राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट,नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण

मुंबई,१७ जुलै /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने माध्यम वर्तुळात अंदाजांचे पतंग उडवले जाऊ लागले. याला विराम देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावून पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले. बँकिंग रेग्युलेटरी ॲक्टमध्ये बदल करण्यात आला असून तो सहकारी बँकासाठी धोकादायक आहे, याबाबत पवार साहेबांनी मोदींशी फोनवरूनही चर्चा केली होती. मात्र या विषयावर भेटून चर्चा करू, असे मोदीजींनी सुचवल्यानंतर आज प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर अधिक चर्चा झाली असा खुलासा नवाब मलिक यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे देखील उपस्थित होते.

या कायद्यात नवीन बदल केल्याने जे लोक बँकांकडून कर्ज घेतील, त्यांना बँकेचे अडीच टक्के शेअर घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कर्ज परत केल्यानंतर हे शेअर कुणालाही विकण्याचा अधिकार संबंधित व्यक्तिला देण्यात आला आहे, असे आदेश रिझर्व्ह बँकेने काढले आहेत. यापूर्वी हे शेअर बँकेलाच पुन्हा देण्याचा नियम होता. मात्र अशा पद्धतीने खुल्या बाजारात शेअर विकल्यास सहकारी बँक भांडवलदारांच्या हातात जाण्याची शक्यता मलिक यांनी व्यक्त केली. रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांमुळे सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा येत आहे, तसेच त्यांचा व्याजदरही अबाधित राहत नाही. अशाप्रकारचे लेखी निवेदनातून पवार साहेबांनी हे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले. या चर्चेतून केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

या बैठकीसोबतच पवारसाहेब दिल्लीत असताना राज्यसभेचे नेते पियुष गोयल यांनी स्वतः ६ जनपथ येथे पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली होती. राज्यसभेचे सभागृह नेतेपदी निवड झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना भेटण्याची परंपरा आहे. सभागृहात सर्व पक्षांचे सहकार्य मिळण्यासाठी अशा भेटी होत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभागृहातील कामकाजात सहकार्य करले, अशी चर्चा दोघांमध्ये झाली. तसेच देशाचे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दालनात एक बैठक झाली. या बैठकीला पवार साहेब माजी सरंक्षण मंत्री म्हणून उपस्थित होते. या बैठीकाला काँग्रेसचे नेते, माजी मंत्री ए. के. अँटोनी देखील उपस्थित होते. यावेळी देशाच्या सीमेवरील परिस्थितीचे आकलन उपस्थितांना करून देण्यात आले. या तीन बैठकांखेरीज इतर कोणाबरोबरही आदरणीय पवार साहेबांची बैठक झालेली नाही. माध्यमात ज्या काही उलटसुलट बातम्या येत आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही असे ते म्हणाले. तसेच सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस महागाई, पेट्रोल-डिझेलची दरवाढ अशा विषयांवर सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा मलिक यांनी यावेळी दिला.