महाराष्ट्र आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज

नवी दिल्ली ,११ जुलै /प्रतिनिधी :-भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, कोकण आणि गोव्यामध्ये सोमवारी  सकाळी किंवा त्यापूर्वी तुरळक ठिकाणी मुसळधार, अतिमुसळधार आणि अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीच्या आणि  दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा, रायलसीमा, उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह (30-40 किमी/तास ) वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

पश्चिम मध्य आणि नैऋत्य अरबी समुद्र; आग्नेय, पूर्व मध्य व ईशान्य अरबी समुद्र तसेच  गुजरात-महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक-केरळ किनारपट्टीवर  हवामानाची स्थिती वादळी ( वादळी वारे 45-55 किमी/तास ते 65 किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा  देण्यात आला आहे.