कलाकारांची कमाई सुरू व्हावी या साठी आय. सी. सी. आर. चे ‘ कला विश्व’ !

भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही भारतीय संस्कृती नीट समजून घेता यावी यासाठी आणि उपेक्षित कलाकारांना मदत व्हावी यासाठी “कलाविश्व” चे डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते उद्‌घाटन

मुंबई,१८ जुलै /प्रतिनिधी :-

भारतातील परदेशी विद्यार्थ्यांसाठीच्या मासिक सांस्कृतिक कार्यक्रमांबाबतच्या तरतूदीचा लाभ घेऊन आता भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद महाराष्ट्रासह देशांतील अनेक राज्यांमधून भटक्या विमुक्त समाजासह अन्य उपेक्षित वर्गांमधील विखुरलेल्या कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. कला विश्व या नावाने सुरू होत असलेल्या या कार्यक्रम मालिकेचे उद्‌घाटन परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत रविवारी बी. के. सी. परिसरातील विदेश भवनात झाले.

देशभरात 17 कार्यालयाद्वारे आणि आणि शिष्यवृत्ती पुरवून भारतीय सांस्कृतिक संबंध  परिषद जवळपास 1 लाख परदेशी विद्यार्थ्यांची देखभाल करणे तसेच त्यांना भारतीय संस्कृतीशी ओळख करून देणे हे कार्य पार पडते.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद किंवा आय. सी. सी. आर. या संस्थेचे काम मुख्यतः परदेशात भारतीय संस्कृतिची ओळख करून देण्याचे आहे. भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही भारतीय संस्कृती नीट समजून घेता यावी यासाठीही आय. सी. सी. आर. प्रयत्न करीत असते.

वाघ्या मुरळी, गोंधळ, वासुदेव किंवा दशावतार यांसारख्या पारंपारिक कलांची जोपासना करणाऱ्या कलाकारांना  कोरोनाच्या काळामध्ये त्यांची कला सादर करता यावी हा विचार  डोळ्यासमोर ठेवून भारतीय संस्कृती संबंध परिषदेने  कलाविश्व कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दशावतार, तसेच इतर विविध कालांद्वारे भारताची समृद्ध विविधता तिच्या एकसंधपणाचे एक रूप बनून आपल्या समोर येत असते. देशाच्या 17 केंद्रांमधून दर महिन्याला 2 किंवा 3 कार्यक्रम आभासी पद्धतीने सादर केले जातील. आज मुंबई, पुणे आणि गोवा केंद्राद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. ह्यातून एका बाजूला परदेशी विद्यार्थ्यांसमोर आपली कला सादर होईल तर दुसरीकडे उपेक्षित कलाकारांना मदत मिळेल असे आयसीसीआर चे अध्यक्ष आणि शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच युवा आणि क्रीडा विषयावरील संसदीय समितीचे अध्यक्ष  श्री विनय सहस्त्रबुद्धे यावेळी बोलताना  म्हणाले.

कणकवलीला राहणारे आणि ‘दशावतार’ हा पारंपरिक कला प्रकार सादर करणारे ओमप्रकाश चव्हाण यांच्या कार्यक्रमाने या नव्या उपक्रमाची सुरूवात झाली. रविवार दि. 18 रोजी दुपारी हा कार्यक्रम प्रत्यक्ष आणि व्हर्च्यूअल अशा संमिश्र माध्यमातून सादर केला गेला. दशावतार कार्यक्रमाचे बालगंधर्व म्हणवले जाणारे आणि 3 दशकांहून अधिक काळ कला सादर करणारे  ओम प्रकाश चव्हाण यांना आजवर बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे ज्यामध्ये आदित्य बिर्ला कलाकिरण पुरस्कार, पणजी कला अकादमी पुरस्कार आणि इतर पुरस्कारांचा समावेश आहे.

आय. सी. सी. आर. च्या पुणे केंद्रातर्फे याच मालिकेअंतर्गत पारंपारिक भारूड सादर करणारे कलाकार लक्ष्मण महाराज राजगुरू तसेच ‘वाघ्या मुरळी कलावंत श्रीकांत शिवाजी रेणके यांची प्रस्तुतिकरणे होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रम मालिकेचा उद्देश विदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती बद्दलची जाण विकसित करण्याचा असल्याने प्रत्येक कार्यक्रमाचे इंग्रजी समालोचनही त्या सोबत असणार आहे. या कार्यक्रमांचा आय. सी. सी. आर. च्या विभिन्न प्रादेशिक केंद्रांच्या फेसबुक पेज वरून https://www.facebook.com/100011577452371/videos/556815002110692/ रसिकांना आस्वाद घेता येईल. विनोद पवार आणि इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.