गोपीनाथ मुंडे माझे नेते होते,आज ताई आहेत-भागवत कराड यांची पंकजा मुंडेंविषयी पहिली प्रतिक्रिया

Image

नवी दिल्ली,१२जुलै /प्रतिनिधी :-   खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्री बनवण्यात आले. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज आहेत, दिल्लीच्या दौऱ्यात राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांनी शुभेच्छा दिल्याचे डॉ. कराड यांनी ट्विट केले आहे.

नाराज असलेल्या पंकजा मुंडे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना भेटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज भागवत कराड यांनी दिल्लीत पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दोघांनीही तासभर गप्पा मारल्या. यावेळी भागवत कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.  भागवत कराड ट्विट करत या भेटीची माहिती दिली. 

गोपीनाथ मुंडे माझे नेते होते, आज ताई आहेत… त्यांनीही साहेबांच्याप्रमाणे शुभेच्छा दिल्या. असं भागवत कराड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या दुसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार  नुकताच पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील , भारती पवार आणि भागवत कराड या चौघांना स्थान देण्यात आले. मात्र, खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळाले नाही. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने बीड भाजपमध्ये राजीनामा  सत्र सुरू झालं आहे. आतापर्यंत एकूण 36 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

भाजपच्या 11 तालुका अध्यक्षांनंतर आता जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. संतोष हांगे, सारिका राणा डोईफोडे, रामराव खेडकर या जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. यासोबतच स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राणा डोईफोडे यांनीही राजीनामा दिला आहे.