संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड चाचण्यात वाढ करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

औरंगाबाद,९जुलै /​​प्रतिनिधी​:-​  जिल्ह्यातील कोविड रूग्ण संख्या कमी होत असली तरी नवीन विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. जेणेकरून वेळीच संसर्गाचा फैलाव रोखता येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

Displaying DSC_7093.JPG

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड उपाय योजनांबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितंना निर्देशित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा संसर्गाच्या प्रमाणानुसार स्तर तीनमध्ये असून यापूर्वी जारी करण्यात आलेले निर्बंध, अटी, शर्ती यापुढेही लागू राहतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्ह्यातील बाधीत दर 2.79 टक्के असून संभाव्य डेल्टा प्लसच्या संसर्गाची तीव्रता अधिक असल्याने चाचण्यांचे आणि लसीकरणाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने यंत्रणांनी नियोजन करून दैनंदिन चाचण्यात पाच हजार पर्यंत वाढ करावी. जनतेने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कायमस्वरूपी आरोग्यदायी जीवनशैलीचा स्विकार करणे ही काळाची गरज आहे. यादृष्टीने सकस आहार, प्राणायाम, योगासने, सकाळ-संध्याकाळ चालणे यांसह आरोग्याला पूरक सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली पाहीजे, याबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात विविध माध्यमांव्दारे जनजागृती करण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्या.

त्याचप्रमाणे पूरेशा प्रमाणात ऑक्सीजन उपलब्धता ठेवण्याची खबरदारी घ्यावी. सर्व रूग्णालयांना इलेक्ट्रीक ऑडीट, ऑक्सीजन ऑडीट आणि फायर ऑडीट करण्याबाबत यापूर्वी सूचना दिल्या असून त्याचा आढावा घेऊन संपर्क अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा. ज्या रूग्णालयांनी ऑडीट केलेले नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच ज्या खासगी रूग्णालयांनी लसीकरणासाठी परवानगी मागितलेली आहे त्यांना ती देण्यात यावी मात्र सर्वांनी नियामानूसारच लसीकरण शुल्क आकारणे बंधनकारक असून त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

डॉ. गोंदावले यांनी रुग्ण असलेल्या गावांमध्ये संपूर्ण गावकऱ्यांची चाचणी करावी. ग्रामदक्षता समित्या, तहसिलदार, आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांनी सक्रीयपणे जनजागृती करुन चाचण्यांसाठी नागरीकांना पूढे आणावे. तसेच डेथ ऑडीट प्रक्रिया पूर्ण करावी, असे सूचीत करुन गोंदावले यांनी शासन निर्देशानुसार 15 जुलै पासून ग्रामीण भागातील 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु करावयाचे आहे. यामध्ये शिक्षकांच्या चाचण्या आणि लसीकरण प्रक्रिया प्राधान्याने पुर्ण करावी. त्यासाठी शासन निर्देशानूसार सरपंच, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्या समितीच्या माध्यमातून नियोजन करावे. तसेच ज्या गावात गेल्या तीस दिवसांत एक ही रुग्ण आढळलेला नाही. त्याच गावात शाळा सुरु करावयाची आहे. रुग्ण आढळल्यास वर्ग बंद करण्याच्या सूचनेचे पालन करण्याच्या सूचना गोंदावले यांनी दिल्या. साथीच्या आजाराची उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.