औरंगाबादेत पूर्वीचेच निर्बंध कायम

कोविड नियमावलीचे कटाक्षाने पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

औरंगाबाद, १६जुलै /प्रतिनिधी :- जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असून  मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने यंत्रनांनी  चाचण्यांमध्ये वाढ करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

May be an image of 1 person, sitting, standing and text that says "N95 माझे माझेकुटुंब ममाी a"

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड उपाय योजनांबाबतच्या जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितंना निर्देशित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले,  मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी नेमाणे, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोविड संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत असून संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनामार्फत कोविड नियंत्रणासाठी यापूर्वी जारी करण्यात आलेले निर्बंध, अटी, शर्ती  जिल्हयात यापुढेही लागू राहतील त्यानुसार दुपारी 4 नंतर सर्व व्यावसायिक आस्थापनाचे व्यवहार बंद राहतील याबाबत संबंधित यंत्रणांनी नियंत्रण ठेवावे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

May be an image of 5 people, people sitting and indoor

तसेच दि. 9 ते 15 जुलैमधील जिल्ह्यातील बाधीत दर 1.24 टक्के असून   त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्याला आवश्यक प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरु असून लसीकरण मोहीमेचे योग्य नियोजन ठेवावे.  यामध्ये फ्रंटलाईन वर्कर  या समूहातील सर्वांचे 100 टक्के लसीकरण होण्यावर भर द्यावा.

जिल्ह्यातील कोविडसाठी सुरु करण्यात आलेल्या सर्व उपचार सुविधा सद्यस्थितीत चालु ठेवण्यात आलेल्या असून आरोग्य यंत्रणांनी पूरेशा प्रमाणात ऑक्सीजन उपलब्धता ठेवण्याची खबरदारी घ्यावी. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची प्राधान्याने काळजी घेऊन आवश्यक उपचार करावेत. या रुग्णांच्या उपचारात आवश्यक असलेले इंजेक्शन, औषधींच्या उपलब्धतेची कटाक्षाने खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.