होतात. वारी पूर्ण करतात. दुपारी २ च्या दरम्यान श्रीविठ्ठलाचा रथ क्षेत्र प्रदक्षिणेसाठीनिघतो. माहेश्वरी धर्मशाळेत (पूर्वीचा खाजगीवाले वाडा) श्रीविठ्ठल-रुक्मिणी व राही यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. या मूर्तीना सोन्याचे पाणी दिले आहे. सजवलेल्या रथातून प्रदक्षिणा मार्गावरुन रथारुढ श्रीविठ्ठल-रुक्मिणी-राहीच्या मूर्तीचीमिरवणूक काढतात. ज्या भाविकांना एकादशीचे दिवशी मंदिरात जाऊन दर्शन येत नाही, त्या भाविकांना रथारुढ श्रीविठ्ठलाचे दर्शन होते, समाधान मिळते. हा रथ भक्तभाविक ओढत असतात. रथापुढे श्रीगजानन महाराज संस्थानचा हत्ती झुलतअसतो. 'श्री'च्या दर्शनासाठी प्रदक्षिणामार्गावर लोकांची झुंबड उडते. लोक रथावर खारीक, बुक्का, लाह्या, पैसे उधळतात. ठिकठिकाणी रथ थांबवतात. परंपरेनुसार मानकरी लोक 'श्री'ची पूजा करतात रथाची नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली की वारीपरिपूर्ण झाल्याचा वारकऱ्यांना संकेत मिळतो. 
बाराव्या तेराव्या शतकात या देवबाजीला उधाण आलं होतं. यात भरडून निघालेल्या बहुजन समाजानं मग त्यांचा स्वत:चा साधा सोपा देव शोधला. जो रंगानं त्यांच्या सारखाच काळा, शांत, सात्वीक भावमुद्रेचा, शस्त्रं टाकून कमरेवर हात ठेवलेला, पूजाविधीचं, भक्तीचं कुठलंही अवडंबर नसलेला देव, पंढरीचा श्री विठ्ठल विटेवर स्थिर उभ्या राहिलेल्या या देवामुळं शेंदऱ्या-हेंदऱ्या दैवतांचा बाजार कमी झाला या अहिंसावादी, शाकाहारी, दया, क्षमा, शांती सांगणाऱ्या देवानं दीनदुबळ्यांना आधारदिला. त्यांचं आत्मभान जागं केलं. त्यांना आत्मविश्वासानं जगायला शिकवलं. पिढ्यान पिढ्या सामाजिक स्थान नाकारलेल्या,दबलेल्या, पिचलेल्या लोकांचा विठोबा आधार झाला. भोळ्या भक्ताचं गुज जाणून घेणारा हा देव समाजाच्या सर्वथरांत मान्यता पावला. त्याला असा चालता बोलता करण्याचं काम केलं, त्याच्या लाडक्या भक्तानं भक्तानं,संतशिरोमणी नामदेवरायानं. त्यानं या देवाची पताका महाराष्ट्रातच नाही तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत संपूर्ण भारतभर फडकवली.
शेकडो वर्षे झाली. काळ बदलला. यंत्रातंत्राचं आधुनिक युग आलं. पण आषाढी वारी सुरु आहे. एका पिढीची जागा दुसरी पिढी घेते. दर आषाढीला वारीची वाट संतप्रेमानं उचंबळून येते. विठुनामाचा गजर टीपेला पोहोचतो...भल्या भल्यांना प्रश्नपडतो, याचं गुपीत काय आहे? हे काही फार मोठं वगैरे गुपीत नाही. समाजातल्या सर्व घटकांना आपल्यात सामावून घेतल्यानंच हा वारीचा ओघ आटला नाही, आटणार नाही हे त्यातलं उघडं सत्य. जातपात, धर्म,पंथ, गरीब, श्रीमंत, स्त्री पुरुष असाकोणत्याही प्रकारचा भेदभाव वारकरी करत नाहीत.या वारकऱ्यांचा देवच मुळीसमता, बंधुता, समन्वयाचं तत्त्वज्ञान रुजवणारा आहे.पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभा राहिलेला विठोबा म्हणजे रोजचं जगणं सोपं करणारा, बंधुभावानं जगायलाशिकवणारा अनाथांचा नाथ आहे. तो लोकांनी लोकांसाठी उभा केलेला लोकदेव आहे. पंढरीच्या वारीत सारे वारकरी मोठ्या प्रेमाने एकत्र येतात, पायवारी करताना एकमेकांना आपले अनुभव सांगतात,नवीन रचना अभंग, भजने, ओव्या म्हणूनदाखवतात.आपल्या लाडक्या विठूरायाच्या , पंढरीरायाच्या म्हणजेच विठ्ठल भक्तीच्या प्रसाराच्या नवीन कल्पना सांगतात. वारीत नव्याने आलेल्या नवख्यांना जुने , जाणकार, अनुभवी वारकरी 
मार्गदर्शन करतात. प्रत्येक जण या मेळाव्यातउपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात आजतागायत चालू आहे.
''पंढरीच्या लोका नाही अभिमान । पाया पडती जन एकमेका ॥'' या संतवाणीप्रमाणे एकमेकाला वंदन करतात. लहान -थोर, उच्च-नीचभेद संपतो. सर्व भाविक, वैष्णव हा आनंद-सोहळा साजरा करुन, 'पंढरीची वारी' परिपूर्ण झाल्याच्या आनंदातआपापल्या गावाकडे मार्गस्थ होतात. जगभर लाखो लोकांचे जीव घेऊन कोरोना सारख्या एका अनामिक भीतीने जग ठप्प झाले आहे त्यात वारीच्याही अखंड परंपरेला गेल्यावार्षापासून खीळ बसली आहे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो | चरण ण सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा || या संतोक्तीप्रमाणे वारीला प्रत्यक्ष गेले किंवा नाही गेले तरी पांडुरंगावरील वारकऱ्यांची श्रद्धा कणभरही कमी होणार नाही.  

रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष 
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 
९३२३११७७०४