ओळख लपवून एसटी अधिकारी करणार एसटीतून प्रवास–परिवहन मंत्री अनिल परब

  • प्रत्येक शासकीय कार्यालयाने एसटीला मालवाहतूक सेवा देणे बंधनकारक

• उत्पन्न वाढवा खर्च कमी करत

• समांतर गाड्यांची संख्या कमी करा

औरंगाबाद,१६जुलै / प्रतिनिधी:- प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्यांनी करत असलेल्या एकुण मालवाहतूक सेवेपैकी 25% टक्के मालवाहतूकीकरीता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या वाहनाचा (ट्रक) वापर करावा असा शासन निर्णय असून विभाग नियंत्रकांनी नियोजन करुन एसटीचे उत्पन्न वाढवण्याकरिता प्रयत्न करावे असे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मराठवाडा विभागातील विभाग नियंत्रकांच्या बैठकीत श्री. परब हे बोलत होते. बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, औरंगाबाद विभाग नियंत्रक अरुण सिया, वाहतूक महाव्यवस्थापक संजय सुपेकर, बांधकाम महाव्यवस्थापक भुषण देसाई, भांडार महाव्यवस्थापक बा.ल. कदम, सांख्यकीय महाव्यवस्थापक संध्या भांडारवार तसेच मराठवाडा विभागाचे सर्व विभाग नियंत्रकांची उपस्थिती होती.

Displaying _DSC7170.JPG

कोरोनातून आपण बाहेर पडत असून त्यानंतरची रुपरेषा ही प्रत्येक विभाग नियंत्रकांनी आखून त्या प्रमाणे आराखडा तयार करावा असे सांगून श्री. परब म्हणाले की शासनाच्या प्रत्येक कार्यालयाकडे जसे सामाजिक वनीकरण, बालभारती आदी विभागाकडून 25% मालवाहतूक सेवा एस.टी च्या वाहनामार्फत करण्याकरिता प्रयत्न करावे, जेणेकरुन याद्वारे महामंडळाच्या उत्पन्न वाढिकरीता मदत होईल. तसेच डेपो नियंत्रकांनी आपल्या आखत्यारित असणाऱ्या डेपोला वेळोवेळी भेट देऊन अहवाल सादर करुन आपल्या विभागाचा खर्च त्याच विभागाने भागवावा या करिता प्रयत्न करावे. जेणेकरुन  शासनावर अवलंबून रहावे लागणार नाही याची खबरदारी विभाग नियंत्रकांनी घ्यावी. ज्या विभागाचे उत्पन्न चांगले त्यांनाच पगार अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होणार नाही यांची गांभीर्याने दक्षता घ्यावी.

तसेच प्रत्येक अधिकाऱ्यांनी महिन्यातून किमान 150 कि.मी प्रवास हा स्वत:ची ओळख न सांगता एसटीतून करावी जेणेकरुन प्रत्यक्ष अडचणी सोडवण्यास मदत होईल, अशा सूचना देखील श्री. परब यांनी संबधितांना देऊन मालवाहतूक सेवा, वाहनांची दुरुस्ती, के.पी.टी.एल, इंधन बचत, मुक्कामी गाड्या, एसटीच्या फेऱ्या,भारमान वाढवणे आदीबाबत सविस्तर आढावा घेतला.

बैठकीच्या प्रारंभी श्री चन्ने यांनी विभागाची माहिती देताना म्हणाले की वाहनांच्या डिझेलचा पुर्ण खर्च कसा निघेल याकरिता वाहन चालकांना प्रशिक्षणे द्यावे, भारमान वाढवण्याकरिता प्रयत्न करावे, त्याकरिता बसचे मार्ग निश्चित करावे जेणेकरुन गाड्या रिकाम्या राहणार नाही. समान वेळेस समान ठिकाणी जाणाऱ्या बसच्या संख्या कमी कराव्या, अशा सूचना श्री. चन्ने यांनी यावेळी दिल्या.

औरंगाबाद विभाग नियंत्रकांनी औरंगाबाद विभागातील 2 कोटी 16 लाख रुपये उत्पन्न  असून ते लवकरच वाढवून 2 कोटी 50 लाखांपर्यत नेण्याचे आश्वासित केले. तसेच विभाग निहाय सर्व नियंत्रकांनी बस फेऱ्याबाबत माहिती दिली.

रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर द्यावा

— परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

Displaying _DSC7209.JPG

औरंगाबाद:-वाढत्या रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी  रस्ता सुरक्षेवर अधिक भर देणे आवश्यक आहे. रस्त्यावरुन वाहन चालविताना वाहनचालकांना शिस्त लावणे  महत्त्वाचे आहे, अशी सूचना  परिवहन, संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित औरंगाबाद, नांदेड व लातूर परिवहन विभागाच्या कामाकाजाचा  श्री. परब यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस परिवहन आयुक्त शेखर चन्ने,  परिवहन उपायुक्त  (प्रशासन) जे.बी. पाटील,  परिवहन उपायुक्त (निरीक्षण) दिनकर मनवर, औरंगाबादचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी एस.एस. कामत आदींसह  विभागातील सर्व  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी श्री. परब  यांनी  औरंगाबाद, नांदेड व लातूर परिवहन विभागातील महसूल वसुली, वायुवेग पथकाची कामगिरी, सीमा तपासणी नाक्याची कामगिरी, रस्ता सुरक्षा विषयक कामकाज, ऑनलाईन शिकाऊ  अनुज्ञप्ती चाचणी, ऑटोरिक्षा परवाना धारकांना जाहिर केलेले सानुग्रह अनुदान आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला.

श्री. परब म्हणाले की, शासनाला चांगले उत्पन्न देणारे खाते  म्हणून  परिवहन विभागाची ओळख आहे.  सक्षम अधिकाऱ्यांमुळे दिलेले उदिष्ट वेळेत पूर्णही केल्या जाते.  या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सेवांपैकी  85 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या, ही निश्चितच कौतुकाचे बाब आहे. यापुढेही लोकांना अधिक सुलभपणे कशा सुविधा दिल्या  जातील यावर लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच हा विभाग अधिक कार्यक्षम  करण्यात यावा.

वाढत्या रस्ते अपघाताबद्दल चिंता व्यक्त करताना श्री. परब म्हणाले की, रस्ते अपघातात घट होण्यासाठी वाहनचालकांना शिस्त लावणे अधिक गरजेचे आहे.  अपघात प्रवण क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष दयावे.  ऑटोरिक्षा परवाना धारकांना जाहिर केलेल्या सानुग्रह अनुदान वाटपाबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याची  सूचना यावेळी त्यांनी केली. लोकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेळेत मिळण्यासाठी कामाचे व्यवस्थित नियोजन करावे, अशी सुचनाही त्यांनी केली.