पावसाचा इशारा लक्षात घेऊन मुंबईतील यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगावी ; अनपेक्षितरित्या कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी सतर्क राहावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दरडग्रस्त भाग, मोडकळीस आलेल्या इमारती याकडे लक्ष ठेवा; मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसाठी उपाययोजना करा;मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांसमवेत घेतला आपत्तीचा आढावा

मुंबई,१८ जुलै /प्रतिनिधी :- हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरित्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. आज त्यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील सूचना केल्या.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या, त्या पुढीलप्रमाणे आहेत :
  • विशेषत: दरडीकोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या. आज चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीच्या वरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर मलबा पसरून प्राणहानी झाली ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी देखील मलबार हिल येथे टेकडीचा भाग अचानक खचला होता.
  • उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत, त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून खबरदार राहण्यास सांगावे.
  • काही ठिकाणी भूमिगत वाहनतळामध्ये पाणी घुसले व वाहनांचे नुकसा झाले आहे तसेच भांडूप येथे जल शुद्धीकरण केंद्रच बंद पडल्याची घटना घडली आहे हे पाहता अधिक सावधगिरी बाळगावी
  • पावसाचा जोर रात्री वाढतो आहे हे ९ जून आणि आत्ता काल झालेल्या पावसाने लक्षात आले आहे हे पाहता रात्री देखील पाणी उपसा करणारी यंत्रणा, कर्मचारी काम करीत राहतील हे पाहावे.
  • पाऊस थांबल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारती अधिक कमकुवत होऊन त्यांचा काही भाग पडून मोठी दुर्घटना घडते. मोडकळीस आलेल्या इमारती मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा.
  • सर्वच यंत्रणांनी बचाव पथके तयार ठेवावीत व आपापल्या नियंत्रण कक्षांना एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहण्यास सांगावे.
  • कोविड केंद्र व फिल्ड रुग्णालयांतील डॉक्टर्स व वैद्यकीय पथकांना देखील मदतीसाठी तयार ठेवावे.
  • अर्धवट बांधकामे, मेट्रोची व इतर कामे यामधून भरपूर पाऊस झाल्यास पाणी साचून दुर्घटना होऊ नये तसेच त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेले राहून मलेरिया, डेंग्यू, लेप्टो सारखे रोग पसरवू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहावे.

फिव्हर क्लिनिक्स सुरु करा

यावेळी बोलतांना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असे सांगून महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ते म्हणाले की, पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते, कोविडचा धोका तर कायम आहे, यासाठी ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरु करा. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी देखील नागरिकांना त्यांच्या तापाबाबत तपासणी व मार्गदर्शन हवे. गृहनिर्माण संस्थांमधून देखील याविषयी जनजागृती करा.

मुंबईत दरडी कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक भिंती आहेत मात्र अशा सर्वच ठिकाणांचा आयआयटी किंवा इतर तज्ज्ञ संस्थेमार्फत अभ्यास करून आणखी काही पर्याय आहेत का किंवा त्यांच्या मजबुतीकरणासंदर्भात पाऊले उचलता येतील का ते पाहावे. रेल्वे आणि बेस्ट यामध्ये अधिक चांगला समन्वय साधून अशा आपत्तीच्या वेळी प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून हॉटलाईन सुरु करावी.

पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील पुढील तीन दिवस महत्त्वाचे असून मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु राहील याची काळजी घ्यावी व पर्यायी व्यवस्था करावी,असे सांगितले. वीज वाहिन्या व त्यांचे खांब सुस्थितीत राहतील आणि त्यातून विजेचा धक्का लागणार नाही याविषयी कंपन्यांना खबरदारी घेण्यास सांगावे असेही ते म्हणाले.

पालिकेचे अधिकारी-कर्मचारी २४ तास ड्युटीवर

मुंबईतील जोरदार पावसाबाबत माहिती देताना महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल म्‍हणाले की, काल रात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस कोसळून अवघ्‍या काही तासांमध्‍ये २०० मिलीमीटरपेक्षा जास्‍त पावसाची नोंद झाली आहे. या पावसात वाशीनाका परिसरातील वंजारतांडा येथे संरक्षक भिंत कोसळली. तसेच विक्रोळीतील पंचशील चाळीवर दरडीचा भाग कोसळला. या दोन प्रमुख दुर्घटनांसह अन्‍य एक घटना मिळून एकूण २७ नागरिकांचा दुर्दैवी मृत्‍यू ओढवला आहे. या दुर्घटनांच्‍या स्‍थळी बचाव आणि मदतकार्य तातडीने करण्‍यात आले आहे. पालकमंत्री आदित्‍य ठाकरे आणि अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त श्रीमती अश्‍विनी भिडे यांच्‍यासह भेटी देवून यंत्रणांना आवश्‍यक ते निर्देश दिल्‍याचेही श्री. चहल यांनी नमूद केले.

उपनगरीय रेल्‍वे रुळांवर साचणाऱया पावसाच्‍या पाण्‍याच्‍या अनुषंगाने श्री. चहल म्‍हणाले की, माहूल येथील पर्जन्‍य जल उदंचन केंद्राचे बांधकाम लवकरच सुरु होणार असून हे केंद्र पूर्ण झाल्‍यानंतर कुर्ला, शीव, चुनाभट्टी इत्‍यादी परिसरातील पाणी साचण्‍याचा प्रश्‍न निकाली निघेल.

मुंबईत पावसामुळे होणाऱया भूस्‍खलन घटना पाहता, संभाव्‍य ठिकाणांवर महानगरपालिका प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. अशा ठिकाणांवरील नागरिकांचे स्‍थलांतर व पुनर्वसन करण्‍याबाबतची कार्यवाही देखील करण्‍यात येत आहे, असेही आयुक्‍तांनी नमूद केले.

आजारांचा फैलाव होवू नये म्हणून काळजी

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी म्‍हणाले की, मलेरिया, डेंगी आणि लेप्‍टो या आजारांचा फैलाव होवू नये म्‍हणून आवश्‍यक प्रतिबंधक उपाययोजना देखील सातत्‍याने सुरु आहेत. मलेरियाचे प्रमाण यंदाही पूर्णपणे नियंत्रणात असून आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात असल्‍याचे श्री. काकाणी यांनी नमूद केले.

जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित होत आहे

जोरदार पावसाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात शिरून समस्या निर्माण झाल्यासंदर्भात  महानगरपालिकेचे उपआयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) श्री. अजय राठोर म्‍हणाले की, भांडुप संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू कार्यान्‍व‍ित होत आहे. भांडुप येथील मुख्‍य जलसंतुलन (Main Reservoir) कुंभातील पाणीपातळी उंचावत आहे. असे असले तरी उद्या एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्‍याची शक्‍यता आहे. सर्व यंत्रणा कार्यान्‍व‍ित होताच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती श्री. राठोर यांनी दिली.

हवामान विभागाचा ऑरेंज इशारा

यावेळी बोलताना हवामान विभागाचे जयंता सरकार म्हणाले की मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट असून ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. २३ तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो.

याप्रसंगी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी देखील माहिती दिली.

बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील मार्गदर्शन केले व यंत्रणांनी अधिक समन्वय ठेवावाव असे सांगितले. , मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव असीम गुप्ता, मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, सर्व पालिका उपायुक्त उपस्थित होते.