गोपीनाथ मुंडे यांचे शिष्योत्त्तम – डॉ. कराडांकडून मराठवाडयाच्या अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खा.डॉ. भागवत कराड यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात अर्थखात्याचे राज्यमंत्री म्हणून केलेला समावेश म्हणजे डॉ कराड यांचा दलित- वंचित–ओबीसी समाजाच्या एकमुखी नेतृत्त्वावर केलेले शिक्कामोर्तबच होय. डॉ भागवत कराड हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. गरीब शेतकरी कुटूंबात  जन्मलेल्या डॉ. कराडांनी आपले शिक्षण गरिबीच्या खस्ता खात – खात पूर्ण केले़ लातूर जिल्हयातील चिखली सारख्या एका छोट्या  गावात जन्मलेल्या डॉ. भागवत कराडांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून जसे आपले दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले तसेच पुढे अमहदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून त्यांनी प्री मेडिकलचे शिक्षणही यशस्वीरित्या  पूर्ण केले. शिक्षणासाठी त्यांनी घोर तपश्चर्या करताना दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी बारा वर्षे तालुक्याच्या गावापर्यंत दररोज पाच किलोमीटर चालत जाण्याचे कष्ट उपसले. वैद्यकीय शिक्षणाकडे ओढा असणाऱ्या डॉ. भागवत कराडांनी औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून पुढे एमबीबीएस आणि एम. एस. (जनरल सर्जंरी ) या पदव्या संपादन केल्या. एम. एस. चे शिक्षण पूर्ण केल्यावर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील एम. सी. एच. (पेडियाट्रीक) ही पदवी त्यांनी खूप परिश्रमपूर्वक संपादन केली.

Image

डॉ.भागवत कराड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. अंजली कराड यांनी कालांतराने डॉ. वाय. एस. खेडकर यांच्या दवाखान्यात वैद्यकीय व्यवसाय सुरु केला़.आणि पुढे १९९० मध्ये स्वत:चे ’डॉ़ कराड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ँड रिसर्च सेंटर‘ या नावाने औरंगाबाद येथे हॉस्पिटल सुरु केले. पुढे डॉ. कराड दाम्पत्य बालरोगतज्ज्ञ म्हणून मराठवाडयात नावारुपास आले. तात्पर्य वैद्यकीय व्यवसायातून व रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजसेवा करणे हा खरा डॉ. भागवत कराडांचा मूळपिंड; पण मराठवाडयातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नेते दिवगंत गोपीनाथराव मुंंडे यांची नजर डॉ. कराडांवर पडली आणि त्यांनी डॉ. कराडांमधील समाजसेवक आणि  कार्यकर्त्याचा पिंड ओळखून त्यांना राजकारणात आणले आणि मग डॉ. कराडांनी मागे वळून न पहाता नगरसेवक ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना आदर्श मानून यशस्वीरित्या सुरु केला. कराड मराठवाडयातील पहिले ’बालरोगसर्जन‘ असून मराठवाडयात पक्ष बांधणीमध्ये त्यांचे मौलिक योगदान आहे. भाजप राज्य कार्यकारणीचे उपाध्यक्ष आणि मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस म्हणूनही कराड यांनी उत्तम कार्य केले. तत्पूर्वी ते १९९५ औरंगाबाद महानगरपालिकेवर अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. औरंगाबाद शहराचे महापौर ,उपमहापौर म्हणून राहिले. महापौरपदाच्या काळात त्यांनी शहरांचे नागरी प्रश्न सोडविण्यात लक्ष घालून शहर विकासाचे प्रश्न सोडविण्यास प्राध्यान्य दिले. त्याची कार्यशैली व नेतृत्वगुण, संघटनकौशल्य आणि अभ्यासूवृत्तीमुळे राज्यसभेवर खासदार म्हणून एकमताने निवड झाली.गोपीनाथराव  मुंडे यांनी डॉ़ कराड यांच्या मधील समर्पित कार्यकर्ता हेरुन त्यांना जसे भाजपात आणले तेच सूत्र कायम ठेवून पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी डॉ. कराड यांच्या मधील हाडाचा कार्यकर्ता, त्यांचे नेतृत्वगुण हेरुन डॉ. कराड केंद्रीय मंत्रीमंडळात अर्थखात्याचे राज्यमंत्री म्हणून समावेश करुन डॉ. कराड यांना जसा न्याय दिला तसेच केंद्रीय राज्यमंत्री म्हणून सन्मान करतानाच मराठवाडयाचाही यथोचित गौरव केला आहे.

Image

मराठवाडयाचे झुंजार नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे डॉ. कराड खरे शिष्य. मुंडे हे डॉ. कराडांचे खरे राजकीय दैवत आणि आदर्शही आहेत. गोपीनाथराव मुंडे यांनी मोठया कष्टाने भाजप बहुजन समाजापर्यंत नेला. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. वंचित समाजाला राजकीय, सामाजिक नि आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी रक्त आटविले. भाजपच्या वाढीसाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी अहोरात्र संघर्ष केला. डॉ. भागवत कराड हे गोपीनाथराव मुंडे यांंचाच राजकीय नि सामाजिक वारसा पुढे नेत आहेत म्हणून मराठवाडयाच्या या सुपुत्राकडून काही अपेक्षा सुध्दा आहेत.ते त्या पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. कोरोना महामारीने संपूर्ण जगच आज त्रस्त झाले आहे.कोरोनासाथीचा अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. मराठवाडा शेती- उद्योग- व्यवसायाच्या दृष्टीने विकासाअभावी मागसालेला भूभाग आहे. कोरोनामुळे अविकसित मराठवाडयाचे खूपच नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्यानी मराठवाडयासह महाराष्ट्र ग्रासला आहे. कोरोनामुळे गोरगरिब, अल्पभूधारक, शेतकऱ्याच्या जगण्यामरण्याचे प्रश्न अजूनच खूप बिकट झाले आहेत.  मराठवाडयातील छोटे – मोठे उद्योग – व्यवसाय बंद पडले आहेत. सिंचनअभावी शेती तोटयात जात आहे. दळण वळणासाठी चांगले रस्ते नाहीत थोडा फार औरंगाबादचा औद्योगिक विकास जर सोडला तर उभा मराठवाडा औद्योगिक विकासापासून कोसो दूर आहे. औरंगाबाद शहराच्या सौंंदर्यीकरणाची समस्या अजूनही सुटली नाही. मोजके रस्ते सोडले तर ररत्यांची वाईट अवस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे़ जायकवाडी धरणात भरपूर पाणी असूनही औरंगाबादकरांना अजूनही तीन ते चार दिवसाआड पाणी मिळते आणि तेही अपुरे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सुसज्ज जलवाहिनी अस्तित्वात येण्याची नितांत गरज आहे. ओबीसींंच्या राजकीय आरक्षणाचा तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागणे आवश्यक आहे. या सर्व समस्या व प्रश्नांमध्ये लक्ष घालून डॉ.भागवत कराड मराठवाडयास राजकीय, सामाजिक, आर्थिक न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.डॉ.भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करुन त्यांना दीर्घआयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो. केंद्रिय राज्य अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द नेत्रदीपक ठरो अशी मंगल कामना या प्रसंगी मी व्यक्त करतो. 

डॉ. रमेश जाधव (प्राध्यापक, मराठी विभाग,डॉ. बा.आं.म. वि़द्यापीठ, औरंगाबाद)