किरेन रिजीजू यांनी कायदा आणि न्यायमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला

नवी दिल्ली,८जुलै /प्रतिनिधी :- केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी आज केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. या प्रसंगी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना रिजीजू म्हणाले की, “केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री म्हणून काम करणे ही माझ्यासाठी फार मोठी जबाबदारी आहे. हे काम करताना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याला मी प्राधान्य देणार आहे आणि ही जबाबदारी पार पडताना संपूर्ण पारदर्शकता राखण्याचा मी सदैव प्रयत्न करीन.”

कायदा आणि न्यायमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी, रिजीजू यांनी मे 2019 ते जुलै 2021 या कालावधीत केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून तर मे 2014 ते मे 2019 या कालावधीत अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.

राजकीयदृष्ट्या सक्रीय कुटुंबाची पार्श्वभूमी असल्यामुळे, रिजीजू यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक कार्यामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेतला. वयाच्या 31 व्या वर्षी भारत सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सदस्य म्हणून 2002 ते 04 या कालावधीसाठी त्यांची नेमणूक झाली. सन 2004 मध्ये झालेल्या 14 व्या लोकसभेच्या निवडणुकीत, देशातील मोठ्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या पश्चिम अरुणाचलप्रदेश मतदारसंघातून ते निवडून आले.

खासदार म्हणून कार्य करताना रिजीजू यांनी सभागृहात तसेच सभागृहाबाहेर देखील संसदीय कामामध्ये सक्रीयतेने सहभागी होऊन त्यांच्यापेक्षा अधिक अनुभवी सहकाऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण केला. 14 व्या लोकसभेच्या काळात संसदेच्या अनेक महत्त्वपूर्ण समित्यांमध्ये त्यांनी काम केले. संसदेत 90% हून अधिक उपस्थिती नोंदवत, आणि संसदेमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर प्रश्न विचारण्यात आणि चर्चांमध्ये सहभागी होण्यात प्रभावी नियमितता दाखविल्यामुळे, त्यांना प्रसारमाध्यमांकडून सर्वोत्तम युवा संसदपटू म्हणून अत्यंत समर्पक रीतीने गौरविण्यात आले होते.

देशाच्या अत्यंत दुर्गम आणि अविकसित भागांपैकी एका भागामध्ये लहानाचे मोठे होऊनही, रिजीजू यांनी आयुष्यात मिळालेल्या सर्व संधींचा उत्तम लाभ घेतला आणि आज त्यांना केंद्र सरकारमध्ये आणि जनतेच्या नजरेमध्ये ईशान्य भारताचा आवाज म्हणून मोठ्या प्रमाणात मान्यता मिळाली आहे. देशाच्या मुख्य प्रवाहात ईशान्य प्रदेशाचे मोठ्या प्रमाणात एकात्मीकरण व्हावे या विचाराचे ते नेहमीच उत्कट पुरस्कर्ते राहिले आहेत. 16 मे 2014 रोजी ते 16 व्या लोकसभेसाठी निवडून आले. त्यांच्या कार्याचा सन्मान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 ला रिजीजू यांचा केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश केला.