कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 12 कोटीचा निधी आरोग्य विभागाला-पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

योग्य नियोजन करुन जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा 

एच.आय.व्ही. रुग्णांवर उपचार करण्यासाठी एआरटी केंद्राची उभारणी

हिंगोली येथे भारतातील तिसरे आणि राज्यातील पहिले एआरटी केंद्र

पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, इंटेन्सिव पेडियाट्रिक केअर युनिट, एआरटी केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

हिंगोली, १०जुलै /प्रतिनिधी :- जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेंतर्गत  सन 2021-22 या वर्षासाठी प्राप्त झालेला निधी योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील विकास कामांवर वेळेत खर्च करावा, अशा सूचना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या.

योग्य नियोजन करुन जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा – पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री श्रीमती गायकवाड बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, संतोष बांगर, विप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची बाधा लहान मुलांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा व डेल्टा, डेल्टा प्लस या विषाणूंचा सामना करण्यासाठी चालू वर्षाचा 12 कोटीचा निधी आरोग्य विभागाला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागांनी योग्य नियोजन करुन बेडची व्यवस्था, औषधी, व्हेंटिलेटर आदी सुविधा तयार कराव्यात. जनतेनी खबरदारी घेण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करावी. सध्या जिल्ह्यात लेव्हल तीनचे इंटेसिव पेडियाट्रिक केअर युनिट व 20 खाटांचे एनआयसीयू तयार करण्यात आले आहे. तसेच 25 स्वतंत्र व्हेंटीलेटर्स, 124 खाटांचे एस.एन.सी.यू उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्समध्ये समावेश करावा. लसीकरणाची मोहिम राबवावी. लस उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठविण्यात आला असून याबाबत पाठपुरावा सुरु आहे. याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सहभाग घेऊन जास्तीत-जास्त लसीकरण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन करुन  तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सज्ज राहावे, अशा सूचना दिल्या.

आरोग्य विभागाची पदभरतीस स्थगिती असल्यामुळे पदभरती केली नाही. याबाबत पालकमंत्री यांनी आरोग्य मंत्र्यांना भेटून पदभरतीचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे सांगितले. तसेच डायलेसीसची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मंजूर झालेले आयुष महाविद्यालय सुरु करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन दिली असुन, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या केंद्राच्या मंजूरीबाबत आपण सर्व लोकप्रतिनिधीनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करुन प्रयत्न करावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले .

जिल्ह्यातील शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून त्याचे नूतनीकरण करण्यासाठी राज्याकडून मराठवाड्यासाठी 72 कोटीचा निधी मिळणार असून उपलब्ध निधीतून ज्या शाळाचे निविदा प्रक्रिया व कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या आहेत. त्या शाळा पूर्ण कराव्यात व जिल्ह्यातील उर्वरित शाळा खोल्याचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने बैठका घेऊन प्राधान्यक्रम ठरवून करावेत, अशा सूचना  यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिल्या.

समिती सदस्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे देयक भरुनही वीज पुरवठा सुरु होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावर पालकमंत्री यानी या प्रश्नी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्तीश: लक्ष घालून सदर वीज पुरवठ्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा. ग्रामीण भागात वारंवार रोहित्र बंद होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असुन ते वेळेवर दुरुस्त करुन मिळत नसल्याच्या तसेच वीज देयकाअभावी वीज पुरवठा खंडित करण्याच्या  महावितरणच्या तक्रारी प्राप्त होत असल्याची तक्रारी समिती सदस्यांनी केली. शाळेवर लोंबकाळणाऱ्या धोकादायक तारा तात्काळ दुरुस्त दुरुस्त कराव्यात. तसेच बंद पडलेल्या सौर पंपाबाबत काहीही कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी होत्या. यावर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्याची चौकशी लावावी, अशा सूचना दिल्या.

तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राची कामे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठक घेऊन 8 दिवसाच्या आत मार्गी लावावेत, अशा सूचना केल्या. तसेच ग्रामपंचायतीच्या ओपन जिमचा तसेच वसमत व कळमनुरी येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न चर्चा करुन सोडवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच पाणंद रस्त्याबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पालकमंत्री महोदयांनी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन तात्काळ मार्गी लावाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. तसेच जिल्हा क्रीडा संकुलाचे दूरुस्तीचे काम तात्काळ पूर्ण करुन ते जनतेसाठी खुले करावे, अशा सूचना ही श्रीमती गायकवाड यांनी दिल्या.

बैठकीच्या प्रारंभी सर्व समिती सदस्यांनी स्वर्गीय खा. राजीव सातव यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच या बैठकीत उपजिल्हा रुग्णालय, कळमनुरी आणि हिंगोली येथील जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्राला स्वर्गीय खासदार राजीव सातव यांचे नांव देण्यासाठी ठराव पारित करण्यात आला.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, पाझर तलाव, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (एमआरईजीएस) कामे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा डीपीआर तयार करुन सादर करणे, अनुसूचित जाती, जमाती समाजातील लोकांना विहिरीसाठी वीज जोडणी देणे, तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ यासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. तसेच सर्वसाधारण वार्षिक योजना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपयोजनेंतर्गत  नाविन्यपूर्ण योजना, केंद्र पुरस्कृत योजनांसाठी झालेल्या खर्चाचा व नियोजित खर्चाचा आढावा घेतला. शिक्षण, आरोग्य, स्वच्छ भारत अभियान आदीबाबतही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आढावा घेतला.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी दिलेल्या सूचना व मागण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने त्याचे निरसन करावे व केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित सदस्यांना वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी यावेळी दिले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या  प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी सन 2021-22 अंतर्गत सर्वसाधारण वार्षिक योजनेतून प्राप्त झालेला निधी प्राधान्याने खर्च करण्यात येत आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजना 2020-2021 मध्ये झालेल्या खर्चाचा देखील आढावा यावेळी घेण्यात आला .  तसेच सन 2019-2020 प्रमाणे सन 2020-21 चा देखील निधी  जिल्ह्याने शंभर टक्के खर्च करुन त्याच्या खर्चाच्या ताळमेळाचे काम पूर्ण केल्याने पालकमंत्री  गायकवाड यांनी जिल्‍हा प्रशासनाचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर , समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगीरे, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांच्यासह सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.

जिल्हास्तरीय शिक्षक स्पर्धेचे उद्घाटन

जिल्ह्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन स्पर्धांचे उद्घाटन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या ऑनलाइन स्पर्धा दि. 09 जुलै, 2021 ते 30 जुलै, 2021 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी  यांच्या प्रेरणेने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  राधा विनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली  घेण्यात येत आहेत. या स्पर्धांमध्ये  कोरोना काळातील शैक्षणिक उपक्रम, बेस्ट एज्यूकेशनल व्हिडिओ, पाठ्यपुस्तकातील कविता गायन, वैयक्तिक व सामूहिक नृत्य, मुख्याध्यापक यांच्यासाठी मी घडवलेली शाळा, ऑनलाईन गणित-विज्ञान सामान्यज्ञान स्पर्धा (kahoot)आणि पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी वाद विवाद स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे .

स्पर्धांच्या स्वरुपाचे सादरीकरण शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी केले.

खरीप हंगामासाठी बियाणे व खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करा

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  उत्कृष्ट दर्जाचे बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके आदी कृषि निविष्ठा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषि विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गायकवाड बोलत होत्या. यावेळी सर्वश्री आ. तान्हाजी मुळकुळे, राजु नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या बियाणांची उगवण क्षमता तपासून पेरणीबाबत तांत्रिक तपशील समजेल अशा भाषेत त्यांच्यापर्यंत पोहचवावा. तसेच शासनाने तयार केलेल्या सोयाबीन लागवडीच्या चतु:सुत्री कार्यक्रमाची  माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी. खते व बियाणे शेतकऱ्यांना योग्य दरात व योग्य वेळी उपलब्ध होतील यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. तसेच बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी. खरीप हंगाम सुरु झाला असून शेतकऱ्यांना पिककर्ज वितरण व पिक विम्याचा लवकरात-लवकर लाभ उपलब्ध करुन द्यावा.

यावेळी बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिक परिस्थितीचा सविस्तर अहवाल सादर केला.

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, इंटेन्सिव पेडियाट्रिक केअर युनिट, एआरटी केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ऑक्सिजन, प्रकल्प, लेव्हल तीनचे इंटेन्सिव पेडियाट्रिक युनिट व 20 खाटांचे एन.आय.सी.यू., व्हेंटीलेंटर्स यासह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनी तिसऱ्या लाटेचा शिरकाव हिंगोली जिल्ह्यात होणार नाही यासाठी सज्ज राहावे, अशा सूचना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या.

May be an image of 5 people and people standing

येथील जिल्हा रुग्णालयातील 1050 प्रती मिनिट क्षमतेचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, पेडियाट्रिक इंटेन्सिव केअर युनिट, 50 खाटांच्या पीआयसीयू केंद्राचे तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष आणि एआरटी औषधोपचार केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांनी यावेळी विषाणू संशोधन आणि प्रयोगशाळा आणि डी.ई.आय.सी. विभागाची ही पाहणी केली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे, माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्या अथक प्रयत्नामुळेच कोरोनोला रोखण्यात यश आले आहे. भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठीही सर्वांनी असेच चांगले काम करावे यासाठी शुभेच्छा देवून हिंगोलीचा पॅटर्न राज्यात आणि देशात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केल्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची बाधा लहान मुलांना होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

May be an image of 3 people, people standing and indoor

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा व डेल्टा, डेल्टा प्लस या विषाणूंचा जिल्ह्यात होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागांनी योग्य नियोजन करुन दक्षता घेण्यासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 2 कोटी रुपये किमंतीचे 1050 लिटर प्रती मिनिट क्षमतेचे ऑक्सिजन प्लॉन्ट उभारण्यात आला आहे. याद्वारे 100 रुग्णांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध होणार असून यासाठी वार्ड तयार करण्यात आला आहे. तसेच कोरानाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेवून 1 कोटी 50 लाख रुपये खर्च करुन 50 बेड्चे अत्याधुनिक व्हेंटीलेटरयुक्त (PICU) बाल रुग्ण अतिदक्षता केंद्र तयार करण्यात आले आहे. या अतिदक्षता केंद्रात ऑक्सिजन लाईन, कम्प्रेसड एअर लाईन आणि सक्शन लाईनची सुविधा उपलब्ध करुन सदर कक्ष तयार करण्यात आला आहे. यामध्ये 300 ग्रॅम वजनाच्या बालकापासून ते वयस्क व्यक्तींवर उपचार करण्याची क्षमता या केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या केंद्रात 25 अत्याधुनिक व्हेंटीलेटरयुक्त बेड्स आणि व्हेंटीलेटरी आवश्यकता नसणारे परंतु गंभीर आजार असणारे व ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांसाठी 25 बेड्स आयसीयू वार्ड तयार करण्यात आले असून यामध्ये सर्वोत्कृष्ट उपचाराची सुविधा करण्यात आली आहे. तसेच या (PICU) बाल रुग्ण अतिदक्षता केंद्रासाठी 200 लिटर प्रती मिनिट क्षमतेचे ऑक्सिजन प्लॉन्ट उभारण्यात आला असुन क्रायो ऑक्सिजन टँन्क मार्फत सुध्दा ऑक्सिजन पुरविले जाणार आहे.जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात एड्स सारख्या रुग्णांसाठी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा नियोजनातून 1 कोटी 63 लक्ष किंमतीचे स्वतंत्र एआरटी केंद्र उभारण्यात आले आहे. भारतात असे एकूण 3 एआरटी केंद्र असून महाराष्ट्रात हिंगोली येथे उभारण्यात आलेले पहिले एआरटी केंद्र आहे. या केंद्रात एच.आय.व्ही. रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.भविष्यात कोरोनाची तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे 4 प्लॉन्ट लवकरच उभारण्यात येणार आहेत. हे प्लॉन्ट उभारण्यासाठी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन मधून 6 कोटी निधी उपलब्ध होणार आहे. याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय हिंगोली आणि उप जिल्हा रुग्णालय वसमत येथे 20 के.एल. क्षमतेचे क्रायो ऑक्सिजन टँक उभारण्यात येणार आहेत.

May be an image of 8 people, people standing and indoor

तसेच सर्व तालुक्याच्या ठिकाणी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड रुग्णांची तसेच नवजात शिशु आणि मुलांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन आणि इतर सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. येणाऱ्या 1 महिन्याच्या आत भविष्यात जन आरोग्याच्या बाबतीत येणाऱ्या कोणत्याही आवाहनांचा मुकाबला करण्यासाठी हिंगोली जिल्हा सक्षम होणार आहे, अशी माहितीही पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.