54 भारतीय खेळाडूंसह 88 सदस्यांचा पहिला ऑलिम्पिक चमू टोक्यो इथे दाखल

नवी दिल्ली, 18 जुलै 2021

54 खेळाडूंसह 88 सदस्यांचा पहिला भारतीय चमू आज ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टोक्यो इथल्या नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. कुर्बे सिटीच्या प्रतिनिधींनी या सर्व चमूचे विमानतळावर स्वागत केले. या चमूला काल रात्री दिल्लीच्या इंडिया गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्यंत उत्साहात, शुभेच्छांसह निरोप देण्यात आला. यावेळी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक स्वतः उपस्थित होते.

बॅडमिंटन, तिरंदाजी , हॉकी, ज्युडो, जलतरण, भारोत्तोलन , जिम्नॅस्टिक आणि टेबल टेनिस या आठ क्रीडाप्रकारांमधील खेळाडू आणि  सहाय्यक कर्मचाऱ्यांचा या चमूत समावेश आहे. 127 अ‍ॅथलीट्स असलेला हा भारताचा आजवरचा सर्वात मोठा ऑलिम्पिक चमू आहे.

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर  यांनी खेळाडूंना काल रात्री विमानतळावर निरोप दिला. यावेळी अनुराग ठाकूर यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत, त्यांच्याशी संवाद साधला. 

 “भारतासाठी टोक्यो ऑलिम्पिक 2021 हा एक अविस्मरणीय क्रीडाउत्सव असून 135 कोटी भारतीयांच्या  शुभेच्छा सर्व खेळाडूंसोबत आहेत,” असे अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.

ज्यांना आयुष्यात अशी मोठी संधी मिळते अशा काही निवडक लोकांपैकी तुम्ही सगळे आहात आणि तुम्हाला पुढेही एक मोठी कारकीर्द घडवायची आहे. त्यामुळे, तुम्ही सर्वांनी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करायलाच हवे, मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, त्याचे कुठलेही दडपण किंवा ताणतणाव मनावर ठेवू नका. अ‍ॅथलीट्सनी कायम शरीरमनाने मजबूत असायला हवे, कारण, जेव्हा ते स्पर्धेत  आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतात, त्यावेळी ती मानसिक आणि भावनिक लढाई असते, आणि अशा वेळी आपली मानसिक ताकदच, आपल्या कामगिरीतून प्रकट होत असते.” असा कानमंत्र देत, अनुराग ठाकूर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.